आता तरी जागे व्हा

#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(१९/१२/२५)
#लग्नम्हणजेसोशलस्टेटसशो
#आतातरीजागेव्हा

“व्वा समीर अमिताच्या लग्नाचा थाट एकदम भारी केला आहेस. सर्व तयारी पाहून येणाऱ्यांचे डोळे अगदी दिपून जात आहेत.” विवाह वेदी जवळ उभे राहून कोण कोण पाहुणे मंडळी आली आहेत ह्याचा अदमास घेत असलेल्या समीरला त्याचा जिगरी दोस्त अर्जुन म्हणाला. समीरला मूठभर मांस चढले आणि त्याने सदऱ्याला नसलेली कॉलर टाइट केली. गालातल्या गालात हसत तो म्हणाला,

“अरे मी ठरवलं होतं एकुलत्या एका लेकीचं लग्न थाटामाटात करायचं अगदी तिला हवं तसं. चार-पाच दिवसांचे सगळे सोहळे वेगवेगळ्या ठिकाणी करायचेच होते.”

“हो पण खर्च पण एकदम भरपूर केला आहेस.”

“खर्चाचं काय रे एकच लग्न! हात राखून खर्च करण्यात काय अर्थ आहे पुन्हा पुन्हा हा सोहळा आपल्या आयुष्यात किंवा अमिताच्या आयुष्यात येणार नाही ना.”

“तेही बरोबरच आहे म्हणा.”

समीर सरंजामेंच्या एकुलत्या एका लेकीचं अमिताचे आज लग्न होतं. सगळीकडे अगदी आनंदी आनंद होता. सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या स्त्रिया अगदी ठेवणीतल्या साड्या नेसून, भरपूर दागिने घालून इथून तिथे सर्वांशी बोलत फिरत होत्या. त्यात त्यांचा मुख्य उद्देश सर्वांनी आपल्या साड्या आणि दागिने पहावे हाच होता. आलेले पाहुणे तीन चार प्रकारच्या आकर्षक वेलकम ड्रिंक चा आस्वाद घेत होते. एक पिऊन झालं की दुसरं कसं लागतं याची चव घेत होते. काही स्त्रिया आलेल्या लहान मुलांनाही वेलकम ड्रिंक्स देत होते त्यातील ती मुलं थोडं पिऊन उरलेलं तसंच ट्रेमध्ये ठेवत होते. काही लोक प्रत्येक ड्रिंक चा आस्वाद घ्यायचा म्हणून सगळीच घेऊन थोडी थोडी चाखुन ठेवून देत होते.

अमिता जेव्हा आपल्या एका मैत्रिणीच्या सईच्या लग्नाला गेली होती तेव्हा घरी आल्यावर त्या लग्न सोहळ्याचे वर्णन करताना ती थकली नव्हती. तिने आपल्या बाबांना सांगितलं,

“बाबा सईचं लग्न इतकं भारी झालं ना मी अजून पर्यंत असा थाट कुठेच पाहिला नाही. आम्हा सगळ्या मैत्रिणींची पण वेगळी बडदास्त ठेवली होती.”

“अगं आपण पण तुझ्या लग्नात ह्याच्यापेक्षा भारी थाट करूया. तू सांगशील त्या थीम ठेवूया. लोकांनी अगदी नाव काढलं पाहिजे आपल्या विवाह सोहळ्याचं.” अमिताची आई इतका वारेमाप खर्च करण्याच्या विरोधात होती. ती म्हणाली,

“अहो आपण थाटात लग्न करूया पण खर्च करताना उगाच जास्त हात सैल सोडू नका. आलेले लोक काय दोन चार दिवस सगळीकडे चर्चा करतील. त्यातील काही लोक तर इतका पैसा खर्च करायची गरज काय म्हणून नाक ही मुरडतील.”

“आई ते काय नाही मी माझ्या लग्नात सगळी हौस मौज भागवून घेणार आहे. सुदैवाने अखिल पण मला हौशी भेटला आहे. हे सर्व करण्यात त्याला पण खूप रस असतो.”

आज अखेर अमिताच्या लग्नाचा दिवस उजाडला होता. लग्नाच्या आधी तिने अगदी प्री वेडिंग फोटो शूट पासून संगीत, मेहंदी, हळद ही सगळी फंक्शन्स वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर खर्च करून, वेगवेगळे पेहराव घालून, अगणित फोटो काढून खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली होती. लग्नासाठी घेतलेला हॉल सुद्धा खूपच प्रशस्त होता. स्टेज च्या खाली एका बाजूला स्क्रीनवर अमिता आणि अखिलचे प्री-वेडिंग फोटोशूटचं चित्रीकरण दाखवलं जात होतं. त्यातील काही चित्र अगदी त्यांची वैयक्तिक होती जी सर्व लोकांनी पाहण्यासारखी नव्हती.

या लग्न सोहळ्यामध्ये विधीना महत्व देण्यापेक्षा वेगवेगळ्या अँगलमधून अनेक प्रकारे फोटो काढण्यातच नवरा नवरीला खूप रस होता. फोटोग्राफरची अख्खी टीम, सहा सात जणांची नवरा नवरीच्या मागे फिरत होते. बाहेर कॉरिडॉर मध्ये दोन-तीन ठिकाणी फुलांचं डेकोरेशन केलं होतं जिथे फोटो खूप छान येतील. नवरा नवरीचे फोटोशूट झाल्यावर आलेले पाहुणे, जास्त करून स्त्रिया आणि तरुण मुली तिथे आपले वेगवेगळ्या अँगल मध्ये फोटो काढून घेत होते. या सगळ्यासाठी पण अवाच्या सव्वा पैसा खर्च केला होता.

जेवणाचा थाट काय विचारूच नका. अनेक प्रकारचे स्टॉल्स होते. साउथ इंडियन, चायनीज, आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण, चाट आयटेम सगळ्याची अगदी रेलचेल होती. आलेली पाहुणे मंडळी सगळ्या स्टॉल्सवर अक्षरशः तुटून पडली होती. काही जणांनी शिस्तीत रांग लावली होती तर काहीजण मध्ये मध्ये घुसत होते. हे सगळं पाहून समीर मनोमन सुखावत होता.

पूर्वीच्या लग्नांमध्ये विवाह महूर्ताला एक
अनन्यसाधारण महत्व होतं. विवाह त्या मुहूर्तावरच लागला पाहिजे याकडे गुरुजी, वडीलधारी मंडळी यांचा कटाक्ष असायचा. परंतु हल्ली मुहूर्त उलटून गेला तरी कोणाला त्याचं भान नसतं. अमिताच्या लग्नात सुद्धा असंच झालं. मुहूर्ताची वेळ जवळ आली तेव्हा नवरा नवरी विवाह वेदीवर आले. अर्थात मुहूर्ता नंतर पंधरा मिनिटांनीच लग्न लागलं.

हे सर्व पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला अतिशय त्रास होत होता. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून समीरचा भाऊ अमर सरंजामे होते. अमर स्वतः सीए असून त्यांच्याकडे पैशाची श्रीमंती भरपूर होती. असं असलं तरी त्यांना अशा तऱ्हेने पैसा उधळलेला अजिबात पसंत नव्हतं. ते स्वतः आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्याला हातभार लावत होते. अडल्या नडल्याला मदत करणं हे ते आपलं आद्य कर्तव्य मानत होते. जेव्हा अमिताचे लग्न ठरलं तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की आपण समीरला सल्ला देऊन असा वारेमाप खर्च करू द्यायचा नाही. परंतु समीरने अमरचं मत विचारातच घेतलं नाही.

लग्न लागल्यावर मात्र अमरला अजिबात राहवलं नाही. बरेचसे लोक जेवायला गेले होते आणि मध्ये आता बराच वेळ काही विधी नव्हते. तेव्हा अमर अत्यंत व्यथित अंतकरणाने समीर जवळ आला आणि म्हणाला,

“चल समीर जरा आता आपण या हॉलमध्ये फेरफटका मारून लोकांचा पाहुणचार कसा चाललाय ते पाहूया.” सर्वप्रथम अमर त्याला घेऊन ते दोन-तीन डेकोरेशनचे स्पॉट होते तिथे घेऊन गेला,

“समीर हे स्पॉट खूपच देखणे केले आहेत. याला किती खर्च झाला?”

“अरे या तिन्हीचा मिळून दोन लाख रुपये खर्च झालाय.”

“अर्थात ते दोन लाख रुपये वसूल झाले कारण खूप लोकांनी इथे नवरा नवरीचा फोटो सेशन झाल्यावर त्यांचं त्यांचं फोटोसेशन करून घेतलं. तुला माहितीये का इथे लग्नासाठी उपस्थित असलेले लोक मुहूर्ताच्या वेळी जेव्हा वधू-वरांवर अक्षता टाकणं आपण अतिशय महत्त्वाचं मानतो तेव्हा सुद्धा इथे फोटो काढत होते. म्हणजे त्यांचे आशीर्वाद नवरा नवरीला मिळालेच नाहीत.”

“जाऊदे रे त्यांनी त्यांची हौस करून घेतली ना”

“आता हा बघ हा एकच ट्रे इथे वेलकम ड्रिंक चा आहे त्याच्यातले कितीतरी ग्लासमध्ये ड्रिंक शिल्लक आहे. तू तीन चार प्रकारचे वेलकम ड्रिंक्स ठेवून काय साध्य केलंस. लोकांनी थोडं थोडं पिऊन शिल्लक ठेवलं. लोकांची मानसिकता पण कशी असते बघितलंस् ना. स्वतःच्या पैशाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन हे असं महागाचं ड्रिंक घेतात तेव्हा त्यातला थेंब आणि थेंब ते वसूल करतात.” त्यावर समीर म्हणाला,

“अरे एवढ्या खर्चामध्ये आपण हे क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी पाहत राहणार का!”

“बरं आता इथे लोक जेवत आहेत चल बघू या त्यांची जेवायची पद्धत कशी आहे. तो बघ त्या टेबलवर माणूस बसलाय त्यांनी त्याची प्लेट किती भरून घेतली बघ. अक्षरशः असं वाटतंय की त्यातले काही जिन्नस आता खाली पडतील. स्त्रियांनी आपल्याबरोबर आलेल्या लहान लेकरांना सुद्धा मोठ्या प्लेटमध्ये जेवण दिले. त्यांचं जेवण झालंय त्यांच्या प्लेट्स बघ त्यामध्ये किती अन्न शिल्लक आहे. एका प्लेटची किती कॉस्ट आहे रे!”

“एक हजार पाचशे रुपये.अरे अमर हे सगळं तू मला का दाखवतोस तुला नक्की काय सांगायचे आहे मला.”

“समीर तुला असं नाही वाटत की हा सगळा खर्च तू तुझ्या स्टेटस साठीच केला आहेस. हल्ली सगळीकडेच आपण बघतो विवाह हा धार्मिक विधी, नवरा नवरीची आयुष्याची नवी सुरुवात, सप्तपदीतली सात वचने या सगळ्याचं पावित्र्य लोप पावत चालले आहे. इथे प्रत्येक जण अमाप पैसा खर्च करून आपलं स्टेटस जपत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते वारेमाप खर्च करतातच याशिवाय काहीजण कर्ज काढून आपल्या मुला मुलीचे इच्छे खातर हे असे महागडे सोहळे करतात. हे कितपत योग्य आहे. अरे पूर्वी विवाह म्हणजे फक्त नवरा नवरी नाही तर दोन कुटुंब एकत्र यायची. त्यांच्यात अलिखित प्रेमळ नातेसंबंध जोपासले जायचे. आज आपण काय बघतोय तर सगळीकडे प्रत्येक जण आपल्या स्टेटसला शोभेल असा विवाह कसा होईल याकडे लक्ष देतोय. इतकच काय पूर्वी नवरी मुलगी जी आपण सासरी जाणार या कल्पनेने अतिशय हळवी झालेली असायची, जिचे अश्रू सारखे पाझरत असायचे, हल्ली ती नवरी मुलगी पण आपल्या विविध पोजेस मधले फोटो काढून सोशल मीडियावर तिथल्या तिथे पोस्ट करत असते. हल्ली झालंय काय की विवाह सोहळ्याचा खरा आनंद न उपभोगता तो समाज माध्यमांवर कसा प्रकट केला जाईल याकडेच सर्वांचे लक्ष असतं.”

“अमर आता तर आपला सगळं खर्च करून झाला आहे, सर्वांना मानपान देण्याच्या गोष्टी देऊन झाल्या आहेत. मुख्य म्हणजे माझ्याकडे पैशाची कमी नाही त्यामुळे मला कर्जही घ्यावं लागलं नाही. एक वेळ तू हे मला सगळं लग्नाच्या आधी सांगितलं असतं तर मी थोडा विचार केला असता.”

“माझे विचार तुला माहित आहेत म्हणून तू लग्नाच्या आधी मला काही विचारलंच नाहीस. अरे तुम्ही कितीही बडेजाव केलात तरी लोक फार काळ ते लक्षात ठेवत नाहीत. तुझी एकुलती एक मुलगी आहे ठीक आहे. पण यातला थोडाफार पैसा तू मुलीच्या नावाने गोरगरिबांसाठी खर्च केला असतास तर तुला किती आशीर्वाद मिळाले असते. अजून एक गोष्ट म्हणजे परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे फक्त दिखाव्यासाठी आपला पैसा खर्च करू नये. हे जे अन्न फुकट गेलं आहे ते बघून आठवतात ते भुकेमुळे दीनवाणे झालेले चेहरे. आता ही आपली मुलं प्रत्येक फंक्शन साठी महागाचे कपडे घेतात. त्यांच्या दृष्टीने ते सर्वांनी समाज माध्यमांवर पाहून झाले आहेत. त्यामुळे ते कपडे ते पुन्हा अंगाला सुद्धा लावत नाहीत. मी हे सगळं तुला सांगतोय कारण तुला जर माझे विचार पटले तर तू पुढे जे कोणी लग्न करणारे आहेत, कमीत कमी त्यांच्या कानावर तरी घालशील.”

“हो रे अमर मी या शो बाजी च्या नादात ह्या मूलभूत गोष्टी विसरूनच गेलो होतो. आता तरी माझे डोळे उघडले. मी नक्कीच या बाबतीत सजगता दाखवेन. हल्ली भपकेबाज गोष्टीचा जमाना आला आहे. हा अनाठायी खर्च होणारा पैसा एखाद्या स्तुत्य कार्यासाठी वापरला गेला पाहिजे हे खरं आहे. आपण सर्व समाज माध्यमांवर टाकून आपल्याला किती लाईक्स, कॉमेंट्स आले ते पाहण्याच्या नादात आपल्या रूढी आणि परंपरांचे पावित्र्य जपायला विसरत चाललो आहोत. कुठेतरी हे थांबायलाच पाहिजे. मला पटलं आहे. तुम्हालाही पटलं असेलच ना!

©️®️सीमा गंगाधरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!