# विकेंडटास्क (१७/१/२०२६)
” पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले.” हे वाक्य वापरून कथा.
स्पर्श आपले नयन झाले….
स्नेहा म्हणाली, अजय… आपल्या लग्नाला तीस वर्षे होऊन गेली. आपण दोघेही अंध असल्याने” पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले ” तरीही तू कसा दिसत असावा हे मला माहीत आहे.
काळा सावळा आहेस पण नाक एकदम तरतरीत आहे. आता केस थोडे विरळ झालेत व थोडे पांढरे पण झालेत. तुला मिशी छान दिसते पण वाढवलेली दाढी नाही चांगली दिसत. तू खूप बारिक ही नाहीस व जाड पण नाहीस ,उंच पण नाहीस व बुटका ही नाहीस सारे कसे अगदी आखीव रेखीव….. मी तुला शोभत असेन का?
अजय म्हणाला, अगं माझी आजी नेहमी म्हणायची, अजू, तुझी बायको छान गोरी गोमटी आहे. दिसायला सुंदर आहे हो….. अगदी बाहुली सारखी नाजूक आहे ….. केस चांगले लांब व काळेभोर आहेत. तुमची जोडी अगदी शोभून दिसते हो …..
तुझ्या चेहऱ्या वरून हात फिरवून मला ते जाणवायचे. केस लांब जाड आहेत हे स्पर्शाने कळायचे, पण तरीही आता थोडे पातळ व पांढरे व्हायला लागलेत. हेही जाणवते. तू हसताना तुझ्या गालावर छान खळी पडते हे मला माहिती आहे. आई व ताई नेहमी कौतुकाने सांगतात सगळ्यांना. बाबांना तर तुझे किती कौतुक आहे.
आपण स्पर्शाने, मनाच्या कागदावर कल्पनेने एकमेकांची किती तरी चित्रे रंगवली आहेत, आपल्याला डोळे नसले तरी कधीही अडून राहिले नाही. आपल्या सुदैवाने आपली लेक आपल्या सारखी झाली नाही, पण रुप तुझे घेतले आहे. स्नेहा म्हणाली, शांत व समजूतदार स्वभाव तुझ्या सारखा आहे. किती हुशार व गुणी आहे आपली लेक. तसाच गुणी जावयी पण आहे आपला.
लोकांना आपले आयुष्य ब्लॅक एन्ड व्हाइट दिसत असेल पण सगळ्यांच्या प्रेमाने व एकमेकांच्या विश्वासाने हे आयुष्य आपण इंद्रधनुष्या सारखे रंगीत केले. आपली साथ हिच आपली ताकद आहे. या ताकदीने आपण आपल्या आयुष्यातील किती तरी चढ उतार पार केलेत. पुढेही करू याची खात्री आहेच. लग्नाच्या वाढदिवसाची सरप्राईज भेट आवडली का? हो का नाही आवडणार? सोन्याचा नेकलेस खूप सुंदर आहे. अजय म्हणाला, हो आणि तू दिलेली अंगठी हि बघ…. माझ्या बोटावर किती छान दिसते. ए… वेडा बाई तुला रडायला काय झाले? अरे हे आनंदाश्रू आहेत. ती त्याचे डोळे पुसत म्हणाली, आता तुला काय झाले रडायला……. तुझा वाण नाही पण गुण लागला मला. असे म्हणत तो हसायला लागला त्या हासण्यात तिही सामील झाली.
