काय हरकत आहे… 🤔

inbound8598107925882283327.jpg

#माझ्यातली मी
#विकेंड टास्क लेखन
​#दुसऱ्या लग्नाची गोष्ट
शीर्षक = काय हरकत आहे….🤔

​निवृत्तीनंतरचे आयुष्य शांत होते, पण घरातल्या भिंती जणू अंगावर धावून येत होत्या. मुलगा आणि सून दोघेही मोठ्या हुद्द्यावर कामाला. पण दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त. सून तर त्याच ऑफिसमध्ये होती जिथे त्यांनी आयुष्य घालवले होते. मुलगा अजय आणि स्वाती त्यांच्यावर खूप प्रेम करत व त्यांची खूप काळजी सुद्धा घेत तरी विनायकरावानी ​वृद्धाश्रमात रहायला जाण्याचा निर्णय घेतला.

मुलाने आणि सुनेने खूप गळ घातली, “बाबा, कशाला जाताय? आम्ही आहोत ना!” पण विनायकरावांनी आपला निर्णय बदलला नाही. त्यांना कुणावर ओझे व्हायचे नव्हते, तर स्वतःच्या अटींवर जगायचे होते.सर्व नातेवाईक मित्रांनी त्यांना खूप समजावले पण ते त्यांच्या मतावर ठाम होते. काय हरकत आहे…असं त्याचं म्हणणं होतं.

​वृद्धाश्रमात गेल्यानंतर विनायकरावांचे आयुष्य पुन्हा एकदा बहरले. तिथे त्यांच्याच वयाची माणसं होती, गप्पा होत्या. पण आजची सकाळ काही ‘खास’ होती. आज आश्रमात एक नवीन सदस्य येणार होत्या.सर्वजण त्याची तयारी करत होते. विनायकराव त्यांच्या रूममध्ये शांत बसून होते.

​दुपारच्या वेळी हॉलमध्ये चहा घेताना विनायकरावांची नजर समोरच्या बाकावर बसलेल्या महिलेवर पडली. पांढरी साडी, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. त्या बाईंच्या हातात एक जुनं पुस्तक होतं— ‘मृत्युंजय’.

​ विनायकरावांचे हृदय एका क्षणासाठी थांबले. हे पुस्तक, ती पकडण्याची पद्धत… त्यांनी हळूच जवळ जाऊन विचारले, “मृण्मयी…?”

​त्या महिलेने दचकून वर पाहिले. क्षणभर दोघेही स्तब्ध झाले. ती मृण्मयीच होती—त्यांची बालमैत्रीण! जिच्याशी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या, पण नियतीने ४० वर्षांपूर्वी त्यांना वेगळे केले होते. मृण्मयीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले आणि ती शहराबाहेर गेली, त्यानंतर कोणताही संपर्क नव्हता.

​”तू इथे कशी?” विनायकरावांनी विचारले.
​मृण्मयी हसली, पण त्या हास्यात दुःख होते. तिने सांगितले, “माझे पती काही वर्षांपूर्वी वारले. मला मूलबाळ नाही. म्हणून मी माझी सर्व संपत्ती एका ट्रस्टला दान केली आणि स्वतः या आश्रमात राहायला आले.”
हे ऐकून विनायकरावांना थोडे दुःख झाले पण इतक्या दिवसांनी तिला पाहून तितकेच ते आनंदी झाले. मृण्मयी ने विचारले तू इथे कसा.

विनायकरावांनी एक दीर्घ श्वास घेतला, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले.
​विनायकराव म्हणाले, “मृण्मयी, मी इथे कोणाच्या त्रासाला कंटाळून किंवा मुलांनी घराबाहेर काढलं म्हणून आलेलो नाही. माझा मुलगा अजय आणि सून स्वाती माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. पण मला जाणीव झाली की, त्या चार भिंतींच्या घरात माझं शरीर सुरक्षित होतं, पण माझं मन मात्र हळूहळू एकाकी होत होतं.”

​ते पुढे म्हणाले, “माझी नोकरी सुटली, पत्नी मागेच सोडून गेली, मुलं आपापल्या जगात व्यस्त झाली. घरी राहून मी फक्त त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यापेक्षा, स्वतःचं एक वेगळं जग निर्माण करायचं ठरवलं. मला कोणावरही ओझं बनायचं नव्हतं. जेव्हा मी इथे येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढलं. पण मी विचार केला. “आयुष्याची ही संध्याकाळ जर मला माझ्यासारख्याच लोकांसोबत, आनंदाने आणि स्वतंत्रपणे घालवता येत असेल, तर ‘काय हरकत आहे…’”🤔

वृद्धाश्रमातील त्या सुंदर बागेत विनायकराव आणि मृण्मयी तासनतास गप्पा मारू लागले. सुरुवातीला ही केवळ दोन जुन्या मित्रांची भेट होती. विनायकरावांना वाटत होतं की, ही केवळ एक योगायोगाची भेट आहे. पण मृण्मयीच्या मनात काहीतरी वेगळं होतं.

​एके दिवशी संध्याकाळी चहा घेताना मृण्मयीने विनायकरावांच्या डोळ्यांत पाहत विचारलं, “विनायक, तुला खरंच वाटतं का आपली ही भेट फक्त एक ‘योगायोग’ आहे?”

​ विनायकराव बुचकळ्यात पडले. तेव्हा मृण्मयीने हळूच हसून सांगितलं, “अरे वेड्या, हा योगायोग नाही, तर तुझ्या सूनेने, स्वातीने रचलेला एक गोड कट आहे! स्वाती जेव्हा माझ्या संस्थेत आली, तेव्हा तिने माझ्या टेबलावरचा आपल्या कॉलेजचा ग्रुप फोटो पाहिला होता. तिने तुझा आणि माझा इतिहास ओळखला. तुझ्या कपाटातलं ते पत्र तिला सापडलं आणि तिने ठरवलं की बाबांना त्यांचं हरवलेलं सुख परत मिळवून द्यायचं.”

​ विनायकराव सुन्न झाले. ज्या सुनेला आपण आपल्या निर्णयाने दुखावलं असं त्यांना वाटत होतं, तीच सून त्यांच्या आयुष्यातील रिकामी जागा भरण्यासाठी प्रयत्न करत होती.

​मृण्मयी पुढे म्हणाली, “स्वाती मला म्हणाली होती की, ‘काकू, बाबांनी आमच्यासाठी खूप केलं, आता त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत मिळवण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवीये.’ आणि म्हणूनच मी या आश्रमात येण्याचा निर्णय घेतला.”

​विनायकरावांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी दुरूनच पाहिले, अजय आणि स्वाती गेटपाशी उभे राहून या दोघांकडे पाहून आनंदाने हात उंचावत होते. विनायकरावांनी मृण्मयीचा हात घट्ट धरला आणि म्हणाले,
​”आयुष्याच्या या वळणावर पुन्हा एकदा आपली साथ लाभणार असेल, तर जगाची पर्वा कशाला? मुलांनीच जेव्हा रेशीमगाठ बांधायची ठरवलं आहे, तर आता पुन्हा एकदा …गाठ बांधायला ‘काय हरकत आहे…”❤️
विनायकराव आणि मृण्मयी बागेत असतानाच अजय-स्वाती आनंदाने धावत आले आणि त्यांनी बातमी दिली, “बाबा, तुम्ही आजोबा होणार आहात!” हे ऐकून विनायकरावांच्या डोळ्यात सुखाश्रू आले. स्वाती म्हणाली, “बाबा, आता आपलं घर तुमच्या दोघांशिवाय पूर्ण होणार नाही. मृण्मयी काकूंना घेऊन आता नातवंडाच्या स्वागतासाठी घरी परत यायला ‘काय हरकत आहे’?” ❤️🤔
मुलांच्या या प्रेमापोटी विनायकरावांनी मृण्मयीचा हात हातात घेतला आणि आयुष्याच्या या नवीन वळणावर, घराच्या दिशेने आनंदाने पाऊल टाकले.
मृण्मयीला मुलांची आईच नाही तर आजी होण्याचं सुखही मिळाले याचा आनंद घेण्यासाठी दुसरं लग्न करण्यास काय हरकत आहे…..? ❤️🙂

@अलका शिंदे

error: Content is protected !!