शीर्षक :- जळू दे अन्याय – पेटू दे माणुसकी!

#माझ्यातलीमी

#संगीता मॅडमच्या शॉर्ट फिल्म वर आधारित लघुकथा.

कथेचे शीर्षक :- जळू दे अन्याय – पेटू दे माणुसकी!

शहरातील होळी नेहमीप्रमाणे धूमधडाकात पेटलेली होती. रंग, डीजे, सेल्फी आणि सोशल मीडियावर चे लाईक्स. सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचवेळी पत्रकार निर्भय कुलकर्णी यांच्या मनात आले आपण होळीत नेमकं काय जाळतोय?

बाजारपेठातून फिरताना अनेक ठिकाणी बेरोजगार तरुणांच्या लांबच लांब रांगा पाहिल्या. पुढे चौकात महिलांचा अन्यायाविरुद्ध चाललेला निषेध दिसला. किराणा दुकानापुढे महागाई वरून वाद चांगलाच रंगला होता. निर्भय ला वाटलं हीच तर खरी ज्वाला आहे! जी दररोज लोकांच्या आयुष्यात धगधगते. पत्रकारी नजरेने बरोबर हेरले की,” वर वर जरी उत्सव दिसला तरी आत मध्ये जळतंय वास्तव!”

संध्याकाळी निर्भय झोपडपट्टीमध्ये गेला. तिथे काही मुलं दूर उभी राहून रंगांचा आनंद फक्त पहात होती. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं, पण हात मात्र रिकामेच! निर्भयने तिथे छोटीशी होळी पेटवली. चार कागदांवर त्याने मुलांच्या कडून लिहून घेतलं……….
” बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई आणि स्त्री अत्याचार”. या चारही चिठ्ठ्या त्याने ज्वाळेत टाकल्या. मुलांनीही आपल्यातील वाईट दुर्गुण एका कागदावर लिहून होळीत टाकले.

” हे सर्व ज्वालेत टाकल्यावर संपेल का? काका!”
अरे बाळा, हे संपणार नाही. पण आपण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करू शकतो ना!”

त्याने आपल्या पिशवीतून पुरणपोळ्या काढल्या. प्रत्येक मुलाच्या हातात पोळी ठेवली. मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ते कोणत्याही रंगांपेक्षा अधिक उजळ, सुंदर होत. त्या क्षणी निर्भयला जाणवलं – अन्याय जाळणं फक्त शब्दात शक्य आहे पण माणुसकी पेलणं कृतीतूनच घडतं.
छोट्या शांतेन विचारलं,” काका, आता आमची होळी झाली का?
पत्रकार निर्भयच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले, हसून म्हणाला,” हो,ग ! आज खरी होळी साजरी झाली.

त्या रात्री त्याने वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं…..

” वाईट जळणं पुरेसं नाही, माणुसकी पेटवणं गरजेचं आहे. ज्वाला लाकडाच्या नव्हे तर वाईट विचारांच्या, दुर्गुणांच्या पेटवा तरच बदल घडतो.”

होळीची राख खाली उरली होती पण त्या राखेतूनच आशेची पालवी फुटली होती.

शब्द संख्या – २५४.

सौ .स्मिता अनिल बोंद्रे.
©®

error: Content is protected !!