#माझ्यातलीमी
#लघुकथा(२९/१२/२०२५)
#स्वप्नीलकळ्या 🥀
#योग्य_निर्णय
#विषय:—“आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती महत्वाची असते.”
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
#योग्य_निर्णय
कित्येक महिन्यांपासूनअनुश्रीची झोप कोसो दूर पळाली होती. तिला आठवले…
अमितसारख्या रुबाबदार,हॅंडसम इंजिनिअर मुलाच्या प्रथमदर्शनी ती प्रेमात पडली.सुंदर,गोरीपान , स्मार्ट ,एम.बी.ए.अनुश्री त्याला आवडली नसती तरच नवल!
लगेच साखरपुडा व दोन महिन्यांत लग्न. लग्नानंतर हनिमून व नवलाईचे सहा महिने एकमेकांच्या प्रेमाच्या वर्षांवात कसे गेले ते कळलेच नाही.
एक दिवस ऑफिसमधून आल्यावर मात्र अमितने बाॅम्ब टाकला. हातात दुसरी नोकरी नसतांना अचानक …
“मी आज नोकरीचा राजीनामा देऊन आलो” असे सांगितले.
अनुश्रीसाठी धक्काच होता .तिची नोकरी होतीच, पण…. फ्लॅट व कारचे हफ्ते ?
दुसरी नोकरी मिळेपर्यंत अमित घरीच मस्त आराम करत होता.
हळूहळू त्याची बेफिकीरवृत्ती अनुश्रीच्या लक्षांत यायला लागली होती.दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली आणि वर्ष -दिडवर्ष
होत नाही तर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती.असे वारंवार व्हायला लागल्यावर ह्या धरसोड वृत्तीचा अनुश्रीला खूपच त्रास व्हायला लागला .त्यांच्यात वाद व हळूहळू भांडणं व्हायला लागले. हिच्या नोकरीच्या भरवशावर सगळे नीट पार पडतेय म्हटल्यावर तो बिनधास्त सिगरेट फुंकत घरी पडून रहायचा.”जो होगा वो देखा जायेगा “ही प्रवृत्ती वाढत चालली होती.तिची ओढाताण त्याच्या लक्षांतच येत नव्हती.एक दिवस कहरच झाला….
वाद होऊन भांडण झाले आणि रागाच्या भरात अमितने तिच्यावर हात उगारला.आता मात्र तिची सहनशक्ती संपली व तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला व माहेरी निघून आली.
तेव्हापासून गेले सहा महिने झाले ती माहेरीच होती. अमितने तिला अनेकदा फोन केले. पण मला यापुढे फोन करू नकोस व भेटायचाही प्रयत्न करू नकोस असे तिने सांगितले.आईबाबांना मुलीची अवस्था बघवत नव्हती.
जरी ती त्याच्याशी बोलत नव्हती तरी एक ही क्षण ती त्याला विसरू शकत नव्हती. अगदी मनापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती.
आज तिने ऑफिसला दांडी मारली.दुपारी अचानक अमित आईकडे आला. त्याला बघताच, “काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची,” असे मनांतच म्हणाली. आईने खुणावताच तोही तिच्या मागोमाग खोलीत जाताच दोघांचाही बांध फुटला.एकमेकांना घट्ट मिठी मारत दोघेही खूप वेळ रडत राहिले.
अमित खूप हळवेपणाने तिच्या कुशीत शिरला, व पुन्हा पुन्हा मला माफ कर अनु, “तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही.मी तुझी शपथ घेतो की मी यापुढे तुला त्रास होईल असे अजिबात वागणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो .मी खुप मूर्खासारखा वागलो तुझ्या सोबत” असे वारंवार म्हणत राहिला.
त्याचक्षणी अनुने निर्णय घेतला आता अमितला सोडून अजिबात रहायचे नाही. ”
“अमितच्या चुकांपेक्षाही तो माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे” असा निर्णय ती आईबाबांना आज निर्धाराने सांगणार होती.
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नील कळ्या)🥀
(३२०शब्द)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
