#ब्लॉग/कथालेखन टास्क (२२/१२/२५)
कथालेखन
” माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय अयोग्य काय आहे याचीही समज राहात नाही”. या वाक्याला धरून कथालेखन.
कथेचा शीर्षक :- ” नक्की काय हवंय?”
समीर हा एक अतिशय हुशार आणि कष्टाळू तरुण होता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला. त्याचं स्वप्न होतं मोठा उद्योजक बनण्याचे. पदवी घेतल्यानंतर त्याच्यासमोर अनेक प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. त्याच्या हातातील तांत्रिक कौशल्यामुळे त्याला एका नामांकित, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी चालून आली. त्यांनी कॅम्पस इंटरव्यूही दिला होताच.
घरात वडिलांचा एक छोटा व्यवसाय होता. तोच आधुनिक पद्धतीने वाढवण्याची त्याची इच्छा होती. तिसरा पर्याय म्हणजे स्वतःची एक अभिनव,” स्टार्टअप” ची कल्पना. त्यासाठी आवश्यक गुंतवणूकदारही शोधले होते व भेट सुद्धा घेतली.
सुरुवातीला आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत हे त्याला अभिमानास्पद वाटले. आपल्याच भाग्याचा हेवा ही! जसा जसा काळ पुढे सरकला तस तसा या ” पर्यायांचा खजिना “त्याच्यासाठी गोंधळाचा, मानसिक त्रासाचा ठरला. रोज नव्या विचाराने जाग यायची. कधी वाटायचे आधी नोकरी करून पैसे साठवावे तर दुसऱ्याच क्षणी स्टार्टअप सुरू करण्याची ही योग्य वेळ वाटली. या निवड प्रक्रियेत अनेक महिने वाया गेले. काय निर्णय घ्यावा? सुचेना.
एके दिवशी तो आपल्या अनुभवाने जाणत्या आजोबांकडे गेला. आजोबांनी त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव लगेच ओळखला. त्याची द्विधा मनस्थिती ही जाणली. ते त्याला आपल्या बागेत घेऊन गेले. समोरच बहरलेल्या पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याच्या फुलाकडे बोट दाखवून म्हणाले,” समीर, या फुलांना फुलण्यासाठी फक्त माती, सूर्यप्रकाश आणि पाणी एवढेच हवं असतं. त्यांच्याकडे धावपळ करण्याकरता किंवा निवड करण्यासाठी हजारो पर्याय नसतात म्हणूनच ती इतकी नैसर्गिक आणि प्रसन्न फुलतात.
आजोबा पुढे समजावत म्हणाले,” माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला नक्की काय हवं? याची समज रहात नाही. जास्त पर्याय कित्येकदा स्वातंत्र्य ऐवजी अनेकदा भ्रमच निर्माण करतात. जेव्हा तू प्रत्येक वाटेवर थोडे थोडे चालण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा तू कोणत्याही एका ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तुला नक्की काय साध्य करायचंय? ते या पर्यायांच्या गर्दीत शोध! योग्य निवडीसाठी विचारांची स्पष्टता, एकाग्रता असणे जास्त महत्त्वाचे असते”.
समीरला आपली चूक उमगली, त्यांनी पर्यायांचा फापटपसारा बाजूला सारला. स्वतःच्या आवडीचा विचार केला आणि ठरवलं,” स्वतःचा व्यवसाय शून्यातून उभा करायचा!” इतर पर्यायांचा मोह सोडला व एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केले. आता त्याचा गोंधळ संपला होता आणि यशाचा मार्ग सुकर झाला होता.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
