#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क
(२६/०१/२०२६)
#कृष्णसखा
#स्वप्नीलकळ्या🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
#कृष्णसखा
रेवतीच्या नवरा अत्यंत लहरी व विक्षिप्त स्वभावाचा !
शिवाय अत्यंत दारूडा. रोजच्या जीवनात तिच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलणे तर दूरच राहिले, हो- नाही शब्दांशिवाय तो तिच्याशी कधीच संभाषण करत नसे. पती म्हणून तो त्याचे कोणतेही कर्तव्य पार पाडत नसला तरी रात्री तिच्यावर पतीचा अधिकार गाजवून हक्काने शरीरसुख मिळवण्यात कोणतीही कसूर सोडत नसे.
बिचारी चुपचाप त्याचा अत्याचार सहन करीत असे.त्यातच तिला दिवस राहिले व मुलगी झाली नवऱ्याला मुलगा हवा होता.मुलगी झाल्यानंतर तर त्याचे दारू पिऊन येण्याचे प्रमाण खूपच वाढले आणि दारू पिऊन आला की त्याचा स्वतःवर अजिबात ताबा रहात नसे. त्याच्या अद्वातद्वा शिव्या देणे चालू व्हायचे.
तो दारूच्या नशेत तिला वाटेल तसे घालून पाडून बोलायचा.
इतक्या निच पातळीवर जाऊन शिव्या द्यायचा की ते शब्द ऐकवत ही नसत. रेवती एक चांगल्या विचारांची मुलगी होती.तिला हे सगळे सहन होत नसले तरी ती त्याला कधीही प्रत्युत्तर देत नसे. “मौनं सर्वार्थ साधनमं” ह्या उक्तीप्रमाणे ती वागत असे.
हा संसार सोडून कुठेतरी निघून जावे असे विचारही तिच्या मनात यायचे. पण नवऱ्याला सोडून जाणे एवढे सोपे नाही हे तिला कळत होते. समाजांत परित्यक्येचे जीवन जगणे कठीणच! मुलीसाठी सगळा त्रास, अत्याचार सहन करीत ती संसाराचा गाडा पुढे ढकलत राहिली.
नवऱ्यात मात्र तसूभरही बदल व्हायचे लक्षणं दिसत नव्हते. मनुष्य स्वभाव दुसरे काय? रेवतीला नेहमीच वाटायचे की एक वेळेस सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येते पण एकदा नवऱ्याच्या शिव्यांचा भडिमार सुरू झाला की त्याच्या “शब्दांचं”महाभारत सहन करता येत नाही. ते सोसायला पाठीशी आपल्याला एखादा भाऊ किंवा दिर असता तर तो आपल्या मदतीला कृष्णासारखा धावून आला असता. त्याने नवऱ्याला चार समजुतीच्या गोष्टी समजावून सांगितल्या असत्या.
त्याच्या धाकाने थोडा कां होईना नवऱ्याच्या वागण्यावर वचक राहिला असता. पण बिचारीचे नशीबच वाईट म्हणायचे कां ?आयुष्यभर तिला नवऱ्याच्या शिव्या खातच जगावे लागणार होते कां ?
कोणीही कृष्णसखा तिचा पाठीराखा बनून “शब्दांचं महाभारत “सोसायला पाठीशी उभा रहायला येणार नव्हता ,
नाही ना ? तुम्हाला काय वाटते?
(२८० शब्द)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नील कळ्या)🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
