# माझ्यातलीमी
# विषय… लग्न म्हणजे सोशल स्टेटस
# ब्लाग लेखन
दि. 21 डिसेंबर 25
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विवाह हा सोळा संस्कार पैकी एक पवित्र संस्कार मानल्या जातो. नैसर्गिक कामेच्छा ही एका विशीष्ठ चौकटीत असावी,वंश वाढावा, समाजरचना स्थिर राहावी शिवाय कुटूंब व्यवस्थे मूळे आयुष्याला एक दिशा मिळते अशासाठी विवाह संस्कार अस्तित्वात आला.
विवाह ही एक सामाजिक व कौटूंबिक गरज ठरली .कालपरत्वे विवाह संस्थेत बरेच बदल झालेत.तरीसुद्धा विवाह हा संस्कार बदल होऊन पण टिकून आहे.
पूर्वीच्या काळी मानवाचा एकमेंकांशी संपर्क खूप कमी प्रमाणात असायचा अशावेळी विवाह सबंध जवळच्याच गावात ,ओळखीतून होत असत.विवाह अगदी साधेपणाने वधुपित्याच्या अंगनात होत असत. अशावेळी सर्व गावाची मदत विनामोबदला असायची .साहजिकच आर्थिक भार खूप कमी व्हायचा दोन्ही कुटूंबाची परिस्थिती साधारण सारखीच असायची त्यामुळे देणेघेणे, विवाह तयारी म्हणजे मुला मुलीचे कपडे, दागीने, बस्ता बाधंणे याला एक परंपरा यापलीकडे फारसे महत्त्व नव्हते.
हळूहळू काळ बदलला. दळवळणाची साधने उपलब्ध झाली. पुढे फोन, मोबाईल आलेत .संपर्क वाढलेत. मुली नाही पण मुले उच्च शिक्षण घ्यायला लागलीत.नौकरी चे प्रमाण वाढले. रुढ पद्धतीने होणाऱ्या विवाहात मुलीचे सौदंर्य अन मुलाची संपत्ती याला महत्व आले.या दोन्ही गोष्टी चिरंतन टिकणाऱ्या नाहीत हे समजुनही याच निकषांच्या आधारे विवाह ठरायला लागले हुंडापद्धती अस्तित्वात आली. सुरवातीला सर्व सुरळीत होते. आपल्या मुलीकरता वडील आनंदाने खर्च करायचे. जबरदस्ती नसायची. पण पुढे पुढे हव्यास वाढला. मुलाच्या शिक्षणावर इतका खर्च झाला, मुलगा किती मोठ्या नौकरीत आहे या निकषावर हुंडा ठरायला लागला. अशावेळी साहजिकच मुलगी असणे म्हणजे एक जबाबदारी वाटायला लागली. काही ठिकाणी मुलींना सासरी त्रास व्हायला लागला. काही निदंनीय घटना पण घडल्या परिणामत: सरकारने हुडांबंदी कायदा पास केला. त्यामुळे विवाहातील या प्रक्रियेचे फक्त स्वरुप बदलले .नगदी व्यवहार थांबले आणि सालंकृत कन्यादान असे नामकरण झाले. अपेक्षा मात्र त्याच राहिल्या. उलट देण्याघेण्याचे प्रमाण जास्त वाढले.
जसाजसा काळ पुढे सरकला . नवनवीन टेक्नॉलॉजी अस्तित्वात आली .आता मुली पण मुलांच्या बरोबरीनी शिकुन नौकरी करायला लागल्या .दोनच अपत्याचा जमाना आला साहजिकच आईवडिलांची आर्थिक स्थिती सुधारली आता विवाह हा एक संस्कार न राहता एक इव्हेंट झाला. आयुष्यात एकदाच धडणारी घटना म्हणून विवाह चे ग्रँड सेलिब्रेशन करण्यावर भर देण्यात आला. दोन जीवांच्या सुखी संसार प्रवासाचे हळूहळू बाजारीकरण झाले.
विवाहासाठी खर्च करण्याची जणू स्पर्धा च लागली.अतिश्रीमंत वर्ग आपल्या संपत्ती चे अतोनात प्रदर्शन मुलामुलींच्या विवाहात करायला लागला. याचेच अनुकरण मध्यमवर्गीय वर्ग पण करायला लागला. कर्ज काढून फक्त दिखाव्याकरीता अवाजावी खर्च व्हायला लागले. खर्च हा अस्मितेचा विषय झाला. हा बडेजाव फक्त मुठभर लोकांनाच परवडणारा होता हे विचारात न घेता अविचाराने केलेल्या या खर्चामूळे खरतर खुप मोठ्या आर्थिक ताणापेक्षा जास्त काही निष्पन्न झाले नाही.
आधुनिक इव्हेंट विवाहामधील आजकाल सरास चालत असलेला कुठल्याही संस्कारात न बसणारा कार्यक्रम म्हणजे प्रि-वेडींग शुट .साखरपुड्याला आजकाल रिंगसेरीमनी नाव देऊन वधुवरां चे कुटूंब एका ठिकाणी येऊन कार्यक्रम साजरा करतात. दोन कुटूंब एकत्र येण्यासाठी ही एक चांगली सुरवात होते. पण त्यानतंर होणारे हे प्रि-वेडींग शुट वर होणारा कपडयांचा,फोटोग्राफी वर होणारा खर्च अवास्तव वाटतो.यावर कळस म्हणजे या भावी वधुवरांच्या खाजगी क्षणांचे प्रदर्शन लग्नात मोठ्या स्क्रीनवर करतात. अशा व्यक्तीगत गोष्टींचे जाहीर प्रदर्शन करण्यामागे कोणता उदात्त हेतू असावा हैच समजत नाही उलट यात बाजारीकरणाचाच भाग जास्त जाणवतो.
विवाह वैदिक पद्धतीने साजरा होतो पण विवाहातील सर्व विधी मात्र आजकाल एक इव्हेंट म्हणून साजऱ्या केल्या जातात.घाणा भरणे, हळद, मेहदी तसेच संगीत हया सर्व कार्यक्रमासाठी डेसकोड ठरवल्या जातो. वधूवरांसाठीतर कपडे ज्वेलरीवर भरपूर खर्च होतो पण सोबतच इतर सर्व जवळच्या नातेवाईकांना विनाकारण खर्च करावा लागतो. सप्तपदी सारख्या पवित्र विधीसाठी डेकोरेशन चाच खर्च जास्त होतो. या सर्वांमूळे विवाह विधी पवित्र न वाटता कृत्रिम वाटतात ,कारण या सर्व विधी दरम्यान वधुवरांचे लक्ष विधीत न लागता फोटोत जास्त जाते. हे क्षण जपायचे असतात पण आधी पवित्र मनाने करणे हे जास्त महत्वाचे आहे.
आहेर, भेटवस्तू या बाबत पण प्रतिष्ठा च जास्त पणाला लागते . या सर्व गोष्टी उपयोगी पडतात असेही नाही. खुप कमी लोक नगदी स्वरुपात भेटी देतात कुठेतरी याचा उपयोग होतो. हे सर्व परिस्थिति नसतांनाही फक्त सामाजिक स्टेटस साभांळायला केले जाते.उच्च श्रीमंत वर्गाला यामुळे फारसा फरक पडत नाही परंतू मध्यमवर्ग मात्र स्वकष्टाने, सन्मार्गाने मिळवलेली संपत्ती अनुकरण करण्याच्या नादात उघळून समाधान ,आनंद शोधत राहतो.
विवाह समारंभात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण. पूर्वीच्या काळी मोजकेच पदार्थ असायचे .पत्रावळीवर जरी जेवण असायचा पण अन्ना चे महत्व लोक जाणायचे कारण शेतकऱ्याच्या धान्य पिकवण्याच्या कष्टाची,जेवण तयार करण्याच्या मेहनतीची जाणीव असायची. आजकाल मात्र मोजता पण येणार नाही इतका मोठा मैन्यू असतो.खरतर स्वतः च्या रुचीनुसार आस्वाद घ्यायचा असतो पण काही लोक भरमसाठ वाढून घेवून शेवटी टाकून देतात तेव्हा वाईट वाटते. यजमानांचा पण भरमसाठ पैसा इथे खर्च झालेला असतो.अनेक हात हे जेवण तयार करण्यासाठी कित्येक तासांपासून राबत असतात.
कधी कधी असे वाटते की आपल्या सुख समाधानाच्या व्याख्या च या बेगडी अन बाजारु बनत आहेत. यामूळेच कदाचित पुढे पुढे वैवाहिक जीवनात जोडप्याने माणूस म्हणून एकमेंकांचा स्विकार करण्यासाठीचा अवकाश शिल्लकच राहत नाही .या सर्व बाबींचा सहजीवनावर परिणाम विपरीत होतो.सहजीवनाच्या प्रवासात गुतांगुत निर्माण होते. सुसंवाद कमी होतो.या सर्वांचे दूरगामी परिणाम होऊन कुटूंब व्यवस्था ,समाजव्यवस्था विस्कळीत होते.
आज छोटी गावे ,लहान शहरे अशा ठिकाणी साधारण परिस्थिती मूळे किंवा आपल्या पूर्वजांच्या संस्कारामूळे सर्व आवश्यक विधी करुन,झेपावेल एवढी हौसमौज करुन साधेपणात विवाह साजरे होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये किंवा उच्च मध्यमवर्गीया मध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशन मध्ये राहण्याचा पर्याय पुढे येत आहे.
त्यातूनही लग्न झाले तर किती टिकेल या धास्तीत पालक असतात.. शिवाय दोघे कमावू मौज करु मात्र अपत्य नको ,जबाबदारी नको अशी एक विचारसरणी तयार होत आहे.
असे वाटते की सर्व आपण आपली संस्कृती विसरुन पाश्चात्य विचारसरणी चे अंधानुकरण करण्या चे हे सारे दूरगामी परिणाम आहेत. कदाचित वरपांगी उत्तम दिसणाऱ्या समृद्धी चा हा परिणाम असावा. या साऱ्यांचा विचार करता विवाहातील महोत्सव ,सोहळे बाजूला ठेवून विवाह संस्था मजबुत करण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. विवाह संस्थेला दुसरा भक्कम पर्याय आजतरी उपलब्ध नाही.
अगदी च परंपरागत विवाह पद्धती न स्विकारता जोडीदार निवडीला महत्व देऊन
विवाह विषयक रुढिवादी मानसिकता दूर सारुन , वैवाहिक आयुष्यात एकमेंकांना सन्मान व प्रेम देऊन आदर्श सहजीवन ही काळाची व समाजाची गरज आहे. .
विनया देशमुख
.
