#विकेंडटास्क.(२६/१/२०२६)
#ब्लॉक लेखन
शीर्षक:- ” मौन, शब्द आणि आधार – जगण्याची नवी युद्धभूमी.
संगीता मॅडमनी दिलेला एक विचार मनाला स्पर्श करून गेला….” सीता होऊन,” मौनाचं रामायण” सहन करता येतं पण – ” शब्दाचं महाभारत” सोसायला पाठीशी कृष्ण हवाच!”हे केवळ एक वाक्य नसून ते मानवी नाते संबंधाचे आणि भावनिक संघर्षाचे एक जिवंत वास्तव आहे असं मला वाटतं.
(१) मनाचं रामायण :- सोसण्याची परिसीमा.
रामायणात सीतेचे जीवन हे त्यागाचे आणि संयमाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर होणारा अन्याय किंवा परिस्थितीतील कठीण बदल स्वीकारते पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहते. तेव्हा तिचे,” मौनाचे रामायण” असते.
आपल्या कौटुंबिक शांततेसाठी किंवा नात्यांमधील ओलावा टिकवण्यासाठी अनेक स्त्रिया स्वतःचे दुःख मनात दाबून ठेवतात. हे मौन दुर्बलता नसून ती एक प्रकारची,” सहनशक्तीची पराकाष्ठा” असते.
(२) शब्दांचे महाभारत – जेव्हा शब्दांचे बाण काळजाला लागतात.
महाभारत हे युद्धाचे प्रतीक आहे. पण रणांगणावरील शस्त्रांच्या युद्धापेक्षाही भयंकर असते ते शब्दांचे युद्ध. जेव्हा शांत राहूनही समाजाकडून चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात तेव्हा ते सहन करणे कठीण होते.
शरीराची जखम भरून येते, पण अपशब्दांनी झालेली जखम आयुष्यभर सलत राहते. जेव्हा शब्दांचे हे बाण सुटतात तेव्हा व्यक्तीचा आत्मसन्मान धोक्यात येत असतो आणि तिथे केवळ शांत राहून चालत नाही.
(३) पाठीशी” कृष्ण” हवा असतो – मानसिक आधाराची गरज.
अर्जुना समोर जेव्हा त्याचेच आप्तस्वकीय उभे होते, तेव्हा तो गोंधळून गेला, गांगरला तिथे शस्त्र चालविण्यापेक्षा,” मानसिक बळ” मिळवणे महत्त्वाचे होते. जे त्याला श्रीकृष्णाने दिले. आयुष्यात जेव्हा जग आपल्यावर विनाकारण टीका करते तेव्हा आपल्याला अशा एका व्यक्तीची गरज निर्माण होते.
जी आपल्याला म्हणेल,” तू बरोबर आहेस! मी तुझ्या पाठीशी आहे, सोबत आहे. हा,” कृष्ण” पती, मित्र, वडील किंवा भाऊ यापैकी कोणीही असू शकतो. कधी एखादी स्त्री सुद्धा ही भूमिका निभावू शकते.
अशी कोणतीही व्यक्ती केवळ आधारच देत नाही तर समाजात तुमच्यासाठी ढाल बनवून उभी राहते.
(४) सामाजिक दृष्टिकोन आणि आजचे वास्तव.
आजच्या धावपळीच्या युगात आपण,” यश ” पहातो पण त्या यशामागे एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या पुरुषांनी किती,” मौनाचं रामायण” सोसलं आहे हे पाहत नाही. सोशल मीडियाच्या काळात तर शब्दांचे वार करणे खूप सोपे झाले आहे. एका कमेंटने किंवा एका अफवेने कोणाचही आयुष्य उध्वस्त होऊ शकतं अशा काळात केवळ,” सहनशक्ती” पुरेशी नसते तर तिथे सत्याच्या बाजूने उभा राहणारा एक खंबीर सारथी हवा असतो.
(६) आजच्या डिजिटल, सोशल मीडिया यांच्या युगात हे वाक्य पूर्वीपेक्षा जास्त लागू पडेल असं वाटतं कारण
* सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग….
आज शरीराला होणाऱ्या जखमानपेक्षा सोशल मीडिया कमेंट्स आणि ट्रोल्स द्वारे होणारे शब्दांचे वार माणसाला मानसिक दृष्ट्या जास्त मोडून काढतात तिथे मौन पाळून चालत नाही तर समर्थनाची गरज असते.
* विभक्त कुटुंब पद्धती
वाढत्या एकाकीपणामुळे माणसाची सहनशक्ती (मौन) कमी होत चालली आहे अशा काळात घरात किंवा मित्रपरिवारात एखादा कृष्ण (मार्गदर्शक किंवा आधार) असणे मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक झाले आहे नाही का?
* अस्तित्वाची लढाई
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी बाहेरील जगाशी लढावे लागते. हा लढा एकट्याने लढण्यापेक्षा जेव्हा पाठीशी खंबीर जोडीदार किंवा मित्र असतो तेव्हा ते” शब्दांचे महाभारत” जिंकणे अधिक सोपे जाते.
(७) ” कृष्ण” होण्याची जबाबदारी कोणाची?
हा विचार केवळ स्त्रियांसाठी नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होतो. आपण स्वतः कोणाचे तरी,” कृष्ण” होऊ शकतो का? जेव्हा आपली जवळची व्यक्ती शब्दांच्या महाभारतात अडकलेली असते तेव्हा तिला उपदेशापेक्षा विश्वासाच्या आधाराची जास्त गरज असते. एखाद्याला,” मी आहे तुझ्यासोबत! असं म्हणणं हे जगातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे.
निष्कर्ष:-
माणूस स्वतःच्या संघर्षाशी एकटा लढू शकतो. पण जगाच्या,” शब्दांशी” लढण्यासाठी त्याला प्रेमाच्या, विश्वासाच्या पाठबळाची गरज असते. आपण सर्वांनी कोणाचे तरी” मौन” समजावून घेण्यासाठी त्याच्या संघर्षात त्याचा” कृष्ण” बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण नाती केवळ रक्ताने नाही तर अशा संकटाच्या वेळी दिलेल्या खंबीर आधाराने टिकतात.
शेवटी इतकंच म्हणेन की,” जगण्याचं महाभारत जिंकण्यासाठी, पाठीशी खंबीर सारथी हवा असतो!”
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
