#विकेंडटास्क (२०/१२/२५)
#विषय :- लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो.
( विषयाला धरून मनात आलेले विचार)
ब्लॉग लेखन
शीर्षक :- लग्न :- शो की संस्कार!
(१) लग्न, सोशल स्टेटस शो बनलेला संस्कार.
आजच्या काळात लग्न हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक निर्णय राहिलेला नाही तर तो समाजात आपली प्रतिमा मांडण्याचं साधन बनत चालला आहे. लग्न प्रत्यक्ष होण्याआधीच सोशल मीडियावर प्रसिद्ध होते. फोटो, व्हिडिओ, रिल्स आणि स्टोरीज यातून लग्नाचा, “शो “आधीच उभा केला जातो. लाईक्स, कमेंट्स आणि शेअरच्या आधारावर लग्न किती यशस्वी झालं हे मोजलं जातं. या प्रक्रियेत मात्र लग्नाचा मूळ अर्थ आणि पावित्र्य हळूहळू बाजूलाच पडतं.
(२) सोशल मीडियावर केंद्रित लग्नाची संकल्पना.
आज लग्नाचं संपूर्ण नियोजन कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून केले जात. प्री- वेडिंग शूट, सिनेमॅटिक फोटोग्राफी, ड्रोन शॉट्स, खास एन्ट्री, डिझायनर कपडे, प्रोफेशनल हेअर स्टाईल आणि मेकअप मन हे सगळंच लग्नाचा अविभाज्य भाग बनला आहे. या सगळ्यांचा मुख्य उद्देश ” लग्न सुंदर दिसावं ” हाच असतो. लग्न टिकावं हा मुद्दा बाजूलाच पडतो. भावनांपेक्षा “फ्रेम”महत्त्वाची ठरते. नात्यांपेक्षा प्रतिमा जपली जाते.
(हे आपलं दुर्दैवच!)
(३) दिखावा यामुळे वाढलेला वायफळ खर्च.
या शोसाठी प्रचंड खर्च केला जातो. काही तासांसाठी वापरायचे कपडे, लाखोंच्या किमतीचे असतात. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी स्वतंत्र मोठा खर्चही केला जातो. शिवाय सजावट, लाइटिंग, बँड आणि वरात, इव्हेंट मॅनेजमेंट, लग्नाचे हॉल (एसी,५, स्टार, ७ स्टार) या सर्वांमुळे बजेट वाढतच जाते. ” “अंथरूण पाहून हात पाय पसरावे ,ही म्हण विसरली जाते “.
अन्नपदार्थांची यादी ही खूप मोठी असते. आंतरराष्ट्रीय पदार्थ ठेवले तर बजेट आणखीनच वाढते. पंचपक्वानांची रेलचेल असते. पंक्तीमध्ये बसवून आग्रह करून खाऊ घालायला कोणी नसते. बुफे असल्याने पुन्हा, पुन्हा उठावे लागू नये म्हणून जास्तीचे अन्न घेतले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. आज-काल वधू- वर, त्यांचे आई -वडील, फोटो काढण्यात मश्गुल असल्याने, ” स्वस्थ होऊ द्या!” म्हणायला कोणी येत नाही. यात पाहुणचार कमी आणि दिखावा जास्त असतो. नाही का?
(३) समाजावर पडणारा दबाव.
अशी भव्य लग्न सोशल मीडियावर सतत दिसल्यामुळे इतर कुटुंबावरही दबाव येतो. इतर मुलांना तसेच लग्न करावेसे वाटते. मध्यमवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या मर्यादित कुटुंब आपली ऐपत ओलांडून खर्च करतात. अनेक पालक तर केवळ आपल्या मुलांच्या हौशीसाठी भरमसाठ कर्जही काढतात. एका दिवसाच्या सोहळ्यासाठी पुढील काही वर्षांचं आर्थिक स्वातंत्र्य गमावलं जातं. त्यामुळे लग्न आनंदाचा विषय न राहता ताणा चा विषय बनत चालला.
(४) लाईक्स संपतात – वास्तव उरतं.
लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ काही दिवस चांगलेच चर्चेत राहतात. नंतर पुन्हा नवीन नवीन पोस्ट येतात. जुन्या आठवणी मागे पडतात. सोशल मीडियावर कौतुक संपत. जनता हुशार असते तेच फोटो एकदा पाहतात लाईक, कमेंट्स करतात. दुसऱ्यांदाही. पण तिसऱ्यांदा किती कौतुक करायचं? म्हणून दुर्लक्षही……..
पण कर्ज, इ एम आय, आणि जबाबदाऱ्या मात्र संपत नाहीत. कायम राहतात. नव्या संसाराची सुरुवात आर्थिक ताण-तणावात होते. याचा फारसा विचार लग्नाच्या वेळी होत नाही. पण इतरांचे अनुभव ऐकताना,” पुढच्यास ठेच मागचा शहाणा” यावरून शहाणं तरी व्हावं! नाही का?
(५) कोविड काळातील साधेपणाचा अनुभव.
कोविड काळातील लग्न या सगळ्याला वेगळा दृष्टिकोन देऊन गेली. मोजकेच लोक, साधी व सुंदर सजावट. गुरुजींचे मंत्रोच्चार, वधू-वर जवळून पाहता आणि अनुभवता आले, बोलण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. नाहीतर लग्नाला कोण आलं कोण गेलं कशाचाही पत्ता लागत नाही.
मर्यादित अन्नपदार्थ, कमी खर्च, या सगळ्यातही लग्न सन्मानाने आणि समाधानाने झालीच की! त्यावेळी कोणीही मोठा हॉल, महागड्या फोटोग्राफीची अपेक्षा ठेवली नाही. परिस्थिती ही नव्हतीच म्हणा. याच काळात प्रत्येकाला जाणवलं की वायफळ, अनावश्यक खर्च टाळूनही लग्न अर्थपूर्ण होऊ शकते. यातून काही जण शिकली पण काही जण……
(६) लग्नाचा खरा अर्थ
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. आयुष्यभर साथ देण्याचं वचन. आयुष्यभर जबाबदारीने नातं निभावणं. एकमेकांसोबत केलेली मनाची सुरेख गुंफण. लग्न या अडीच अक्षरात मानव जातीच्या विश्वाची निर्मिती लपलेली. संस्कृतीचं लेणं, मोठ्यांचा मान सन्मान म्हणजेच लग्न .असे लग्न या अर्थाचे अनेक पदर आहेत. हे सर्व निभावण म्हणजेच लग्न. हे नातं, फोटोमध्ये नाही तर रोजच्या व्यवहारातून दिसत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची समजूतदारपणे झालेली जोडणी आणि आयुष्याची सुरुवात. आयुष्याच्या या वळणावरचा नवा प्रवास दोन कुटुंबांसोबतचा. नव्या नात्यांचा.
(७) खर्च कमी करा, भविष्य सुरक्षित करा.
जास्त पदार्थ ठेवून, आंतरराष्ट्रीय मेन्यू, भल्या मोठ्या महागड्या पत्रिका. अवाजवी सजावट, महागडे कपडे. दोन लाख फी घेणारे फोटोग्राफर अशा प्रकारचा खर्च टाळता येऊ शकतो.
त्या ऐवजी तो पैसा, एफ डी, सोने, घर, शिक्षण किंवा आरोग्यासाठी गुंतवणूक म्हणून वापरता येतो. अशा गुंतवणुकीचा उपयोग लग्नानंतरच्या आयुष्यात प्रत्यक्षात खूप महत्त्वाचा ठरतो.
प्री वेडिंग, महागड्या हॉटेल मधली केळवण, दोन लाखावरचे रेंट चे कॉस्च्युम, मुळात कोणाला दाखवण्यासाठी लग्न करूच नये. स्वतःच्या आनंदासाठी करावं असं मला वाटतं.
निष्कर्ष :-
सोशल मीडियासाठी, दाखवण्यासाठी केलेले लग्न टिकतील? आजकाल घटस्फोटाचे प्रमाणही वाढताना दिसतंय. लग्न हे सोशल स्टेटस दाखवण्यासाठीच साधन नसून आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठीच पवित्र नातं आहे. सोशल मीडिया वरती दिसणारी झगमगाटी लग्न हे क्षणिक असतात. पण साधेपणाने, समजूतदारपणे, परिस्थिती समजून केलेले लग्न टिकाऊ ठरतात.
आज गरज आहे ती लग्नाचा अर्थ पुन्हा नात्यांमध्ये शोधण्याची. दिखाव्याची नाही.
म्हणूनच म्हणावसं वाटतं……
” दाखवण्यासाठी केलेलं लग्न थकवतं,
समजून केलेलं नातं जगवतं ”
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
