#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क
#लग्नम्हणजेसोशलस्टेटसशो
*लग्न – एक महागडा सोहळा*
“लग्न एक कौटुंबिक सोहळा,
नातलगांचा जमा गोतावळा,
दोन कुटुंबांचे मनोमिलन,
जणू स्नेही जणांचे स्नेहसंमेलन.”
पूर्वी होणाऱ्या लग्नसमारंभासाठी वरील ओळी अचूक ठरणाऱ्या होत्या. परंतु आजकाल लग्न म्हणजे एक सोहळा न राहता इव्हेंट झाले आहे. आपली असलेली-नसलेली श्रीमंती दाखवण्याचे ठिकाण म्हणजे असे सोहळे, ज्या कार्यक्रमात आपुलकी, प्रेम कमी नि बडेजाव जास्त असतो. असे खर्चिक सोहळे म्हणजे आजचे लग्नसोहळे.
*बदललेली जीवनशैली*..
लग्नसोहळ्यावर सर्वात मोठा प्रभाव पडला असेल, तर तो बदललेल्या जीवनशैलीचा. आज सर्वांना भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करायचा असतो समारंभ. पैशाचा अमाप खर्च, नातेसंबंधांपेक्षा आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेला महत्त्व — ही आजची आधुनिक जीवनशैली. कमी वयात प्रचंड पैसा हातात असणारी पिढी, आणि त्या पिढीला ‘नकार’ माहीत नसल्यामुळे प्रत्येक बाबतीत त्यांना साथ देणारे त्यांचे पालक. त्यामुळे नको त्या गोष्टींवर प्रचंड खर्च करून या सोहळ्याची गरिमा आपण घालवून बसलो आहोत.
*आधुनिक अपेक्षा*…
पूर्वीच्या काळी लग्न अगदी पारंपारिक पद्धतीने होत असत. सर्व काही कमी खर्चात नि घरच्या घरी, नातेवाईकांच्या साक्षीने, सर्व विधी सांग्रसंगीत होत असत. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. प्रचंड प्रमाणात शहरीकरण झाले असल्यामुळे मुले, मुली व त्यांचे पालक यांच्या अपेक्षांमध्येही आधुनिकपणा आला आहे. अपेक्षांमध्ये वाढही होत आहे. आज मुलगा कसा आहे, घरदार कसे आहे हे पाहण्यापेक्षा त्याचे पॅकेज किती आहे, तो कोणत्या शहरात राहतो, त्याच्यावर जबाबदाऱ्या किती कमी आहेत, हे पाहिले जाते. म्हणजेच लग्न जमवण्यात नात्यांपेक्षा व्यवहार पाहिला जात आहे.
*सामाजिक दबाव / अपेक्षा*…
“लोक काय म्हणतील?” — त्याने तर कमी पैसे असूनही त्याच्या मुलाचे/मुलीचे लग्न किती जोरदार केले, मग मी का करू नये, असा विचार करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार आज वाढत चालला आहे. सामाजिक प्रतिष्ठा टिकविण्यासाठी अनावश्यक खर्चांवर भर दिला जात आहे. आजकालचे लग्न हे प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे न झेपणारा खर्चही लोक करत आहेत.
*बदललेले विधी*…
विधींमध्ये बदल झाला असे म्हणण्यापेक्षा आता विधींनाच महत्त्व राहिले नाही. कुठले आवडलेले विधी आपले म्हणून आपण ते आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि परंपरागत चालत आलेले विधी “काही अर्थ नाही” म्हणून बंद करत आहोत. त्यामुळे नातेवाईकांना सामावून घेणारे जे विधी होते, ते होतच नसल्यामुळे फक्त आणि फक्त ‘एन्जॉय’ म्हणून आजचे लग्नसोहळे होत आहेत.
*खर्चीक सोहळे*…
लग्न ठरल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत फक्त आणि फक्त एक इव्हेंट किती लाखांत, किती पैशांत पूर्ण होतो, तेच लग्न आज “खूप छान झालेले लग्न” म्हणून पाहिले जाते. मग कपड्यांवर होणारा खर्च असो, प्री-वेडिंग शूट असो, किंवा मोठ्या प्रमाणावर जेवणावर होणारा खर्च असो — हे सर्व प्रतिष्ठेपायी केले जाणारे अवाजवी खर्च आहेत, जे आपल्याला टाळता येऊ शकतात. परंतु आपणही या सर्व चक्रव्यूहात अडकत चाललो आहोत.
हे सर्व पाहता असे वाटते की आपण आपली संस्कृती विसरून, दुसऱ्यांचे जे आपल्याला पटेल, रुचेल, आवडेल ते सर्व घेण्याच्या नादात, आपले परंपरागत विधी, आपल्या येथील लग्नसोहळ्याचे मांगल्य, होम वगैरे विधींचे महत्त्व व पावित्र्य विसरत चाललो आहोत. आणि त्यामुळेच आजकालच्या मुला-मुलींना लग्न करणे आणि टिकवणे यात काहीही गांभीर्य नाही, म्हणून आज सहजतेने घटस्फोट, वेगळे राहणे असे प्रकार घडत आहेत.
म्हणून आजची गरज ही साधे, दिखावा नसणारे, सर्वांना परवडणारे लग्नसोहळे करण्याची आहे — जे कमी खर्चिक, पण तितकेच देखणे असावेत. यामुळेच विवाहसंस्था भक्कम होईल. एकमेकांचे नातेसंबंध जपणे, कौटुंबिक संबंध जपणे, एकमेकांना प्रेम, आपुलकी, सन्मान देणे — हेच खरे सहजीवन ठरेल, आणि हीच आज काळाची गरज आहे.
“प्रेम हा दोन सहजीवनाचा पाया,
कुटुंबाची साथ, आशीर्वादाची छाया.
कमी खर्च, कमी भपका आदर्श असावा,
असा लग्नसोहळा दिमाखात व्हावा.”
🖋️ शिल्पा डोणंगावकर

अप्रतिम लेख