होळीची अनुभूती….

# माझ्यातली मी #
***** लघुकथा लेखन टास्क*****(२/०३/२६)
……………. होळीची अनुभूती………………
श्याम आपल्या आईसोबत एका वस्तीत राहत होता. परिस्थिती हलकीची. अल्पशा आजाराने वडील गेलेले. होळीचा पवित्र सण जसजसा जवळ येत होता तसतसा त्याला दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी रंगाची उधळण करू शकणार नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते पण त्याला हेही माहीत होते की रंगाची उधळण नसली तरी होळी दहनात गरिबी,दुःख व मनातील वाईट विचार जाळून त्यातून आपल्याला प्रेम व ज्योतीचा किरण आपल्या आयुष्यात सुखाचा एक तुकडा पेरून जातो.
होळीचा सण जवळ आला. वस्तीतील इतर मुलांच्या हाती पिचकार्या होत्या. आईकडे त्याने आशेने पाहिले पण तो हलला नाही. त्याने आईकडून नारळ व एक दोन लाकडाच्या सुक्या काड्या घेऊन तो होळी पूजनासाठी आला. गरिबीमुळे उंची वस्त्रे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविणे हे त्याच्यासाठी कोसभर दूर होते. त्याने आनंदाने आईला आवाज देऊन होलिका पूजन केले. तो आईच्या कानात पुटपुटला,
आई,
आपल्याकडे नवीन कपडे नसतांना, गोड गोड पुरणाची पोळी नसतांना आपण का होलीका पूजन करायचे? तिला तर पुरणपोळीची आशा असते आणि माझ्या तोंडी सुद्धा तिची गोडी लागावी असे मला वाटते.
आई म्हणाली बाळा,
असे नाही, होळी म्हणजे फक्त रंगांची उधळण नाही, गोडधोड नाही तर आपल्या मनातील राग, दुःख गरिबीची निराशा या आहुतीत दफन करणे.
त्यांचे दोघांचे बोलणे एका जोडप्याने ऐकले. त्यांनी त्याला जवळ बोलविले. म्हणाले बाळा, हा पुरणपोळीचा नैवेद्य मी होलीकेला दाखवला आहे. तिने तो ग्रहण केला आहे असे समजून ही पुरणपोळी बाळा आज तुझे कधी न गोड झालेले तोंड गोड करणार. बाळा घे.
तो नको नको म्हणत 3 असतांना त्यांनी त्याला त्याच्या हातात पुरणपोळी ठेवून आशीर्वाद दिला की होलिका तुझेही पुढे कल्याणच करेन. तू शिकून मोठा हो.
तो व त्याची आई भारावून गेली. त्याने त्यांना नमस्कार केला व घरी जायला निघाला.
तितक्यात वाटेत समोरच छोटी बहीण भावाची जोडी आशेने होळीच्या नैवेद्याकडे बघत होती. त्याने पटकन आपल्या हातातील पुरणाची पोळी दोघांच्या हातावर ठेवून म्हणाला, बाळांनो हा पुरणपोळीचा नैवेद्य आज तुमच्या भाग्यात होता. तुम्ही तो खाल्ला की माझ्या गरिबीच्या घरातही होळीच्या पवित्रतेने नवीन आशेचा रंग भरला जाईल. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तोही तसाच त्या मुलांसारखा लहानच होता न.
तात्पर्य…. आपण सुद्धा होळीला नाममात्र देऊया व गरजूंचा सण गोड करूया.
…….. शब्द संख्या…..३००

…………. अंजली आमलेकर……………

error: Content is protected !!