“पाहिले तुला न मी तू मला न पाहिले”

inbound7445261553950160444.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क (१७/१/२०२६)
#वाक्यावरून कथा
#पाहिलेनामीतुलातूमलानाहीपाहिले

“पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!”

​आज किचनमध्ये भांड्यांचा आवाज जरा जास्तच येत होता. कारणही तसंच होतं.

“भाजीत मीठ जास्त झालंय!” हे निमित्त होतं.पण त्यामागे दिवसभराचा साचलेला थकवा आणि उतारवयात एकमेकांबद्दल वाढलेली चिडचिड होती.

​”तुम्हाला नेहमीच तक्रार करायला काहीतरी कारण लागतं. रात्री घोरता तुम्ही, त्याने माझी झोप मोडते त्याचं काय?” माधुरीने चिडून म्हणाली. मी तक्रार करते का?

​सुभाषराव पेपर बाजूला ठेवत म्हणाले, “अगं माधुरी, पण मीठ जास्त झालंय हे सांगणं गुन्हा आहे का? हल्ली तुझं कशातच लक्ष नसतं.”

​अशीच बाचाबाची सुरू असताना माधुरीच्या नजरेसमोर सत्तर-ऐंशीचा तो काळ उभा राहिला.

आजच्या या रोजच्या कुरबुरींच्या मागे किती खोलवर रुजलेलं नातं आहे, याची त्यांना अचानक जाणीव झाली.

​तो काळ सत्तरच्या दशकाचा शेवट होता.सुभाष आणि माधुरी यांचं लग्न ठरलं होतं. त्या काळी ‘चहा-पोह्यांचा’ कार्यक्रम म्हणजे लग्नाची पहिली पायरी.

सुभाष माधुरीला बघायला जाणार होता.पण ऐनवेळी त्याच्या गावात मोठा पाऊस झाला, रस्ते बंद झाले आणि तो कार्यक्रम रद्द झाला.

दोन्ही घरची ज्येष्ठ माणसं ओळखीची होती, मध्यस्थी भक्कम होती. “मुलगा गुणी आहे आणि मुलगी सुसंस्कृत आहे,” काही दाखवायची, बघायची गरज नाही. एवढ्या एका शब्दावर लग्न पक्कं झालं.

​तेव्हाचा काळ इतकाही जुना नव्हता की कोणी कोणाला बघू नये, पण नशिबाचा खेळ असा की लग्नाच्या दिवसापर्यंत दोघांनीही एकमेकांचा चेहरा पाहिला नव्हता.

दोघांच्याही मनात एकच जिज्ञासा होती, “तो कसा असेल?”, “ती दिसायला कशी असेल?”​अनोळखी चेहरे.

दोघांच्याही मनात एक राजकुमार एक राजकुमारी होती. पण घरात बोलायची हिंमत नव्हती. फक्त एकतर्फी प्रेम. पण लग्नाच्या गाठी परमेश्वर स्वर्गात बांधतो असं काहीसं.

लग्नाचा दिवस उजाडला. अंतर्पाट धरला होता. मंगलाष्टका सुरू होत्या. दोघांच्याही काळजाची धडधड वाढली होती.

‘सावधान’ शब्द उच्चारला गेला आणि अंतर्पाट सरकला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटलं.

​सुभाषला आश्चर्याचा धक्काच बसला. ही तर तीच मुलगी होती, जिला तो कॉलेजच्या वाटेवर रोज लांबून पाहायचा. तिला कधी बोलण्याची हिंमत झाली नव्हती, पण तिच्या साध्या सौंदर्याने तो सुखावला होता.

माधुरी? तिलाही विश्वास बसत नव्हता. समोर उभं असलेलं हे व्यक्तिमत्व तिच्यासाठी अनोळखी नव्हतं.

एका मैत्रिणीच्या लग्नाच्या कार्यात तिने सुभाषला पाहिलं होतं आणि मनातल्या मनात ‘असा जोडीदार मिळावा’ अशी इच्छाही व्यक्त केली होती.

​ते ‘एकतर्फी प्रेम’ आता ‘द्वितर्फी’ नात्यात बदललं होतं. इतरांसाठी ते न पाहता लग्न झालेले जोडपे होते.

पण त्यांच्यासाठी ती देवाने दिलेली एक सुंदर भेट होती.
​काळाचा महिमा.

आज चाळीस वर्षांनंतर,त्या जुन्या आठवणींनी माधुरीच्या डोळ्यांत पाणी आलं.

ती हळूच सुभाषरावांच्या जवळ गेली आणि म्हणाली, “मीठ खरोखरच जास्त झालं होतं का हो? की उगाच भांडायचं होतं?”

सुभाषरावांनी स्मितहास्य केलं. त्यांचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. त्यांनी माधुरीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, “मीठ थोडं जास्तच होतं पण त्या माझ्या घोरण्याच्या आवाजापेक्षा थोडं कमीच!

काळ किती पुढे गेला ग आता एकेकाळी गोड वाटणाऱ्या सर्व गोष्टी आता कुरबुरी मध्ये बदलून गेल्या.

पण तुझ्या त्या आठवणींच्या गोडव्या पुढे तो मीठाचा खारटपणा ते काहीच नाही.
आठवतंय? पहिल्यांदा आपण एकमेकांना पाहिलं होतं तेव्हा काय वाटलं होतं?”

न्य​माधुरी लाजून हसली. “पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!असं सगळ्यांना वाटलं, पण आपण तर एकमेकांना मनात आधीच साठवून ठेवलं होतं!”​भांडण मिटलं होतं.

संसारातल्या लहान-सहान कुरबुरी तर येणारच, पण त्याखाली दबलेलं ते जुनं, निखळ प्रेम मात्र आजही तितकंच ताजं होतं.अगदी पाहिले तुला न मी तू मला न पाहिले या गोड आठवणी गत

error: Content is protected !!