हक्काचं घर

inbound3052378691524156405.jpg

#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन टास्क
@everyone
#विषय: काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपली तरी ती आपली होतच नाही.
शीर्षक -हक्काचं घर
​नलिनीताईंना वाटलं होतं, आपल्या लेकीच्या घरी हक्काचं स्थान मिळेल. पती व मुलगा अपघातात गेल्यानंतर त्या मीराकडे राहायला आल्या. सुनेपेक्षा मुलीकडे राहण्यात एक आपलेपण वाटायचं. त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. लेकीचं घर, जावयाचा व्यवसाय, नातवांचा अभ्यास—सगळं त्यांनी मनापासून सांभाळलं.
मीरा आणि जावई कामावर जाताना त्या मोठ्या विश्वासाने म्हणायच्या, “मी आहे ना!” सगळं सांभाळते.
​घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांचा स्पर्श होता; त्यांना वाटलं होतं, हेच त्यांचं कायमचं घर आहे. त्यांनी नातू समीरला अगदी आईच्या मायेने वाढवलं.
​पण, जेव्हा समीरच्या लग्नाची बोलणी सुरू झाली, तेव्हा परिस्थिती बदलली. एका स्थळाकडून नकार आला. जावई रात्री नलिनीताईंना म्हणाले, “आई, तुम्ही प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू नका. आम्ही फक्त तुम्हाला राहण्याची परवानगी दिली निर्णयाची नाही. तुमच्यामुळे मुलाचं लग्न जमत नाहीये.”
​त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. इतकी वर्षं जीवाचं रान केलं, आज हे नातं त्यांना भाड्याच्या घरासारखं वाटलं—जिथे फक्त ‘राहण्याची’ परवानगी होती, ‘मालकी’ची नाही. त्या रात्री त्या ढसाढसा रडल्या.
​दुसऱ्याच दिवशी नलिनीताईंनी कोणालाही न सांगता, शांतपणे गावी आपल्या जुन्या घरी गेल्या.आता सुनेकडे रूपाकडे तरी जायचं कसं? आणि तिथेही हे नातं भाड्याचं निघालं तर?
​गावी जाऊन त्या एकाकी जीवन जगू लागल्या.
​इकडे मीराने रुपाला फोन केला. तेव्हा सून बोलली, “आई कुठे आहे? तिला इथे यायला सांगा. त्यांचं घर आहे हे!”

रूपा गावी नलिनीताईंना भेटायला पोहोचली. तिला पाहून नलिनीताईंच्या डोळ्यात पाणी आलं.रूपा म्हणाली, “आई, तुमचा मुलगा नाहीये म्हणून काय झाले तुम्ही फक्त माझ्या सासूबाई नाही, माझी आई आहात. तुम्ही आपल्या घरात राहायला हवं.” तिने नलिनीताईंना प्रेमाने मिठी मारली आणि त्यांचा हात धरून त्यांना आपल्या घरी घेऊन आली. नलिनीताईंना जाणवलं, रक्ताचं नातं भाड्याचं निघालं, पण मनाचं नातं आजही हक्काचं घर आहे.
शब्द संख्या 250 ~अलका शिंदे

5 Comments

  1. So I used novibetlogin to get into NoviBet… process was smooth, no issues. I’d recommend sticking with reliable sites or you’d have issues bruh. Here is the proper link though novibetlogin to make sure you get in the right spot.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!