तूच २०२६ म्हणून परत ये

# विकेंडटास्क
# गुडबाय २०२५ (२८/१२/२५)

तूच २०२६ म्हणून परत ये….

सुहास आणि शर्वरी गप्पा मारत बसले होते. सुहास म्हणाला, शर्वरी… हे वर्ष आपल्या साठी एक सोनेरी वर्ष होते. सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. आपल्या दोघांना प्रमोशन मिळाले. नवीन स्वतःचा चार खोल्यांचा फ्लॅट घेतला. आणि आता पाच वर्षा नंतर गोड बातमी…
शर्वरी म्हणाली, अरे या तर चांगल्या गोष्टी आहेतच पण…. खरा आनंद याचा आहे की, आपल्या आईबाबांची नाराजी दूर झाली. त्यांनी आपल्याला माफ केले. आईबाबा आता आपल्याकडे राहायला आले. तुझे भाऊ बहिण आपल्याशी बोलायला लागले.

अजून मला आपली पहिली भेट आठवते. तुझ्या कंपनीत मी मुलाखती साठी आले होते, व अचानक काही कारणामुळे मुलाखत रद्द झाली. माझ्या डोळ्यात पाणी आले, हे तू बघितलेस व म्हणाला की, चला… आपण समोरच्या टपरीवर चहा घेऊया. मी पण काही आढेवेढे न घेता आले. तू चहा पीत मला विचारले की, तुमच्या डोळ्यात पाणी का आले? मी म्हणाले मला नोकरीची खूप गरज आहे. आणि मग मी तुला सर्व सांगितले. तू म्हणालास, काळजी करू नका. माझ्या मित्राच्या कंपनीत आपण जाऊ व त्याच्याशी बोलू. त्याच्या कडे तुमच्या योग्य काम नसले तरी तो त्याच्या ओळखीने तुम्हाला नक्की काम देईल आणि तू मंगेशला फोन केला व आपण त्याच्याकडे गेलो व काम मिळाले तेही माझ्या आवडीचे.

मग वरचेवर आपले आधी फोनवर बोलणे व्हायचे व नंतर भेटी वाढल्या, मैत्री झाली …. मग आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. लग्न करायचे ठरवले. मी अनाथाश्रमात वाढले होते म्हणून तुझ्या घरून विरोध झाला. मग भाड्याने घर घेतले व रजिस्टर लग्न केले. माझ्या मुळे तुझे सगळे नातेवाईक नाराज आहेत याचे मला खूप वाईट वाटत होते. आपण दोघांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. पण आपल्या गोड बातमीने त्यांनी आपल्याला माफ केले याचा खरंच आनंद झाला. आपले बाळ लकी आहे. त्याने येण्या आधीच सर्वांना एकत्र आणले. हे वर्ष खूप चांगले गेले. याला गुडबाय करताना खूप वाईट वाटते. पण आपण थांबवून ते थांबणार नाही हे माहीत आहे म्हणूनच या वर्षाला म्हणावेसे वाटते की तूच २०२६ म्हणून परत आमच्या आयुष्यात ये.

error: Content is protected !!