#माझ्यातली मी
#ब्लॉग लेखन टास्क (५/१/२०२६)
लघु कथा :”नात्याची वीण”
वडील गेल्यानंतर वर्षभराच्या आत अमृताचं लग्न होणं गरजेचं होतं.अख्खं घर दुःखात असतानाच लग्नाची बोलणी सुरू झाली. वडिलांनी अमृताच्या लग्नासाठी आयुष्यभराची पुंजी साठवून ठेवली होती.पण सुमितची पत्नी, नीलम, हिने तिथेच आपला डाव साधला.
”बाबा जाऊन अजून वर्षही झालं नाही, लोक काय म्हणतील आपण असं थाटामाटात लग्न केलं तर? चारचौघांत हसू होईल आपलं,” असं भावनिक राजकारण नीलमने केलं. तिचा खरा हेतू वडिलांचे पैसे वाचवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा होता. आईला आणि अमृताला नीलमचा स्वार्थ स्पष्ट दिसत होता. वडिलांची इच्छा काय होती, हेही त्यांना माहीत होतं. पण, “आत्ता कुठे सावरतोय आपण, घरात नवीन भांडणं नकोत,” या विचाराने मायलेकींनी गळचेपी सहन केली आणि शांत राहणं पसंत केलं. वडिलांची पुरेशी तरतूद असूनही अमृताचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं.
लग्न पार पडलं खरं, पण सुमितच्या मनात ही गोष्ट सतत खटकत होती. आपल्याला हवं असूनही आपण बहिणीसाठी काही करू शकलो नाही आणि पत्नीच्या बोलण्याला बळी पडलो, याची त्याला टोचणी लागली होती. तो अस्वस्थ होता आणि नीलमवरचा त्याचा रागही वाढत होता.
एके दिवशी सुमित आई आणि अमृतासमोर व्यक्त झाला. तेव्हा अमृताने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “दादा, जे झालं ते विसरून जा. हो, बाबांनी माझ्यासाठी खूप स्वप्नं पाहिली होती; पण त्या पैशांपेक्षा तुझं घर आणि तुझं सुख माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. लोकांनी काय म्हटलं असतं, यापेक्षा आपल्या घरातली शांतता महत्त्वाची होती. आज जर तू यावरून वहिनीशी भांडला असतास, तर आपल्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण झाला असता. आपल्या कुटुंबाची वीण टिकवून ठेवण्यासाठी तुला आणि मला दोघांनाही शांत राहणं गरजेचं होतं.”
सुमितला तेव्हा खऱ्या अर्थाने नात्याची समज आली. वडिलांनी केलेली ती आर्थिक तरतूद अमृताला ‘मिळाली’ नाही, पण त्या ‘न मिळण्याने’ तिला एक प्रगल्भता दिली आणि सुमितला नात्यातल्या त्यागाची किंमत समजली. काही गोष्टी न मिळूनही माणसाला आयुष्यभराची मोठी शिकवण देऊन जातात.
एकूण शब्दसंख्या: २९५

