मार्गदर्शक सखा

#माझ्यातली मी
# ब्लाग लेखन
दि. 26 जानेवारी 26

मार्गदर्शक सखा

सीता होऊन मौनाच रामायण सहन करता येत पण शब्दाच महाभारत सोसायला पाठिशी कृष्ण हवा.
हे वाक्य जीवनाच्या दोन पैलूचा वेध घेत.कधी काहीही न बोलता मौन धारण करणे हिताचे असते पण प्रत्येक वेळी ते योग्य असतेच असे नव्हे तेव्हा शब्दांचा आधार घ्यावा लागतो .
रामायणाच उदाहरण घेतल तर सीतेवर नेहमी अन्याय झाला हे सर्वच मान्य करतात .अग्नीपरिक्षा देऊनही ती समाजाचा विश्वास सपांदन करु शकली नाही,परंतू सीतेने मात्र गप्प बसून सर्व आरोप मुकपणे सहन केले…का? रामासाठी,राजकुटूंबासाठी की स्वतःच्या मानसिक शांततेसाठी .
यातला तिसरा पर्याय मला योग्य वाटतो कारण आपल्यावर कणभरही विश्वास न ठेवणाऱ्या समाजापुढे कितीही अग्निपरीक्षा दिल्या तरी आपण समाजाची मानसिकता बदलवू शकत नाही हे लक्षात घेवून सीतेने शेवटी मौन राहूनच आपले सामर्थ्य सिद्ध केले.
रामायणात कितीही आदर्श असल तरीही वास्तविक आयुष्यात हे स्विकारुन जीवन जगता येईल काय ? उत्तर नाईलाजाने नाहीच येत. अशावेळी कुणीही सामर्थ्यवान न ठरता भ्याडच ठरेल.
आयुष्यात अशा वेळा येतात आपल्या वर शब्दांचे वार होतात. तक्रार, आरोप,निंदा असे अनेक स्वरुप असतात शब्दवारांचे. अशावेळी गप्प राहील तर आपला गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते किंवा भ्याड, पळपुटा ठरवल्या जाते.अशा वेळी एक मार्गदर्शक हवा असतो.
महाभारताचे उदाहरण द्यायचे झाले तर अर्जुनाने निराश होऊन शस्त्रत्याग केला तेव्हा कृष्णाच्या शब्दांची प्रेरणा होती म्हणून तो पुन्हा युद्धात उभा राहीला.
, आयुष्य जगत असतांना असा कृष्णसखा प्रत्येकाला हवा असतो.तो मित्र, सहकारी, गुरु सहचर कोणीही असु शकतो. ती व्यक्ती निस्वार्थपणे मार्गदर्शन करत असते.पण अवघड आहे ते असा कृष्णसखा ओळखणे.आपल्याच स्वार्थी विचारांची पट्टी गांधारी सारखी आपल्या डोळ्यांवर असते त्यामुळे कृष्ण शोधणे अवघड होते. शेवटी असा कृष्णसखा लाभणे हे सुदैव आहे .शेवटी त्याला ओळखणे ही एक कला आहे.
कठीण जरी असले तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात एक तरी असा कृष्णसखा हवाच जो जीवनाची लढाई लढायला योग्य मार्गदर्शक व आधारस्तंभ होईल.
शेवटी मौन राहून तुम्ही रामायण निभावू शकता मात्र शब्दांच्या महाभारताला सामोरे जायला पाठिशी कृष्णच हवा.

विनया देशमुख

शब्द संख्या…. 292

error: Content is protected !!