… जीवन खेळ उन सावली..

# माझ्यातली मी #
***** महिला दिनविशेष *****
***** विकेंड टास्क *****(७/०३/२६)
……. मी जेव्हा स्वतःसाठी उभी राहिले……
………….. जीवन खेळ_ ऊन सावली………….
लग्न झाल्या झाल्या कुटुंब मोठं असल्यामुळे स्वप्नांना जागा मिळाली नव्हती. घर कामात व नवऱ्याचं व मुलांचं करण्यातच वेळ जायचा. सासूबाईंची मदतही व्हायची पण तितक्याच त्या बोलूनही दाखवायच्या. मला तोच सासुरवास वाटायचा. पण माझ्या आईने समजाविले त्यामुळे मी स्वतःला सावरून घेतले व पुढे सगळे सुरळीत झाले. मुलांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पण त्यात गैर असे काहीच नाही. अहोंच्या एकट्याच्या पगारात मी घर व्यवस्थित चालविले. पत्नी धर्म मी चालविला पण यात मी काही वेगळे केले नाही. सासरे सेवानिवृत्त झाल्यामुळे अहोंनी बहिणीची व भावाची लग्ने व्यवस्थित पार पाडली पण मी त्यात मिठाचा खडा टाकला नाही. मी माझे कर्तव्य समजून सगळे आनंदाने केले.
मुले लहान असताना बदलीमुळे मला वरुड या निमशहरी जावे लागले. या छोट्याशा गावातच माझी मुले खूप चमकली. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर पडलीत. मोठा मुलगा M. B. B. S व लहान मुलगा इंजिनिअरिंग साठी . सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. यांची नोकरी परगावी. ते गेल्यावर माझ्याजवळ वेळ भरपूर असायचा. मग त्यावेळेस मी शांत बसले नाही. माझ्या ताईचे सासर गावातच असल्यामुळे तिच्याकडून मी घरच्या घरी सगळ्या प्रकारचे पेंटिंग शिकले. हलव्याचे दागिने करण्याची आवड मला मुळातच होती. त्याची ऑर्डर घेत गेले. गायनाची व डान्सची आवड होती. तो पण क्लास लावला. ही सगळी तारेवरची कसरत हे यायच्या आधी आटपायची. त्यांची कशाला कधीच ना नव्हती. पण आपल्यालाच तेवढे समजायला पाहिजे नं की घरी आल्यावर त्यांचे स्वागत हे आनंदाने केले पाहिजे. समोर दाराच कुलूप पाहून त्यांचा थकवा कसा दूर होणार.
सगळं कसं व्यवस्थित सुरू असताना कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक पण वय वर्ष ४५… अचानक डाव्या हातावर फरफरून सूज आली व ठणकायलाही लागला. दवाखान्यात गेलो तर निदानादरम्यान कळले की शरीरातली सगळी हाडे ठिसूळ झाली आहेत. कारण विचारले तर लवकर आलेला “मोनोपॉज “_३७ व्या वर्षी. मोठा मुलगा एमबीबीएस च्या तृतीय वर्षाला होता. त्याने बाबांना सांगितले की बाबा,
आता तुम्हाला आईची खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्ही दिवसभर नोकरीवर जाणार. आईला त्या हाताने काहीच करता येणार नाही.
हे म्हणाले,
आशय तू काहीच काळजी करू नकोस. आपला वाडा इतका चांगला आहे की दिवसभर कोणी कोणी येत राहणार. आणि मुख्य म्हणजे माझी लहान नणंद गावातच होती. हे सुद्धा जाताना सांगून जायचे की अंजू तू नेहमी सकारात्मक भूमिकेतूनच सदैव चालत आली आहेस. डाव्या हाताने तू काहीच करू शकत नाहीस पण शरीरातली सगळीच हाडे ठिसूळ झालेली आहेत. त्यामुळे पडझड झालेली चालणार नाही. सावकाश कामे करीत जा. त्यावेळेला मला सोपेचे वजन सुद्धा हातावर पेलवत नव्हते. झोपताना डोक्याखाली हात आलेला चालत नव्हता. कारण इतकी बारीक बारीक खाडे ठिसूळ झाली होती की शेंगा जशा हाताने मोडतात तशी वजनाने हाडे मोडतील अशी माझी परिस्थिती. दोन्ही मुलांनी बाबांना आई झोपलेली असताना तिच्याकडे लक्ष देत जा अशा सूचना केल्या. नोकरी सांभाळून माझ्या मिस्टरांनी माझी भरपूर काळजी घेतली.
तेव्हापासून जवळ जवळ पंधरा वर्षे मी यावर मात करून परत उभी राहिले. पण मधल्या कालावधीत मी अमरावतीचा आमचा ग्रुप… गजानन महाराज पारायण ग्रुप, भजनी मंडळ ग्रुप व स्वरांजली ग्रुप यात हिरीरीने भाग घेत राहिले.आनंद लुटत राहिले. इतरांनाही आनंद देत राहिले. गट्स करणे हा माझा मूळ स्वभाव. इथला प्रत्येक ग्रुप मी स्वतःच तयार केला म्हणजे पुढाकार मीच घेतला व त्यात भरभरून यशही मिळत गेले. तब्येत तब्येत म्हणून खचत राहिले नाही. सगळ्या दुखण्या खुपण्यावर मात करून उभीच राहत गेले.
गजानन महाराज पारायण ग्रुप…. या दिवशी साखळी पारायण करायचे व पिठलं,भाकरी,ठेचा व कच्चा कांदा यांचा नैवेद्य दाखवून सगळ्या वाचक संख्यांना प्रसादाचा आस्वाद द्यायचा. प्रत्येकीने गजाननाचे एक एक भजन गायचे.
स्वरांजली ग्रुप… दर महिन्यात एक एकीकडे हा ग्रुप जमायचा व भावगीत,सुगम संगीत वगैरे गाणे प्रत्येकीच्या तोंडून ऐकताना मन एकदम तृप्त होऊन जायचे.
भजनी मंडळ ग्रुप… याची मजा तर अजूनच वेगळी. जिथले बोलावणे असेल तिथे सेवा देणे. असा खूप आनंद लुटत मी परत उभी राहतच गेले.
हे सेवानिवृत्त झाल्यानंतर, जबाबदारी मुक्त झाल्यानंतर मनसोक्तपणे भारत भ्रमणही केले. दरवर्षी एक दोन एक दोन ट्रिप्सही केल्या. आम्ही मोठ्या मुलाकडे मुंबईला आलो. मुलगा एमबीबीएस एमडी .. पॅथॉलॉजिस्ट व सून एमबीबीएस एमडी.. रेडिओलॉजिस्ट. लहाना मुलगा व सून दोघेही इंजिनियर. गोड चुणचुणीत नाती.
पहिल्या नातीचा जन्म झाला तेव्हा,
जन्म झाला नातीचा
शब्द सुचू लागले
तेच शब्द हळूहळू
काव्यात उतरू लागले.
अजून एका छंदाची निर्मिती नातीच्या येण्याने झाली. इथूनच मला काव्यरचण्याची आवड निर्माण झाली. काव्यासोबत कथा,लेख याकडेही वळत गेले.
विशेष म्हणजे मुंबईला येऊन सुद्धा मी हे सगळे ग्रुप तयार केले व त्यात अजून भिशी ग्रुप अथर्वशीर्षाचा ग्रुप मी वाढविला. इथेही मला उत्तम प्रतिसाद मिळाला व मिळतही आहे. ८ मार्च महिला दिन येथे आम्ही उत्स्फूर्तपणे साजरा करतो. ज्यांना जे जे शक्य असेल त्या त्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. माझी दरवर्षी महिला दिनावर एक कविता असतेच.
मुंबईत आम्ही दोघांनी “हास्य क्लब” सुद्धा जॉईन केला. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो. प्रत्येक क्षणाचा आनंद म्हणजे होळी, गुढीपाडवा, चैत्र हळदीकुंकू, प्रत्येकाचा वाढदिवस व दरवर्षी स्नेहसंमेलन यांचा आनंद लुटत जीवन जगत आहे. पहिल्याच वर्षाच्या स्नेहसंमेलनात डान्स करायची संधी मिळाली. स्टेज डान्सची अजिबात सवय नसताना कोणतेही आढेवेढे न घेता ड्युएट डान्स केला व दुसऱ्याच वर्षी सोलो सुद्धा तोही कोरिओग्राफर न बोलावून मीच तो डान्स बसवला.
परत माझ्या आयुष्यात वेगळेच वळण आले. पायाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांसाठी ती एक लाखातून केस होती. हाडाच्या झिजेमुळे उजव्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. मिनिस्कस टिअर. हे नाव सहसा कोणीही ऐकले नसेल. पूर्ण तीन महिन्याची बेडरेस्ट घेऊन पण त्या आधी मी वर्षभर घरीच होते. पाय चालूच देत नव्हता. ऑपरेशन वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न झाले पण शेवटी ऑपरेशन टळले नाही. जवळजवळ दीड वर्ष मी माझ्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला मुकले पण खचले नाही.
” माझ्यातली मी ” खऱ्या अर्थाने परत उभी राहिले. पूर्ण ग्रुपला जॉईन झाले आणि त्यात भर म्हणून परीक्षेची जबाबदारी न घेता तबला क्लास आवड म्हणून लावला. खरा खरा आनंद मी लुटत राहिले.
लहान मुलाकडे बंगलोरला गेले असताना ” माझ्यातली मी ” या ग्रुप मधली अचानक एक पोस्ट डोळ्यासमोर झळकली. ती मी वाचली व ती मला खूप भावली. ताबडतोब मी हा ग्रुप जॉईन केला. आता या ग्रुपशी इतकी जोडल्या गेले की सकाळी केव्हा दहा वाजतात व केव्हा टास्क दिल्या जातो याकडेच डोळे लागलेले असतात. धन्यवाद संगीता मॅडम 🙏 सगळ्या ” माझ्यातली मी ” ग्रुपच्या सगळ्या सख्या माझ्यासाठी लाघवी बनत गेल्या. संगीता मॅडम मुळे आज मला लिखाणाची परत परत उभारी यायला लागली.
असे सगळे काही चांगले होत असताना सद्य परिस्थिती अशी आहे की माझ्या दोन्ही खांद्यांवर मोनोपोजमुळेच स्पर वाढलेत (बोन). पण तरी मी हे जे लिखाण करते आहे ते थांबवत नाही. लिहिताना त्रास होतो पण तो त्रास सांभाळूनच मी सगळे काही करते. कारण मला दुखण्यापासून दूर पळायचे आहे. मला नेहमी हसतं खेळतं उभं राहायचं आहे. ” माझ्यातली मी खरी ” यातच मी मला शोधली आहे. कारण नावच माझं अंजली… अंजली म्हणजे ओंजळ. माझ्या आयुष्यात आलेलं हे जे सुख आहे ते दुखण्यावर मात करून ओंजळ भरून आलेलं सुख आहे. सुखदुःखे ही आयुष्य म्हटले की चालतच राहणार. पण संसार म्हणा, आयुष्य म्हणा उधळण ही दुःखाला डावलून सुखाचीच झाली. हा माझ्यासाठी प्रकाश योगच आहे. या उभे राहण्यात ” माझ्यातली मी ” शोधण्यात माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे.
धन्यवाद मॅडम🙏
तुम्ही जो ८ मार्च महिला दिनानिमित्त ” महिला दिन विशेष टास्क ” दिला. अतिशय चांगला विषय खूप मोकळेपणाने व्यक्त करता येणारा होता. लहान मुलगा सध्या बेंगलोर वरून कोईमतुरला गेला. मी तिथे सुद्धा भाषा समजत नसलेल्या ठिकाणी आनंदात राहू शकते कारण या दोघांना सुद्धा भटकंती करायला खूप आवडते. जस जसा त्यांना वेळ मिळेल तसतसे आम्हा दोघांना फिरायला घेऊन जातात व तुमचा हा “माझ्यातली मी” ग्रुप पूर्णवेळ टच मध्ये ठेवतो.
…….. अंजली आमलेकर……..

error: Content is protected !!