#जाहिरात लेखन, विकेंड टास्क. कथेचे शीर्षक:- बोलक्या आठवणी

#वीकेंडटास्क
#जाहिरात लेखन. (२५/१/२०२६)

कथेचे शीर्षक:- ” बोलक्या आठवणी”.

आजोबा खिडकीशी बसून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे एक टक पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आठवणींची एक मंद लकेर होती आणि डोळ्यातून अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांच्यासाठी आजचा दिवस खास होता. आज त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस! घरात पाहुणे मंडळी जमलेली. हास्यविनोदात सर्व रमलेले होते पण आजोबांचं लक्ष घरात नाही हे चाणाक्ष आजीने ओळखले.

” काय झालं हो?”आजीने जवळ जात प्रेमाने विचारले.
आजोबा हळू आवाजात म्हणाले,” अगं! मला आपलं पहिलं घर आठवतंय. जे आपण हौसेने बांधलेलं होतं. अंगणातील तुळशी वृंदावन, हौसेने लावलेले चाफा, मोगरा, पारिजात! तुझी लग्नातली गर्भ रेशमी हिरव्या कंच रंगाची पैठणी….. सगळं सगळं डोळ्यासमोर फिरतंय. अस्पष्टसं.. पुन्हा एकदा त्याच आठवणी जगाव्याश्या वाटतात.
तितक्यात त्यांचा नातू रंजन तिथे आला. त्याच्या हातात एक चंदेरी रंगाचा अल्बम होता. तो आजोबां जवळ दिला. तो उघडताच त्यांचे डोळे विस्फारले चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यात त्यांचा 50 वर्षांपूर्वीचा फोटो होता. आणखीन पुढे तोच पारिजातक, आजीचा लाजरा चेहरा, आजोबांच्या डोळ्यातलं प्रेम, पुढे रंजनच्या जन्माचा सोहळा, आई-बाबांची पहिली भेट, घरातील गणेश उत्सव अशा विखुरलेल्या आठवणी त्या क्षणी जिवंत झाल्या होत्या. प्रत्येक फोटोतील क्षणातून एक- एक गोष्ट आठवू लागली होती जणू काही लाईव्ह टेलिकास्टच!

आजोबांचा हात फोटो वरून फिरू लागला, त्यांचे डोळे पाणावले तरीही चेहऱ्यावर एक समाधान झळकत होतं. त्यांनी विचारलं,” रंजन! हे पुन्हा सर्व कसं काय शक्य झालं रे?”

रंजन हसून म्हणाला,” अहो आजोबा! वेळ तर निघून जाते. पण काही गोष्टी त्या वेळेला कैद करून ठेवतात बर का! क्षण येतात आणि जातात पण काही क्षण असे असतात जे कायमचे तुमचेच होतात.”
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनमोल क्षण, प्रत्येक हसू, प्रत्येक अश्रू, अविस्मरणीय भावना किंवा क्षण आम्ही आमच्या ” लेन्स” मध्ये कैद करतो. लग्न समारंभ असो, वाढदिवस असो, वास्तुशांती असो की कोणताही कौटुंबिक सोहळा…… आम्ही प्रत्येक फोटो काढत नाही तर आम्ही तुमच्या आठवणींना बोलकं करतो. त्यांना कायमस्वरूपी जिवंत ठेवतो. प्रत्येक फोटो मागे असते एक छोटीशी गोष्ट!.

** असेच,
” सोनेरी क्षण जपून ठेवण्यासाठी “.

संपर्क:- मधुरा कुलकर्णी फोटोग्राफी.
फोन नंबर – ७३८७७३२४८३.
आमच्या सेवा – वेडिंग, प्री-वेडिंग, इव्हेंट, पोर्ट्रेट आणि प्रॉडक्ट फोटोग्राफी.

error: Content is protected !!