सरत्या वर्षाला निरोप देताना… २०२५ कडून २०२६ कडे सुपूर्द!
“सरले वर्ष, सरली वेळ, आठवणींचा उरला खेळ!”..
हो! खूप काही करायचं राहून गेलंय.वयाचा एक टप्पा ओलांडताना मागे वळून पाहिलं की प्रश्न पडतो – काय कमावलं आणि काय गमावलं?
याचा ताळेबंद मांडणं कठीणच आहे. नियतीने काही ठिकाणी भरभरून दान दिलं, तर काही ठिकाणी मात्र आपली माणसं आणि काळ हिरावून नेला.
सुखद अनुभवांपेक्षा काही वेळा दुःखद अनुभवच जास्त आले.सरत्या वर्षाला निरोप देताना मनात विचार येतो की, वर्षभराचा हिशोब अजून बाकीच आहे.
रोज नवीन काहीतरी करायचं ठरतं, पण संसाराच्या व्यापात ‘उद्याचा उष:काल’ होतच नाही, अशी काहीशी भावना मनात दाटून येते.
संसारात गुरफटलेल्या माझ्यासारख्या एका साध्या गृहिणीने सरत्या वर्षाला निरोप तरी काय द्यावा? तिच्या मनःपटलावर नवीन असं काय असेल?
पण यावेळी काहीतरी वेगळं आणि समृद्ध आहे. गेल्या वर्षात माझं लिखाण थोडं मागे पडलं होतं. शब्दांशी असलेली गट्टी जणू तुटल्यासारखी वाटत होती, पण सरत्या २०२५ ने मला पुन्हा शब्दांशी जोडलं. ही माझ्यासाठी सर्वात मोठी ‘वैचारिक कमाई’ आहे.
या वर्षाने मला फक्त वयाचा आकडा पुढे सरकवण्यातच मदत केली नाही, तर सातासमुद्रापारची क्षितिजेही दाखवली. लेकीकडे आणि लेकाकडे झालेली माझी परदेशवारी हे या वर्षातील माझे सर्वात मोठे संचित!
तिथं भेटलेली नवीन माणसं, वेगळी संस्कृती आणि तिथली शिस्त पाहून माझं अनुभवविश्व समृद्ध झालं. घराच्या चार भिंतींच्या पलीकडेही एक अथांग जग आहे आणि तिथेही आपण तितक्याच आत्मविश्वासाने वावरू शकतो, हा सकारात्मक बदल या वर्षाने मला दिला.
सकारात्मक आणि नकारात्मकतेच्या हिंदोळ्यावर नववर्षाचे झोके घेताना,कधी गती मंदावली तर कधी खूप उंचावर गेल्याचा भास झाला. जेव्हा झुल्याचा झोका खूप उंचावर जातो, तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते.
जणू संपूर्ण ब्रह्मांड जवळ भासते. अशा वेळी मनाची द्विधा मनस्थिती होते,पण तिथेच ‘आशावाद’ महत्त्वाचा ठरतो.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या आपण किती जवळ जायचे याला मर्यादा असल्या तरी, तिथल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला मुळीच हरकत नाही.
जुन्या आठवणींच्या डायरीतील नकारात्मक पानं आता मला मुडपून टाकायची आहेत. राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याच्या ईर्षेने आता नव्या वर्षाचा आढावा घ्यायचा आहे. तसं पाहता २०२५ हे वर्ष काही बाबतीत आव्हानात्मक होतं.
नैसर्गिक आपत्तींनी महाराष्ट्र होरपळून निघाला, माणूस माणुसकी विसरला की काय अशी भीती वाटली. पण या सगळ्या अनुभवातून २०२५ ने जगण्याचं एक नवीन सूत्र शिकवलं. ‘जे वाईट घडलं ते विसरायचं आणि जे चांगलं मिळालं ते वेचून पुढे चालायचं’, हेच या वर्षाचं फलित.
आयुष्याची डायरी पुन्हा एकदा कोऱ्या पानाने सुरू करायची आहे. नकारात्मकता मागे सोडून, सकारात्मकतेने पुढची पानं सुविचारांनी सजवायची आहेत. आपण संकल्प तर सगळेच करतो, पण ते कृतीत उतरवणे जास्त महत्त्वाचे.
दुर्दैवाने नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री रंगणाऱ्या ‘मस्तीच्या ग्लासात’ अनेक संकल्प विरून जातात. दिवस, महिने आणि वर्षे भुर्रकन निघून जातात, याचा हिशोब लावायला आपण विसरतो.कालचक्र आपलं काम चोख बजावत असतं.
जुन्याला निरोप देणं अनिवार्य आणि नव्याचे स्वागत करणं अपरिहार्य आहे. माझ्या ‘संकल्पांच्या मंत्रिमंडळाचे’ खातेवाटप तर मी आधीच केले आहे.
ज्यात ‘आनंद मंत्रालय’, ‘प्रवास खाते’ आणि ‘साहित्य विभाग’ यांना मानाचे स्थान दिले आहे. या माझ्या वैयक्तिक सरकारला यशस्वी करण्यासाठी मला तुमच्यासारख्या वाचकांची साथ हवी आहे.
चला तर मग, २०२५ ला कृतज्ञतेने निरोप देऊया आणि त्यातील गोड आठवणी २०२६ च्या खजिन्यात साठवूया. हेवेदावे, जातीपाती आणि नकारात्मक बातम्यांच्या पलीकडे जाऊन, आपल्या ओंजळीतलं मुठभर सुख इतरांना देऊया.एकमेकांच्या कलागुणांचा आदर करूया आणि आयुष्याची एक ‘सुखद कहाणी’ लिहूया.
“झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे!”
आपणा सर्वांना नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
