# विकेंडटास्क
#महिलादिन विशेष
# कथालेखन
माझ्यातली खरी मी
तिची कहाणी तिच्याच शब्दात
एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झाला. पहिलीच मुलगी सपूंर्ण कुटूंबात…पहिली बेटी धनाची पेटी म्हणून कौतुकही झाले .पाळण्यात आत्याने आवडीने रजनी नाव ठेवले. पाठोपाठ चार भावंड आलीत. कोडकौतुक कमी नाही झाले पण मोठी मोठी म्हणत नकळत जबाबदारी आली. शाळेत जायला सुरवात झाली. अभ्यास करणे मनापासून आवडत होते.वर्गातला पहिला नबंर कधी सुटला नाही किबंहूना तो टिकवण्यासाठी जिद्दीने अभ्यास करायची सवय लागली. सुरवातीला या गोष्टीचे घरात कौतुक पण झाले. आपल्याला खूप शिकायला मिळणार अशी आशा पण मनात तयार झाली. सातवी नतंर संस्कृत घेतले कारण पुढे संस्कृत व मराठी घेऊन बि.ए. एम.ए. करायचे असा विचार मनात पक्का झाला होता .वास्तविक पहाता असा विचार करायची परिपक्वता नव्हती की घरी पण तसे वातावरण नव्हते. माझ्या एक शिक्षीका होत्या ..देशपांडे बाई.. मराठी ,संस्कृत शिकवायच्या त्यांनीच हे बिज रुजवले .पण पुढे शाळेतूनच संस्कृत काढल्या गेले शेवटी ते शिकायचे राहून गेले. नगर परिषद वाचनालयातून मासिके यायची कारण वडील तिथेच कार्यरत होते.आईला वाचनाची आवड होती त्यामुळे मला पण वाचनाची आवड लागली.त्यामुळे खूप शिकायचे हे मनात पक्क होत गेल.माझ्यातली मी मला तिथे सापडली होती.
पण घरात मात्र चर्चा वेगळीच सुरु झाली होती.घरात वडिलांचे वर्चस्व होते.आता माझ्या विषयी सर्व धोरण बदलले होते. वयात येताच सर्व कायदेकानून लागू झाले अभ्यासा ऐवजी घरकामाची,लहान भावंडाना सांभाळायची सक्ती करण्यात आली.घरी साडी घालायची सक्ती झाली. एकुन सर्व चित्र बदलले.,दहावी फर्स्ट क्लास मध्ये तिन विषयात प्राविण्य घेवून पास झाले शाळेतून पहिली आले. कौतुकही झाले.पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आता शिक्षण बस झाले असे वडिलांचे फर्मान निघाले.आईतर विरुद्ध जावू शकत नव्हती. आजी खरोखर त्या काळात आधुनिक विचार करणारी होती .तिचे पण काही चालत नव्हते काळच तसा होता .घरी पुरुषप्रधान संस्कृती होती. शेवटी रडून पडून बारावीपर्यंत शिकायची परवानगी मिळाली. पण सायन्स घ्यावे लागले कारण ती शाळा होती अन आर्ट विषय कॉलेज मध्ये होता. कॉलेज मध्ये पाठवण्यापेक्षा शाळा बरी असा विचार झाला.जे मिळाले ते स्विकारले अकरावी तर झाली पण बारावीत गणिताजवळ गाडी अडकली.दोन वेळा प्रयत्न केले पण जमल नाही.याचवेळेस घरी लग्नाचा विषय सुरु झालाच होता.ते करावेच लागणार ही जाणीव झाली होती. त्याआधी निदान बारावी तरी करावी असा विचार मनात पक्का केला. अन दुसऱ्या वर्षी मैत्रीणीच्या मदतीने बाहेरुन सर्व आर्ट चे विषय घेऊन फाॅर्म भरला आईने चोरुन मदत केली.पण पुढे परिक्षा देतांना वडिलांना सांगावेच लागले. ते काही बोलले नाहीत कर तुला पाहिजे ते अशा शब्दात परवानगी मिळाली. कदाचित आता हिचे लग्न करायचे अन मग सासरी जाणार या विचाराने ते थोडे हळवे झाले होते. ते तरी काय करणार साधारण परिस्थिती,पदरी चार मुली,तेव्हा रुढीप्रमाणे हुंडा द्यावा लागत होता.ह्या सर्वांनपुढे त्यांचाही नाईलाज होता.
शेवटी बारावी होताच लग्न झाले यजमान गावातच शिक्षक होते गाव छोटे होते बावीस लोकांचे कुटुंब होते. गावातल्या रिती प्रमाणे सर्व कामे करावी लागत. सकाळी पाच ते रात्री दहा फुरसतच नसायची इथे माझा पुस्तकाशी सबंधच सुटला. माझी वाचनाची आवड विचारात घेवून यजमानांनी शाळेच्या वाचनालयातून पुस्तके आणलीत पण घरच्या वरिष्ठांच्या नाराजीमूळे तेही बंद करावे लागले.बायकोची बाजू घेऊन बोलायचे दिवस ते नव्हते अशाप्रकारे जवळपास दहा वर्ष माझा कागदाशी असलेला सबंध सुटला.माझ्यातल्या मीला पण काळजात दडवून स्वत:ला संसारात गुरफटून घेतले.
आता मुले मोठी झाली होती गाव लहान असल्याने त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण द्यायची गरज वाटायला लागली आता लग्नाला दहा वर्ष झाली होती .मोठे वेगळे झाले होते पण लहान दिर,नणंद यांच्या शिक्षण व लग्नाची जबाबदारी होती.इथे यजमानांनी ऐकले मुलांना शिक्षणासाठी माहेरच्या गावात घेऊन आले.घरुन विरोध झालाच पण मुलांसोबत घरच्या जबाबदाऱ्या पण नाकारल्या नाही तेव्हा हळूहळू विरोध मावळला. आम्ही तिघेच शिक्षणासाठी माहेरच्या गावी आलो यजमान अधूनमधून येत कारण त्यांना तिथल्या शेतीची पण जबाबदारी होती. मुलांचे शिक्षण ही पुर्णपणे तुझीच जबाबदारी आहे असे सांगण्यातच आले होते. मुले पण व्यवस्थित होती. इथे नातवासाठी आजोबांचा पाठिंबा होता. आता मलाही थोडा वेळ मिळायला लागला होता.एव्हाना लहान बहिणीला कॉलेज ची परवानगी मिळाली होती ती बि.ए. करत होती. तिला पाहून माझी पण शिक्षणाची ईच्छा उफाळून आली. यजमानांचा विरोध नव्हताच. वडिलांची होती नाराजी …आता करायचे आहे शिक्षण घेऊन… नौकरी करणार आहेस काय ? पण यजमानांनी हो म्हटल्या मूळे ते फारसा विरोध करु शकले नाही. बहिणीच्या मदतीने बाहेरुन फॉर्म भरुन घरीच अभ्यास करुन तिन वर्षात पदवीधर झाले .यजमानांना पण खूप आनंद झाला. आता एम.ए. पण कर असा त्यांचा पाठिंबा मिळाला. आता अवांतर वाचन पण वाढले होते. फायदा असा झाला की आई अभ्यास करते हे पाहून मुले पण अभ्यास करत होती.स्वतः चा पुन्हा एकदा शोध लागला होता.
आपला आनंद टिकू देईल ते नशीब कुठले…आपण एक विचार करतो अन नियती तिच्या योजना आखतच असते.एका रात्री यजमानांची प्रकृती अचानक बिघडली दवाखान्यात नेताच बि.पी. वाढल होत तिथे प्रायमरी तपासणी करुन मोठ्या शहरात पाठवल . किडणी फेल्युअर च निदान झाल. अन सार जग उध्वस्त झाल्यागत झाल. शेवटी स्वत:ला विसरुन यजमान अन मुलांना सावरल. आता सर्व विषय बाजुला ठेवून यजमानांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केल गावा बाहेर न। गेलेली मी प्रथमच रेल्वे मध्ये बसून यजमानांना घेऊन मुबंई ला गेले पुढे ऑपरेशन झाले. त्यांच्या बहिणीने किडणी डोनेट केली.नातेवाईकांची पण मदत झाली. पुढे दहा वर्ष सर्व ठिक होत. वर्षातुन दोन वेळा मुबंई ला चेक अप वैगरे सर्व सुरु होत.यजमानांची शाळा ,शेती सर्व सुरळीत सुरु। होत. आता मी पण वेळ भेटेल तसे वाचन करत होते परंतु एक दिवशी अचानक अटॅक येऊन पंचवीस वर्षाची साथ सुटली.मुलांच्या लग्नाची,नातवडांची स्वप्न पाहणाऱ्या त्यांना अचानक सर्व सोडून परतावे लागले.ध्यानी मनी नसतांना झालेला हा आघात पुन्हा एकदा संसार उध्वस्त करुन गेला.
या वेळप्रसंगी मात्र मुलांनी समजदारी घेवून मला सावरले .एव्हाना त्याची शिक्षण होऊन ते नौकरी,उधौगाला लागले होते.आता त्यांच्या संसाराचा विचार करायला पाहिजे असा विचार करुन मी पण स्वत:ला सावरले. पुढे काहीही त्रास न होता दोन सुविद्य सुना घरात आल्या.आजतगायत त्यांनी मुलीची कमतरता कधी भासू दिली नाही. चार गोड नातंवडे पण आली घराचे पुन्हा गोकुळ झाले. झाले गेले सर्व मागे टाकुन मी पण पुन्हा स्वतःला सावरले.अन पुन्हा एकदा स्वतःला शोधायचा प्रयत्न सुरु झाला.
नातवंडे मोठी होत असतांना त्यांना साभांळून पुन्हा एकदा स्वतःचा शोध घेतला. वाचन सुरु केले. कोरोना काळानतंर फेसबुक चा शोध लागला. तिथे पाहून वाचून स्वतः पण थोडेफार लिहायचा प्रयत्न सुरु केला हळूहळू एक एक गोष्टी सापडत गेल्या. कुठे कुठे थोडेफार लिहीत गेले.
अशातच एक दिवस ‘माझ्यातली मी ‘चा शोध लागला. प्रथम तर त्यावरचे लिखाण च वाचत होते. नतंर चारोळी,जशी जमेल तशी कविता लिहायला लागले.देवकर मॅडम च्या प्रोत्साहनाने व इतर सर्व मैत्रिणींच्या मिळत असलेल्या अभिप्राय ने लघुकथा लिहायला लागले आणि आज हा लेख लिहायची हिमंत केली.
आता खर तर आयुष्याचा तिसरा अंक सुरु झाला आहे.मावळतीचा रंग मात्र केशरी आहे. मुले सुना आप आपल्या संसारात बिझी आहेत. जमेल तशी माझी पण काळजी घेतात. नातवंडे तर दुधावरची साय त्यांच्या शिवाय मी अपूर्ण आहे. आज आयुष्यात मी पुर्णपणे समाधानी आहे. या वयात माझ्यातली मी मूळे पुन्हा एकदा मला माझा शोध लागला आहे.
धन्यवाद संगीता देवकर मॅडम आणि ग्रुप वरच्या सर्व मैत्रिणीचे मनापासून आभार.
कितीतरी वेळा माझ्यातली हरवलेली मी पुन्हा एकदा गवसली असे वाटत आहे.
©®विनया देशमुख
शब्द संख्या…. 1055
