माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क
विषय – आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतात कारण चुकी पेक्षा ही व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.
****** खंत ******
हो मिहीर,खरं आहे आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतात कारण चुकी पेक्षा ही व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. पण त्यामुळे ती आवडती व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला लागते .किती वेळा तू चुकलास किती वेळा मी माफ केलं.
दरवेळेला तू म्हणायचा,की आता पुढे नाही असं करणार,पुन्हा नाही चूक करणार.पण प्लीज मला परत परत विचारू नको की माझ्याकडून अशी चूक का झाली,मी तुला नाही सांगू शकत मी माफी मागतो तुझी,मी पुन्हा नाही चुकणार.
पण तू पुन्हा पुन्हा चुका करतो, पुन्हा पुन्हा केलेल्या चुकांना गुन्हा म्हणतात.जो तू केलास माझ्या आत्म्याचा ,मानसन्मानाचा खून केलास.
माझ्या आई,वडिलांनी माझ्यावरती असे संस्कार केलेत की परधन ,परस्त्री / परपुरुष दोघांच्या नादी लागणं म्हणजे पुढचे शंभर जन्म कुत्र्याचा मिळतो,त्यामुळे आयुष्यात चांगलं कर्म करावं .मी तुझ्या आई-वडिलांना विचारू का की तुम्ही नाही का तुमच्या मुलावर असे संस्कार केलेत? खुशाल तू परस्त्री च्या नादी लागलास. किती मोठा माझा विश्वासघात केलास. काय वाटलं असेल मला. तू तिच्यावरती किती पैसे उधळलेस? का असं करतोयस? ती तुला ब्लॅकमेल करते का? खरं काय ते सांग ना मी तुला शब्द देते मी तुला सोडणार नाही कारण तुझ्यावरती अजूनही तितकच प्रेम करते.
जेव्हा जेव्हा मी तुला विचारते तेव्हा तेव्हा फक्त तू डोळ्यात पाणी काढतो .खाली मान घालून घेतोस. त्याच्याने प्रश्न सुटणार आहेत का? तू तर काही बोलतच नाही. तोंडाला कुलूप लावून बसलायस. कोणापुढे माझं दुःख मांडू ? तुझ्या आई-वडिलांना, माझ्या आई वडिलांना,आपल्या मुलांना? काय तुझं स्थान राहील त्यांच्या नजरेमध्ये याचा कधी विचार केला आहेस? वाईट या गोष्टीचा वाटतं की तुझं स्थान जर त्यांच्या नजरेतून उतरला ना तर तेही मला सहन नाही होणार.पण तू काहीच बोलायचं नाही ठरवलं.
आता याच्या वरती एकच पर्याय..
माझ्या मुलांची लग्न झाली की मी देवाला प्रार्थना करेल की मला मुक्ती दे ,नको मला हे असं फसव आयुष्य .माझी शेवटची इच्छा हिच असेल की माझ्या प्रेताला तुझ्याऐवजी माझा मुलगा अग्नी देईल कारण तो हक्क तू गमावला आहेस.तू दिलेली आयुष्यभराची खंत घेऊन मी ह्या जगाचा निरोप घेईल.
सौ स्वाती येवले
