#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखनटास्क (२२/१२/२५)
#योग्यसल्ला
वाक्य : माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही.
अचला खूप हुशार मुलगी. तिने ठरवलं होतं पदवीधर झाल्यावर एक चांगली नोकरी मिळवायची. त्याकाळी पदवी बरोबर अजून एखाद्या खास ज्ञानाची जोड असली की नोकरी मिळणे सुलभ व्हायचं. म्हणूनच अचलाने पदवी घेता घेता टायपिंग शॉर्टहॅन्डचा कोर्स केला होता.
सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी हा क्लास. तिने योग्य निर्णय घेतला होता.
ती आणि तिच्या मैत्रिणींनी जिथे अर्ज केला होता त्या सगळ्या ठिकाणाहून तिला मुलाखती साठी बोलावलं होतं. इथे बाकीच्यांना कुठून बोलावणं येतं का वाट पहावी लागत होती. हिने जिथे जिथे मुलाखत दिली होती तिथून तिची निवड झाल्याचं तिला पत्र आलं होतं. त्या सर्वांमध्ये दोन आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँका होत्या, एक अग्रगणी महानगर पालिका होती आणि एक तर नावाजलेली विमान कंपनी होती. तिला अगदी सातवे आस्मापे असल्यासारखं वाटत होतं.
तिचं एक मन सांगत होतं की लहानपणापासून तिने बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. इथे पदोन्नतीच्या खूप संधी होत्या. एकदा तिला वाटत होतं महानगर पालिकेत जरा आरामाची नोकरी असेल पण तिथे स्टेटस नव्हतं.आताच्या घडीला तिला सर्वात आकर्षक वाटत होती ती विमान कंपनीतली नोकरी! इथे तिला फुकट विमान प्रवासाची संधी मिळणार होती. विमान कंपनीत एकदम झोकदार वातावरणात, ताठ मानेने नोकरीची संधी मिळणार होती.
इतक्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडताना तिच्या मनाचा खूपच गोंधळ उडाला होता. तिने ठरवलं आपण आपल्या बाबांचा सल्ला घेऊया. त्यांचा अनुभव दांडगा आहे.
“बाबा तुम्हाला माहित आहे ना मला चार आकर्षक संस्थांकडून नोकरीसाठी आमंत्रित केलं आहे. मी खूप गोंधळले आहे. तुम्ही सांगा ना!”
“आता तू विचारतेस म्हणून सांगतो. हे बघ नोकरी निवडताना फक्त आता ह्या घडीला जी आकर्षक दिसते ती स्वीकारून उपयोग नाही. जी तुझ्या भविष्यासाठी शाश्वत आहे, त्याचप्रमाणे आपलं उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करणारी नोकरी स्वीकारावी.”
“म्हणजेच बाबा मी बँकेत नोकरी स्वीकारावी, हो की नाही! कसं आहे ना बाबा माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही. तसेच माझं झालंय. तुम्ही मला योग्य सल्ला दिलात. नमस्कार करते, आशीर्वाद द्या.”
©️®️सीमा गंगाधरे
शब्दसंख्या : २९५
