# ब्लॉगलेखनटास्क (५/१/२०२६)
‘ काही गोष्टी आयुष्य बदलुन टाकतात,
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. ‘
वरील वाक्यावरून कथा….
जे होते ते चांगल्या साठीच …..
आई वडीलांचे छत्र नसेल तर गुण सुध्दा दुर्गुण ठरतात व रूप, सौदर्य तर शापच ठरतो. मनालीची अशीच अवस्था झाली होती. आईवडिलांची एकुलती एक, दिसायला सुंदर, सालस, हुशार गुणी मुलगी, आईवडिलांच्या अपघाती निधनाने अनाथ झाली. अर्धवट वयातली, दिसायला सुंदर त्यामुळे सगळे नातेवाईक तिची जवाबदारी घ्यायला तयार नव्हते. शेवटी तिच्या मावशीने तिची जवाबदारी घेतली.
जवाबदारी घेताना अनेक अटी घातल्या. घरात कामाला मदत करायची, बाहेर विनाकारण जायचे नाही. जाताना बरोबर कोणाला तरी घेऊन जायचे. शाळेत ती स्वतः सोडायला व आणायला जायची. आजूबाजूच्या लोकांशी बोलायचे नाही. आणि मनाली अगदी आज्ञाधारक होती. ती मावशीने सांगितले तसेच वागत होती. हळूहळू घरातली कामे यायला लागली. तिच्या आई सारखी तिच्या हाताला चव होती. हुशार असल्याने ती प्रत्येक गोष्ट सहजपणे आत्मसात करत होती.तिच्या वागणुकीमुळे मावशी पण तिच्याशी प्रेमाने वागायची स्वतः च्या मुलांत व हिच्यात कधी भेदभाव केला नाही. मनाली ग्रॅज्युएट झाली व एका कंपनीत तिला नोकरी लागली. कामाच्या ठिकाणी मनाली मनापासून व इमानदारीने काम करत होती. मावशी मुळे तिला चांगल्या सवयी लागल्या होत्या त्याचा तिला आयुष्यात खूप चांगला उपयोग झाला.
मावशीने तिच्या मैत्रिणीचा मुलगा सुदेश बरोबर लग्न लावून दिले. सुदेश पण मोठ्या कंपनीत वरच्या पदावर काम करत होता. घरात आई बाबा, एक बहीण व एक भाऊ होते. मनालीने आपल्या गोड बोलण्याने व आपलेपणाने सर्वांची मने जिंकली.
मनाली एकदा माहेरी मावशी कडे रहायला आली होती. रात्री दोघींच्या छान गप्पा रंगल्या होत्या. मनाली नवर्याचे सासरच्यांचे कौतुक करत होती. आपल्या भाचीने किती मनापासून सर्वांना आपलेसे केले हे ऐकून तिचे मन भरून आलू. मावशी म्हणाली, मनू… लहानपणी मी तुझ्याशी जरा कठोरपणे वागले पण काय करू…. माझा ही नाईलाजा होता गं. तुझी जवाबदारी अचानक माझ्यावर आली. ती व्यवस्थित सांभाळण्यासाठी मी कठोर झाले. पण खरंच मनू, तुझा मला अभिमान आहे. माझे आशिर्वाद व शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत.
मनाली मावशीला मिठी मारून म्हणाली, अगं तू माझी मावशी नसून आईच आहेस. तू जे कलेस ते माझ्या भल्यासाठीच. तुझ्या संस्कारांमुळे, शिस्तीचा मला फायदाच झाला. यापुढे तू स्वतः ला दोष देवू नकोस. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात. तसेच मी तुमच्या कडे येऊन माझे आयुष्य बदलले. आईबाबा नव्हते पण तू व काकांनी माझ्या आयुष्याला आकार दिलात.
