#कथालेखन टास्क ( १२/१/२०२६)

# ” हक्काची माणसं कारण नाही देत वेळ देतात.”
या वाक्याला धरून कथालेखन.

कथेचे शीर्षक :- ” अंतरीचा ठेवा”.

पंढरीची वारी जवळ आली होती. विठ्ठल नित्यनेमाने वारीला जायचा. विठ्ठल गावातला साधा विणकर होता. यावर्षी पण वारीला जाण्यासाठी मनापासून तयारी केली होती. वारीला निघण्याच्या आधल्या दिवशी शेजारच्या झोपडीतील आजोबा खूपच आजारी पडले. त्यांना सांभाळणारही कोणीच नव्हतं.

विठ्ठल संभ्रमात पडला. एका बाजूला सावळ्या विठ्ठलाची ओढ होती तर दुसऱ्या बाजूला त्याच्याकडे आशेने पाहणारे आजोबा आणि शेजार धर्म. विठ्ठलाने मनाशी काहीतरी ठरवले आणि आपल्या वारकरी मित्रांना म्हणाला,” तुम्ही पुढे व्हा, मी यावेळी वारीला नाही येऊ शकत”. वारकरी म्हणू लागले,” अरे विठ्ठला! विठू माऊली तुझी वाट पाहिल की, असं कारण देऊन वारी चुकवू नकोस”.
विठ्ठल शांतपणे म्हणाला,” माऊली तर सगळीकडेच असते ना!”.

पुढचे पंधरा दिवस विठ्ठल आजोबांची सेवा करण्यात रमला. पंढरपूरचा विचारही मनात न आणता पूर्ण वेळ त्या आजोबांना दिला. वारी संपवून जेव्हा वारकरी गावात परतले तेव्हा त्यांनी एक अजबच गोष्ट सांगितली. म्हणाले,” विठ्ठला! तू वारीत नव्हतास तरी आम्हाला तू प्रत्येक मुक्कामावर भजन करताना दिसलास. हा भास होता की सत्य कळेना”.

विठ्ठल हसून त्या आजोबांच्या चरणाशी बसला आणि म्हणाला,” देह इथं होता, पण मन तिथे होतं. कदाचित देवाला माझी हीच सेवा मान्य असेल”. तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलाने ईश्वराची मूर्ती मंदिरात न शोधता माणसाच्या रूपात शोधली होती. ज्यांना आपण देवाचे रूप मानतो त्यांना संकटात, अडचणीत वेळ देणं हीच खरी भक्ती. कारण अध्यात्म ही असं सांगतं की , हक्काची माणसं कारण नाही तर वेळ देतात मग ती माणसं रक्ताची असो की श्रद्धेची. वेळेचा त्याग ही सर्वात मोठी पूजा ठरते.

” वेळ हीच खरी नात्यांची गुंतवणूक,
आणि माणुसकी हाच खरा धर्म!”

शब्द संख्या :- २३४.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®.

error: Content is protected !!