#कथालेखनटास्क (३०/१२/२५)
कथेचं शीर्षक:- ” आईचा फोन”.
रेल्वे स्टेशन. रात्रीचे 11 वाजलेले, तरीही गजबजलेलं होतं. सगळीकडे घोषणा, धापळ, गर्दी. समीर रेल्वेची वाट पाहत होता. सतत थोड्या थोड्या वेळाने त्याचा फोन वाजत होता. एकच नाव,” आई”.
आई दिवसातून सात ते आठ वेळा काळजीपोटी फोन करायची. फक्त खुशाली कळावी हा हेतू किंवा रागाच्या भरात केलेल्या सूचना, लागेल असं बोलणं, शेजाऱ्यांकडे त्याची केलेली तक्रार, समजून न घेता घेतलेले निर्णय. याची कायमची टोचणी त्याच्या मनाला लागली. त्या सर्वांमुळे मनाने समीर आई पासून दूर गेला होता. ती नेहमीच चुकते असा त्याचा ठाम विश्वास होता.
प्लॅटफॉर्मवर समोरच एक वृद्धा बसली होती. तिच्याजवळ जुन्या काळातला लँडलाईन रिसिव्हर होता. पण तो तिच्या नातवाच्या खेळण्यातला होता. ती हळूच बोलत होती…….
” हॅलो….. ऐकू येतय का? ”
” हॅलो, मी आई बोलते!”
समीर कुतूहलाने पाहू लागला, तिच्याजवळ जाऊन विचारलं,” आजी! कुणाशी बोलताय?
ती केविलवाणं हसली, म्हणाली,” कुणाशी बोलणार? माझ्या मुलाशी! पण…. पण तो फोन उचलत नाही”
” मग?”
मग काय…. बोलणं थांबत नाही. चूक माझीच होती. तसं पोरगं ही माझंच ना!
तिच्या या वाक्याने समीरला काही जाणवलं, तो ओशाळला. त्याच क्षणी पुन्हा फोनची रिंग वाजली.
आईचा….
त्यांनी रिसिव्हर घेतला, पलीकडून आवाज आला,” तू रागावला असशील ना? कधी कधी माझ्या म्हातारीचं चुकतच. पण तुझी काळजी वाटते ना!”
समीरच्या डोळ्यात पाणी तरळले, ट्रेन सुटण्याची घोषणा झाली. तो म्हणाला,” आई! मी येतोय ग. थोडा उशीर झाला, एवढेच…”
प्लॅटफॉर्म वरची ती वृद्ध महिला दिशेनाशी झाली होती.
समीरला जाणवलं….
” आवडती व्यक्ती कितीही चुकली, तरीही तिला सोडता येत नाही. कारण चुका मोजता येतात पण…. पण माणूस हरवला, तर तो परत मिळत नाही ना?
शब्द संख्या:- २४३.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
