# लघुकथा लेखनटास्क (१२/१/२०२६)
” हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात…..
या वाक्या वरून लघुकथा.
परीक्षा…..
स्वातीने सुयशला फोन केला की, मी पत्ता मेसेज करते तिथे तू लगेच ये. असे म्हणून तिने लगेच फोन बंद केला व पत्ता मेसेज केला. ती तिथे मुद्दामच जरा उशीरा गेली. ती लांबून बघत होती. तो अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. ती जवळ येताच त्याने तिचा हात हातात घेत, काळजीने विचारले, तू बरी आहेस ना? तुझा मेसेज बघून खूप काळजी वाटली. हो.. मी बरी आहे पण….. पण काय?
अरे आज मला एक मुलगा बघायला येणार आहे. तुझे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपण घरी सांगणार होतो. तुला या प्रोजेक्ट साठी जर्मनीला जावे लागणार आहे. तू खूप बिझी आहेस, तर … आता आपण काय करायचे? काय म्हणजे…. अगं मी तुझ्या घरी येतो, तुझ्या आई बाबांची आपण परवानगी घेऊन लग्न करू. स्वाती म्हणाली, अरे… पण तुझे प्रोजेक्ट पूर्ण झाले नाही. तुला त्यामुळे वेळ कसा मिळणार?
अगं, मला माझा प्रोजेक्ट जितका महत्त्वाचा आहे तेवढेच आपले प्रेम व लग्न पण महत्त्वाचे आहे. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मी सगळे व्यवस्थित पार पाडीन. स्वातीला हे ऐकून खूप आनंद झाला. याचे खरंच आपल्यावर प्रेम आहे व याला लग्न ही करायचे आहे. हक्काची माणसं वेळ आली की, कारणे न देता वेळ देतात याची तिला खात्री पटली. आपण घेतलेल्या परीक्षेत सुयश पास झाला. याचा आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
शब्द संख्या : २२५
