“खरा आधार”

1000313247.jpg

“​खरा आधार”
​विद्याचा स्वभाव अत्यंत सरळ होता. ती सर्वांशी आपलेपणाने वागायची. कोणी चुकीचे वागले तरी ती नमते घेत असे.तिच्या याच साधेपणाचा घरातील लोक फायदा घेत.सासूबाई तर नेहमी आपल्या मुलीचे म्हणजेच नणंदेचेच कौतुक करायच्या.”आमची प्रतिभा म्हणजे आमच्या खरा आधार,”असे त्या अभिमानाने म्हणत.​प्रतिभा नेहमी माहेरीच असायची. ऑफिसचे नाव सांगून आणि गोड बोलून ती आईकडून स्वतःची सर्व कामे करून घेत असे. आईच्या हातचे थालीपीठ,पिठलं भाकरी अशा तिच्या अनेक फर्माइशी असायच्या आणि सासूबाईही कौतुकाने त्या पूर्ण करायच्या. विद्याला यातले काहीच नको होते, तिला फक्त घरातील माणसांचे प्रेम हवे होते; पण तिला नेहमी उपरेपणाचीच वागणूक मिळे.
​एकदा सासूबाई अचानक आजारी पडल्या. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती (बेडरेस्ट) सांगितली होती. आता त्यांना खऱ्या आधाराची गरज होती. ज्या प्रतिभाचे लाड सासूबाईंनी आयुष्यभर पुरवले होते, आता तिची आईची सेवा करण्याची वेळ आली होती. पण घडले वेगळेच! सासूबाईंनी विद्याकडून सेवा करून घेण्यास सुरुवातीला नकार दिला आणि प्रतिभाला बोलावणे धाडले. मात्र, प्रतिभाने “मुलांच्या शाळा आणि घरची कामे” अशी थातूरमातूर कारणे सांगून हात वर केले.​विद्याला मात्र असे वागणे शक्य नव्हते. तसे करणे तिच्या रक्तातच नव्हते. तिने जुने सर्व अपमान विसरून अहोरात्र सासूबाईंची सेवा केली. विद्याची ही निस्वार्थी सेवा पाहून सासूबाईंचे डोळे पाणावले. त्या गहिवरून म्हणाल्या, “विद्या, मला माफ कर ग! कोणावर प्रेम करायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा, हे मला उमजलेच नाही. तुझ्या या निस्वार्थी त्यागाची किंमत करोडो रुपयांची संपत्ती देऊनही होणार नाही.”
​विद्या नम्रपणे म्हणाली, “आई, मला धन्यवाद किंवा संपत्ती काहीच नको, फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही मला फक्त ‘आपले’ माना, इतकेच पुरे आहे!”
​”नाही ग, गरज असताना निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही अनमोल असते!” असे म्हणत सासूबाईंनी विद्याला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
शब्द संख्या – २६८

error: Content is protected !!