#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखनटास्क (२९/१२/२५)
#उपरती
वाक्य:
आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते
“अमिता तुला आता काही वाटत नाही पण जेव्हा आई बाबांना कळेल ना तेव्हा ते तुला घरातून हाकलून द्यायला पण कमी करणार नाहीत.”
“हो पण आई बाबांना कळेलच कस! तुझ्यावर त्यांचा खूप विश्वास आहे. मी तुझ्या काळजाचा तुकडा आहे त्यामुळे तू त्यांना काही सांगणारच नाहीस.”
“हे बरं आहे तुझं. मी किती काळ तुला सांभाळणार. मीच कशाला एखादी बाहेरची व्यक्ती पण त्यांना सांगू शकते ना.”
आज पुन्हा नमिता नेहमीप्रमाणे अमिताला समजावत होती. ह्या दोघी बहिणी राजन आणि रंजना राजे ह्यांच्या मुली, ज्यांच्या घरातील वातावरण अगदी सर्व रुढी, परंपरा पाळणाऱ्या बाळबोध वळणाचे होते. कॉलेजची हवा लागली आणि अमिताच्या वागण्यात संगतीमुळे बदल झाला. दोघींचा मित्रमैत्रिणींचा एकच ग्रूप होता. आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता. अर्थात त्यातही नमितासारख्या एक दोघी होत्या.
सगळे एकत्र जमले की कधीतरी मुली पण मद्य प्राशनाची चव अनुभवत होत्या. नमिता सगळ्यापासून अलिप्त रहायची. अमिता मात्र त्यांच्या आग्रहाला बळी पडायची. नमिताने तिला वेळोवेळी आवरायचा प्रयत्न केला पण कसं असतं ना एखादी व्यक्ती परिणामांचा विचार न करता मोह आवरू शकत नाही. एकदा तर तिने कहरच केला. अमिता कोणीतरी चॅलेंज केलं म्हणून एकावर एक पेग पितच राहिली. तिला चालताही येईना. शेवटी नमिताने घरी फोन करून सांगितलं खूप उशीर झाल्यामुळे आम्ही एका मैत्रिणीच्या घरी राहतो.
दुसऱ्या दिवशी घरी आई बाबांचा ओरडा नमितालाच खावा लागला. बाबा खूप चिडले,
“पुन्हा असं वागलात तर सातच्या आत घरात यावं लागेल.”
शेवटी बाबांना ही गोष्ट कळलीच तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीसाठी नमिताला जबाबदार धरलं. बाबा म्हणाले,
“तू कधीच चुकणार नाहीस आणि हिलाही चुकीचं वागू देणार नाही ह्या विश्वासाने आम्ही तुम्हाला परवानगी दिली.”
“बाबा खरं आहे तुमचं. ही प्रत्येक वेळी मला सांगायची मी पुन्हा असं करणार नाही. शेवटी काय
आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. हिला सांभाळून घेतलं ही माझीच चूक झाली.”
“आई, बाबा आणि नमिता मला आता पश्चाताप होतो आहे माझ्या वागण्याचा. मला माफ करा.”
उशिरा का होईना अमिताला उपरती झाली.
©️®️सीमा गंगाधरे
शब्दसंख्या : २९८
