# माझ्यातली मी #
……….. लघुकथा लेखन टास्क……… (२६/०१/२६)
सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं
पण…….
शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो….. या संगीता मॅडमच्या ओळीवरून लघुकथा…….
•••••••••••• सासर हेच माहेर••••••••••••
ओजस ही आई विना वाढलेली पोर. ती दोन वर्षाची असतांनाच आई गेली. वडील परदेशात. आजी आजोबांनी तिला लहानाचं मोठं करून तिचं शिक्षण पूर्ण केलं. आईचं प्रेम तिला मिळालच नाही.
आजीने ओजसला म्हटले बाळा,
तू शिक्षण घेत असतांनच घरकामातही लक्ष देत जा. कितीही शिकलीस तरी मुलीच्या जातीला घर काम हे आलंच पाहिजे.
तिने हो म्हणून मान डोलवली.
दोन एक वर्षातच तिचे लग्न ठरले. आईविना वाढलेली पोर. इतर लोक काड्या करायला लागले. तिचे कान भरायला लागले. आईविना वाढलेल्या मुलीचे लग्नानंतरचे आयुष्य हे खूप खडतर जाते. आईच्या मायेला तू मुकलीस. तुला घरकामाची सवय नाही. सासरी नवीन नाती तुला जपायची आहेत.
पण तिने ठामपणे सांगितले की घर कामाची सवय आजीने मला खूप चांगल्या प्रकारे लावली आहे. तिने दिलेल्या शिकवणीच्या आठवणींच्या साथीने मी तिच्या नावाला बट्टा लागू देणार नाही. लग्नानंतरचे आयुष्य माझे मी बघून घेईन. सगळ्यांची तोंडे चूप.
तिला वाटले आपण बोलून तर गेलो. पण आपल्यासमोरही प्रश्न उभे राहिलेत. मनात धाकधुकीने घर केले. आपल्याला आईची माया मिळाली नाही. त्याची कमी आपल्या सासूबाई भरून काढतील का? तिथे वावरताना स्वयंपाकापासून तर घरच्या चालीरीतीपर्यंत अडथळे येतीलच. त्याच्याशी सामना आपण करू शकू का?
लग्नानंतर थोड्या दिवसातच तिने सासरच्यांना आपलेसे केले. सासुने तर तिला आईची माया भरभरून दिली. थोड्या थोडक्या होणाऱ्या चुका सासूने प्रेमाने समजावून सांगितल्या. घराची जास्तीत जास्त जबाबदारी तिच्यावर टाकून तुझ्या रितीप्रमाणे घर चालविण्यास तिला प्रोत्साहित केले.
काही दिवसातच ती इतकी रूळली की तिने सासरच्या लोकांचे मन जिंकून घेतले. आजूबाजूच्या साळकाया माळकायांनी जे तिचे कान भरले होते त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप लागले.
नवऱ्याच्या साथीने तिने आत्मविश्वास तर कमावलाच पण आईविना वाढलेल्या या पोरीने सासू सुनेच्या नात्यात सुवर्णमध्य साधला. लग्नानंतर तिने एक जबाबदार पत्नी व सासूची अत्यंत लाडकी गुणी सून म्हणून आपल्या संसाराचा पाया घट्ट केला.
माहेर सोडून जातांना
पाऊल थोडं अडखळलं
सासरची नाती जपतांना
त्याच अंगणी मन रमलं.
म्हणूनच म्हणतात,
सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं
पण……
शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो.
………… शब्द संख्या……. २९३…….
………….. अंजली आमलेकर………….
