#माझ्यातलीमी_गुडबाय२०२५
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
काही पाने
माणसाला नाविन्याचे वेड असते,अज्ञाताचे कुतुहल असते आणि म्हणूनच परिवर्तनात कशाचा तरी शेवट आणि नवीन कशाची सुरुवात आणि सापेक्षतेशी ताळमेळ.
सुरुवात आहे म्हणजे अंत असतोच.आणि म्हणून साजरं करणं नव्यासाठी उत्सव आलाच तसा निरोप समारंभ आलाच.उत्सवप्रिय मानवाला कारण पुरतंच सोहळे करायला.
अशात मग एक भाग येतो …अपुऱ्या बाबींचा तसंच चुटपुट लावणाऱ्या आठवणींचा तसंच काय जपायचं किती जपायचं,काय टाकायचं काय टिकवायचं आणि नव्या जुन्याची जोड करत काय फेरफार करायचे तसंच अपडेट रहायचं.. काळाच्या मागे नको पडायला.
टाईम ट्रॅव्हल शक्य नाही म्हणून सगळा आटापिटा सहज नकळत तरी काही थोडा जाणीवपूर्वक.
कडू गोड स्वीकारत रूतलेल्या काट्यांचा सल आणि काही वाट्याला आलेला मोरपिशी स्मृतीगंध.
स्थिती उत्पत्ती प्रलय कालचक्राचं विराट कल्पनातीत सत्यशिवसुंदराचं स्वरूप आणि जन्म जीवन मृत्यू हा अज्ञाताचा आत्म्याचा प्रवास.
मग शेवटाचं भय आणि थोडं कल्पनारंजन.
आणि रोजची सवयीची पहाट गर्भात असलेली नित्याची रात्र याऐवजी पानगळ वसंत तसंच वार्षिक कालचक्र अशी आपल्या आकलनाच्या आवाक्यातली स्थित्यंतरे हे उत्सवाचं एक निमित्त आणि आढावा घेत तौलनिक अभ्यास आणि नियोजनाला एक बूस्टर.
पुढचं पाऊल टाकायला एक नवी उमेद निर्माण करणारं
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
हिशोब करणारं तरीही नवीन आरंभ करणारं.
उधळलेल्या बजेटसह काही पूर्ण मूर्त योजना तरीही
हे शेवटचं पान
नवी स्वप्नं नवे आडाखे नवी भाकिते यासाठी नवी दिनदर्शिका डायरी लिहू पाहणारं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
काही सरलेल्या पळांना
परत मुठीत पकडत जागवणारं तर काही कटू अनुभवांमुळे सुटकेचा निःश्वास टाकणारं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
अपुरेपणाची अर्धवट पसाऱ्याची जाणीव करून देत पूर्णत्वास पोचू पाहणारंं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
परत भूप रागापासून आरंभ करत भैरवीपर्यंत मैफल जमवू पाहणारं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
संक्रमण ही जोखीम असते
आणि जरी सहज नकळत थोडे असले तरी बहुविध पडसाद उमटवणारे असते आणि तेजाकडे प्रकाशाकडे
प्रगमनशील वाटचाल असते
हेच घोकत राहणारं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
आणि तरीही हा शेवट नाही सांगणारं.
हे शेवटचं पान मिटू पाहणारं
तरीही चरैवेति असं बजावणारे.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

