#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#जाहिरातलेखन
#स्वार्थआणिपरमार्थ
“आई आज आम्ही मैत्रिणी हाफ डे घेऊन सिनेमा बघायला जाणार आहोत म्हणून आज टिफीन देऊ नकोस. बाहेरच काहीतरी “झणझणीत” मध्ये खाऊ.” रुची सकाळी सकाळी आईला म्हणाली.
“नशीब माझं, डबा तयार झाल्यावर बोलली नाहीस. काय गं तुला रात्री सांगायला होत नाही का! बरं हे झणझणीत काय आहे.”
“अगं तुला मी बोलले होते ना ऑफिसच्या बाजूला नवीन रेस्टॉरंट झालं आहे त्याचं नावच आहे असं. नाव बघूनच लोकांना मोह होतो आतमध्ये जाण्याचा. बरं चल मी पळते आता नाहीतर माझी ८.३६ चुकायची.”
रुची गेल्यावर मालती ताईंनी हुश्श केलं आणि त्यांच्या पुढच्या तयारीला लागल्या. कालच दोन किलो मसाल्यासाठी त्यांनी बाजारातून मिरच्या आणून ठेवल्या होत्या. त्यांनी इतर कामं पटापट उरकली. दोन वर्षांपूर्वी अनिल रावांचे निधन झाल्यानंतर घरात त्या आणि रुची दोघीच रहायच्या. रुचीला खूप चांगला जॉब होता. तरीसुद्धा तिच्यावर सगळा भार नको म्हणून त्या घरगुती मसाले वगैरे घरच्या घरीच करायच्या. रुचीने त्यांना अनेकदा काम न करण्याबद्दल सांगून झालं होतं तरी त्या काही ऐकत नव्हत्या. एक किलो मसाला त्यांना त्यांच्या विवाहित लेकीला, सानिकाला द्यायचा होता.
उन्हाळ्याचे दिवस होते परंतु मसाल्याचे काम करताना पंखा नको म्हणून घामाघुम होत त्या काम करत होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली. अवेळी कोण आलं म्हणतं त्या तशाच दार उघडायला गेल्या. दरवाजात रुचीला पाहून त्यांनी पदरानेच चेहऱ्यावरचा घाम पुसला.
“अगं तू सिनेमा पाहायला जाणार होतीस ना. मग लवकर कशी आलीस.”
“अगं खाऊन झाल्यावर गेलो आम्ही थिएटरला पण तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून शो कॅन्सल झाला. उन्हातान्हात कुठे हिंडणार म्हणून सगळ्यांनी घरी जाऊन ताणून द्यायचं ठरवलं.”
“हो ना मग हातपाय धुऊन झोप. एकदम चहासाठी उठ.”
“बरं तुझं हे काय चाललं आहे. किती घामाघुम झाली आहेस आणि चेहरा पण लाल झाला आहे. आई तुला किती वेळा सांगितलं तरी तुझे हे उद्योग काही थांबत नाहीत. उद्या तुला काय झालं तर मला कोण आहे गं!”
मालती ताईंनी पाहिलं रुचिचा आवाज कातर झाला होता आणि डोळ्यात पाणी होतं. त्यांनी तिला जवळ घेतलं.
“मी आता सानू दिदीलाच सांगते त्याशिवाय तू ऐकणार नाहीस.”
“अगं एवढ्या तेवढ्याने काही होत नाही. तू उगाच राईचा पर्वत करू नकोस.”
रुचीने लगेच पर्स मधून एक कागद काढून आई समोर धरला. ती जाहिरात होती “एस जी स्वाद घरचा” ह्या घरगुती पदार्थ तयार करणाऱ्या एका समूहाची. तो कागद आईच्या हातात देत ती म्हणाली,
“हे बघ आई ह्या समूहाच्या सर्वेसर्वा एक स्त्री असून त्यांनी सुद्धा वैयक्तिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी म्हणून आधी खूपच कमी प्रमाणावर असे मसाले, लोणची, पापड, पिठं विकायला सुरुवात केली. त्यांचं करणं लोकांना आवडत गेलं आणि त्यांना नियमित ऑर्डर्स मिळत गेल्या. त्यांना मदतीची गरज भासू लागली. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या गरजू महिलांना हाताशी धरलं आणि मोठ्या प्रमाणावर त्या ऑर्डर्स घेऊ लागल्या. आज “एस जी स्वाद घरचा” हा एक नामांकित ब्रँड निर्माण झाला आहे ह्याचे कारण म्हणजे त्यांचा दर्जा आणि गिऱ्हाईक म्हणजे देवासमान ही त्यांची वृत्ती. ह्यांचे सगळेच पदार्थ उत्कृष्ट चवीचे आणि किफायतशीर दरात आहेत. मुख्य म्हणजे तुमची ऑर्डर अगदी वेळेत उपलब्ध करून दिली जाते. कधीही कोणत्याही कारणास्तव दिरंगाई होत नाही. त्यांचे पदार्थ वापरून पाहणारी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही ब्रँड कडे जात नाही. रुची इतकी पोटतिडकीने बोलत असलेली पाहून मालती ताई तिला म्हणाल्या,
“अगं हो हो जरा दम घे. तू काही त्यांची ब्रँड ॲम्बेसेडर आहेस की काय!”
“अगं नाही आई पण मला वाटतं तू आता विश्रांती घ्यावीस. आता आपण कायम “एस जी स्वाद घरचा” यांचेच पदार्थ वापरायचे. आई तुला कळतंय का आपण त्यांचे पदार्थ वापरल्याने आपला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जाणार आहे. तुला घरपोच हवे ते पदार्थ हवे तेव्हा मिळू शकतील. तुला आराम मिळेल शिवाय तो वेळ तू तुझे इतर छंद जोपासण्यासाठी वापरू शकशील. दुसरा म्हणजे त्या “एस जी स्वाद घरचा” मधील स्त्रियांना जास्त काम मिळून आपली त्यांना एका तऱ्हेने मदतच होईल. आपण अशा महिलांना प्रोत्साहन द्यायलाच हवं आणि ह्या मोठ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढायला हवी.”
“रुची तुझं म्हणणं पटलं मला. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भल्याचा विचार करू शकते. आता मी पण आपल्या सोसायटी मधील इतर बायकाना नक्कीच “एस जी स्वाद घरचा” बद्दल सांगेनच.”
“आई त्यांच्या समूहाची टॅग लाइनच इतकी सुंदर आहे ना,
`मेहनत आमची, पदार्थ आमचा
स्वस्तात मिळेल स्वाद तुमच्या घरचा`
©️®️सीमा गंगाधरे
