….. उदयास आलेली नवी पहाट…..

# माझ्यातली मी #
****** वीकेंड टास्क *****(३१/०१/२६)
…… दुसऱ्या लग्नाची गोष्ट यावरून कथा…….
•••••••• उदयास आलेली नवी पहाट ••••••••
माधव आणि मधुरा यांचा सुखाचा संसार सुरू होता. पहिले पुत्ररत्न झाले. नंतर दुसऱ्या डिलिव्हरीत बाळ झाल्या झाल्या ब्लड प्रेशर शूट होऊन मधुराची जीवन ज्योत विझली. माधवला काय करावे काही समजेना. एवढा मोठा धक्का पचवणे त्याला खूप जड गेले. ही बातमी कळताच त्याचे काका काकू व अजून बरेच नातेवाईक आलेत. आई वडील आधीच गेले होते. काका काकूही काही दिवस राहिले पण ते तिरहीत्यासारखे निघून गेलेत.

माधवची रजा संपत आली. पहिला मुलगा मैत्रेय हा तीन वर्षाचा लहानच आणि तो एक महिन्याचाच. काय करावे काही सुचेना. काही दिवस त्याने आया ठेवली. ती बाळाचे सगळेकाही करायची. त्यामुळे त्याची काळजी दूर झाली. आया म्हणजे २५-२६ वर्षाची मुलगीच. पुढे एक दोन वर्षातच तिचेही लग्न झाले. बाळ सुद्धा दोन वर्षाचा झाला. त्याने ठरविले आता बाळाला सोबत ऑफिसमध्ये न्यायचे. तेथे बेबी केअरची व्यवस्था होती. मोठ्याला शाळेतून व्हॅनवाल्याला सांगून ऑफिसमध्ये सोडायला सांगितले.

असे सगळे रुटीन सुरू होते पण सगळे त्याला खूप जड जायचे. घरी आल्यावर दोन्ही मुलांना सांभाळणे म्हणजे एक कसरतच होती त्याच्यासाठी. त्याच्या मित्रांनी तगादा लावला माधव, तू आता दुसरे लग्न कर. मुलांना व तुला सुद्धा त्याची गरज आहे.
माधव म्हणाला,
पण लग्न केल्यानंतर ती कशी वागेल माझ्या मुलांशी?
अरे मित्रा,
एवढा पुढचा विचार करू नकोस. तू सकारात्मक भूमिकेतून यात पाऊल टाक.
ठीक आहे मित्रा. लगेचच त्याने विवाह मंडळामध्ये नाव नोंदवले. एक मुलगी पसंत आली. चित्रा तिचे नाव. सगळ्या अटी तिने मान्य केल्या. तिचाही नवरा एका अपघातात गेला होता. मूलबाळ नव्हते. लग्न नोंदणी पद्धतीने झाले.
सुरुवातीपासूनच ती मुलांना चांगली सांभाळायची. मुख्य म्हणजे तिने माधवला आता आपल्याला स्वतःचे मूल नको. आपण दोघांनी तो विचार सोडून द्यायचा. तुझी मुले तीच माझी मुले म्हणून मी त्यांचा सांभाळ करीन.

सगळे काही व्यवस्थित सुरू होते. अचानक चित्राची तब्येत बिघडली. तिच्या तब्येतीचे निदान कळताच माधव हादरून गेला. तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्याला वाटले आपण आपल्या व मुलांच्या सुखासाठी लग्न केले. आता अशी परिस्थिती त्यासमोर उद्भवली की तो हललेल्या मनस्थितीत गेला. त्याचा मोठा मुलगा वैभव उच्च शिक्षण घेऊन नोकरी निमित्त अमेरिकेला गेला. लहान मुलगा वेद हा सुद्धा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला पुण्याला होता. माधवने ही बातमी मुलांना कळविली. त्यांना सुद्धा प्रचंड धक्का बसला. दोघांनाही कधीही जाणवले नाही की ही आपली सावत्र आई आहे. लहान मुलगा तर अगदी लहानच होता. चित्राने त्यांना अतिशय चांगले संस्कार देऊन घडविले. त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्या बाबांप्रमाणे हा धक्का पचवणे जड जात होते.

मुंबई तिच्यावर उपचार सुरू होतेच. माधव हा पैशाकडे पाहणारा नव्हता. कितीही पैसा गेला तरी चालेल पण माझ्या चित्राला मी वाचवेनच. इतके प्रयत्न करूनही त्याला यश येत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर सरळ दिसायला लागले की आपण केलेले दुसरे लग्न सुद्धा अयशस्वी ठरेल का.
सारखे त्याला मोठ्या मुलाचे वैभवचे फोन यायचे. बाबांकडून आईच्या परिस्थितीत काहीच सुधारणा नाही हेच कळायचे. शेवटी त्याने एक महिन्याची रजा घेऊन मुंबईत डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घेतला की तिला अमेरिकेत घेऊन जायचे व तेथेच तिच्यावर उपचार करायचे. लहान मुलगा वेदने सुद्धा दादाला म्हटले, दादा मला पण त्यावेळेस तेथे यायचे आहे. मी पण सरांकडून सुट्टी घेणार. दोघा भावांची आई विषयीची करुणा बघून त्याच्या डोळ्यात पाणी आले. आपण दुसरे लग्न करून काहीच चूक केली नाही असेच त्याला वाटले.

माधवने तीन महिन्यांची रजा टाकून सगळे अमेरिकेला गेले. चित्रावर चित्रावर योग्य ती ट्रीटमेंट केली व ती एवढ्या मोठ्या गंभीर आजारातून सहीसलामत बरी झाली.
मधुरा गेल्यानंतर त्याच्या हृदयावर जी जखम झाली होती त्यावर त्याने फुंकर घालून नवीन आयुष्याला कलाटणी दिली. दुसऱ्या लग्नानंतर माधव व मुलांच्या मनात चित्राविषयी आदर वाढून संवादाला योग्य दिशा मिळाली व प्रेमाच्या भावना उजळून निघाल्या. दुसरे लग्न हे माधवसाठी एक आशेचा किरण घेऊन आल्यासारखेच झाले.. त्यात त्याला एक भावनिक परिपक्वता जाणवली.
यातून एकच निष्कर्ष निघतो की,
दुसरी संधी घेतली तर जीवनाला नवीन अर्थ मिळतो व त्याला आनंदाच्या दिशेला आपण वळवू शकतो.
……. अंजली आमलेकर………

error: Content is protected !!