लघुकथा लेखन टास्क (19/1/2026) कथेचे शीर्षक,” ऋण”

# लघुकथा लेखन टास्क. ( 20/1/2026)

कथेचे शीर्षक:- ” ऋण ”

शहरातल्या त्या आलिशान बंगल्यात निवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब व त्यांच्या पत्नी शांताई राहत होत्या. नोकरीनिमित्ताने त्यांचा मुलगा आणि सुनबाई परदेशात स्थाईक झाले. त्या दोघांच्या म्हातारपणाची काठी होती, ती म्हणजे लक्ष्मीबाई!. ती केवळ घरकाम करणारी नव्हती तर त्या घराचा अविभाज्य भाग बनवून गेली होती.

एके दिवशी मध्यरात्री अचानक दादासाहेबांच्या छातीत कळ आली, दरदरून घाम फुटला. शांताई घाबरून गेल्या. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता. शांताई ने मुलांना फोन लावला. पण वेळेच्या फरकामुळे तो लागलाच नाही. लक्ष्मी ला फोन करताच ती धावतच आली. तिने वेळ न दवडता रिक्षा बोलावली आणि दादा साहेबांना आधार देत, सावरत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. आजीच्या हातात पैसे नव्हते. आणि घाई गडबडीत निघाल्याने एटीएम कार्डही विसरले होते. लक्ष्मीने स्वतः जवळचे पैसे जे आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवले होते तेच पैसे काउंटर वर ठेवले. तिची ती लगबग पाहून शांताईला गहिवरून आलं, नकळत डोळ्यातून अश्रू गळाले.

काही दिवसांनी दादासाहेब बरे होऊन घरी आले. मुलाने आणि सुनेने परदेशातूनच, ” थँक्स” चा फोन केला आणि लक्ष्मीला जास्तीचे पैसे देऊ केले. त्याक्षणी शांताईने लक्ष्मीचा हात हातात घेत तिला जवळ घेतले आणि मुलाला म्हणाल्या, ” अरे बेटा! पैशाने नोकर मिळतात पण माणूस नाही, होय ना?.

खूप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षा ही महाग असते…… हे नव्याने जाणवलं. लक्ष्मी आमच्यासाठी तीच अनमोल व्यक्ती आहे “.

लक्ष्मीने शांताईला नमस्कार केला. त्यादिवशी त्या मोठ्या बंगल्यात पैशाच्या श्रीमंती पेक्षा माणुसकीच्या रुग्णांची श्रीमंती जास्त बहरली होती.
” नाते रक्ताचे असो वा नसो जो संकटकाळी निस्वार्थपणे धावतो तोच खरा आपला असतो. नाही का? “.

शब्द संख्या – 232.

सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®.

error: Content is protected !!