#माझ्यातलीमी
#पुस्तकरिव्ह्यूटास्क
पुस्तकाचे नाव _ देह झाला चंदनाचा
लेखक _ श्री राजेन्द्र खेर
“देह झाला चंदनाचा” ही सत्याधिष्ठित कादंबरी स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या समर्पित जीवनावरील आहे. या कादंबरीत लेखकाने पांडुरंगशास्त्री आठवले, ज्यांना जनमानसात “दादा” या नावाने संबोधले जाते, यांचा बालपणापासूनचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. ज्या वर्षी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला म्हणजेच एक ऑगस्ट १९२० त्याच वर्षी दादांचा १९ ऑक्टोबर १९२० रोजी जन्म झाला. जणू काही टिळकांच्या कर्मयोगाला भक्तीची जोड देण्यासाठीच दादांचा जन्म झाला होता. छोटासा पांडुरंग लहानपणापासूनच कसा जिज्ञासू होता हे सांगताना लेखक राजेंद्र खेर यांनी एक छोटासा प्रसंग लिहिला आहे. पांडुरंगाच्या बाबांनी म्हणजेच वैजनाथ शास्त्रींनी घराबाहेर आंघोळ केली तेव्हा अस्पृश्य म्हणजे काय, त्यांना का शिवायचे नसते असे प्रश्न विचारून त्यांनी बाबांना बेजार केले. वाल भिजवल्यावर मोड येतात त्याप्रमाणे देव पाण्यात ठेवल्यावर त्यांना पण मोड येतात का असे छोट्या पांडुरंगाने विचारले.
ह्या कादंबरीत लेखकाने दादांच्या ” भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या त्रयीतून संस्कृती उभी राहते. मानवी मूल्यांना पुनर्जीवित करणे, नाश पावणाऱ्या सांस्कृतिक मूल्यांचा जीर्णोद्धार करणे हेच खरं प्रभुकार्य आहे, हीच खरी भक्ती आहे ” या तत्त्वज्ञानाचा उहापोह केला आहे. महाराष्ट्रातील रोहा हया छोट्याशा गावात जन्म होऊन सुद्धा त्यांनी १९५४ साली स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. स्वाध्याय चा अर्थ “स्वतःचा अभ्यास” असा होतो, ही वैदिक तत्वज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे आणि परिवारातील सदस्यांना “स्वाध्यायी” म्हणतात. गेल्या काही वर्षांत, दादांच्या अनुयायांनी भगवद्गीतेच्या ईश्वराच्या आणि ईश्वराच्या वैश्विक प्रेमाच्या संकल्पना लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत ते सुद्धा जात, सामाजिक-आर्थिक अडथळे आणि धार्मिक भेद ओलांडून.
ह्या कादंबरीत लेखकाने दादांच्या कार्याचे वर्णन करताना त्यांनी कशा प्रकारे वैयक्तिकरित्या हजारो गावांना भेटी दिल्या, कधी पायी आणि भाड्याने सायकली घेऊन, आणि त्यांचे भाऊ आणि बहिणी (स्वाध्यायी) प्रत्येक घरात वैयक्तिकरित्या गेले आणि प्रत्येक कुटुंबाशी निःस्वार्थ संबंध प्रस्थापित केले आणि गीतेचे विचार पसरवण्यासाठी घरोघरी गेले. भारतातील सुमारे १,००,००० गावांमध्ये आणि जगभरातील किमान ३४ राष्ट्रांमध्ये या गीतेचे अनुयायी आहेत. या गावांमध्ये, दादांनी देव-केंद्रित भक्तीच्या माध्यमातून सामाजिक सक्रियता देण्यासाठी विविध प्रयोग केले, ज्यात सामूहिक, दैवी श्रम (भक्ती) च्या भावनेने सहकारी शेती, मासेमारी आणि वृक्षारोपण प्रकल्प यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजात वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल आणि त्यायोगे माणसाचा उत्कर्ष साधायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे.
लेखकाने दादांना आपल्या मायदेशाबद्दल काय भावना होत्या हे एका प्रसंगातून सांगितल्या आहेत. १९५४ साली जपानमध्ये द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद भरली होती. सुरुवातीला इतरांनी त्यांची उपेक्षा केली. परंतु अंतिम टप्प्यात दादानी इतर तत्त्वचिंतकांनी श्रीकृष्णाबद्दल घेतलेले सारे आक्षेप खोडून काढले. त्यांच्या बोलण्याने अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन अतिशय भारावून गेले होते. दादांना त्यांनी अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांना सर्व सुखसोयी देण्याचा प्रस्ताव ठेवला. ते तिथे श्रीमंतीत राहू शकले असते. पण त्यांनी विचार केला माझ्या मायदेशात राहून मी जर कार्य करू लागलो तर लोक मला एक प्रवचनकार म्हणतील. म्हणू देत. पण मी इथेच राहीन. गीतेचे तत्त्वज्ञान जगभर पसरवेन.
ही कादंबरी परमपूज्य दादांची महती सर्वसामान्यांना सांगतानाच गीतेचं तत्वज्ञान केवळ भारतातच नव्हे तर परदेशात कसं पोहोचलं पाहिजे हेही उलगडून सांगते. मुंबईतील माधवबाग येथे त्यांनी ‘श्रीमद भगवद्गीता पाठशाळा’ स्थापन केली, जिथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा, विशेषतः भगवतगीतेचा अभ्यास केला आणि प्रवचनं देण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी ठाणे येथे तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान अभ्यासले जाते. दादांनी इंग्रजी भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला होता.
साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या दादांचा जन्मदिवस “मनुष्य गौरव दिवस” म्हणून साजरा केला जातो. चंदन ज्याप्रमाणे स्वतः झिजून इतरांना सुगंध देतं त्याप्रमाणे दादा मनुष्य जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झिजत राहिले. अशा थोर व्यक्तीचा जीवनप्रवास २५ ऑक्टोबर २००३ ला थांबला. श्री राजेन्द्र खेर यांनी ही कादंबरी खूप वाचनीय केली आहे. वाचताना आपण पूर्णपणे गुंतून जातो. हे पुस्तक आपल्या संग्रही असावं. किमान प्रत्येकाने एकदा तरी हे वाचावं असं मला मनापासून वाटतं.
©️®️सीमा गंगाधरे

Very good👍