#माझ्यातली मी
#लघुकथा
#विशेष व्यक्ती
अनिकेतच्या पप्पांची आता रिटायरमेंट झाली आहे . एके काळी ते एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जायचे . आपल्या मार्गदर्शनाने मुलांचे भवितव्य त्यांनी खूप चांगल्या प्रकारे घडवले होते , चांगल्या संस्कारांची शिकवण त्यांनी दिली , एका योग्य मार्गाने मुलांना वाढवलं . अनिकेत वर ते जीवापाड प्रेम करायचे , म्हणून अनिकेत सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो … आता बाबांचं वय झालं आहे म्हणून काही प्रेम कमी होणार नाही .,उलट बाबांनी मला लहानपणी जसं सांभाळलं तसं आता आपण बाबांना सांभाळायचं या दृष्टीने तो बाबांकडे पाहतो . आणि त्यांची व्यवस्था करतो .. कारण त्यांच्या मार्गदर्शनाने त्याला एक उत्तम जीवन लाभलं आहे हे तो कधीच विसरणार नाही .. आणि त्याच्या जीवनात त्यांच्याविषयी एक विशेष स्थान आहे .
पण वयानुसार माणसांमध्ये खूप बदल होऊन जातात . तरुण वयात ते अतिशय शिस्तबद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जायचे . त्यांची शिस्तबद्धता नियम हे सारे काटेकोरपणे त्यावेळी त्यांच्याकडून पाळले जायचे पण आता वय झाल्याने त्यांची स्मरणशक्ती खालावली आहे. आता प्रत्येक गोष्ट दहा दहा वेळा सांगायला लागते. जेवताना चहा पिताना त्यांच्याकडून खूप सांडलं जातं , दिलेले पैसे हरवून जातात … या सगळ्याचा अनिकेतच्या बायकोला कधी कधी खूप त्रास होतो ….त्यावेळी ती अनिकेतला म्हणते सुद्धा की तुम्हाला त्यांच्या बद्दल कधीच राग येत नाही का ? त्यावर हसतच अनिकेत म्हणतो की , आवडत्या व्यक्तीने कितीही चुका केल्या तरी सांभाळून घ्यावं लागतं कारण त्या चुकांपेक्षा ती व्यक्ती महत्त्वाची असते .
रूपाली मठपती …
