#म्यूझिकशोलेखनटास्क

inbound7832708280533028581.jpg

#माझाआवडता गायक

सोनू निगम हा माझा आवडता गायक. ३० जुलै १९७३ सोनू निगम याचा जन्म हरियाणा मधील फरीदाबाद येथे झाला. त्याची आई शोभा निगम आणि वडील आगमकुमार निगम. त्याचे वडील गाण्याचे कार्यक्रम करीत असत. वडिलांबरोबरच सोनू निगम याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी गायनाची सुरवात केली. “क्या हुआ तेरा वादा” हे गाणं त्याने वडिलांबरोबर रंगमंचावर गायले. तसेच बेताब आणि काही चित्रपटात बालकलाकार म्हणुन कामही केले.
त्याने प्रसिद्ध गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत.
महान गायक स्व.महमद रफी यांची गाणी तो हुबेहूब गातो. त्याला मॉडर्न रफी असे ही म्हंटले जाते. अर्थात सोनू निगम याने आपल्या आवाजाची एक वेगळीच छाप उभी केली आहे.
त्याचे गायक म्हणून गायलेले पहिले गाण १९९९ मधे ’जानम’ या चित्रपटातील होते पण तो सिनेमा आणि गाण रिलीज झालेच नाही.
१९९२ मधे “हम तो छैला बन गए” हे ‘तलाश’, चे हिंदी मालिकेमधील गाणे रिलीज झाले. हे गाणे ऐकले की आपल्याला महमद रफी यांच्या आवाजाची झलक ऐकायला मिळते.
१९९३ मधे पहिल्यांदाच त्याने सिनेमासाठी गायलेले ‘आजा मेरी जान’ या सिनेमातील “ओ आसमानवाले” हे गाणे आले.
त्यानंतर १९९५ मधे टीव्ही वर चालू झालेल्या झी वाहिनीच्या सा रे ग म अंताक्षरी कार्यक्रमामधून सोनू निगम घराघरात पोहोचला. त्याच्या गायनाने कार्यक्रमाची सुरवात होत असे आणि त्या कार्यक्रमात तो सूत्रसंचालन करत असे.
१९९५ ला बेवफा सनम हा त्याचा अल्बम हिट झाला.
या अल्बम मधले “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” हे गाणं विशेष हिट झाले. “दिवाना” अल्बम मधील ’अब मुझे रात दिन तुम्हारा ही खयाल है’ हे ही त्याच्या प्रसिद्ध गाण्यातील एक गाण आहे.
पण मला सोनू निगम भावला ते ’परदेस’ सिनेमा मधील शाहरुख खान वर चित्रित केलेलं “ये दिल, दिवाना, है ये दिल.” या गाण्यामुळे. त्या गाण्यात त्याच्या गाण्यातला एक वेगळा पैलू दिसून आला. त्यानंतर तो त्याच्या वेग वेगळ्या अंदाजात गायलेल्या गाण्यांनी प्रभावित करत गेला.
त्याने गायलेली गाणी भरपूर आहेत पण त्यातील काही गाणी खालील प्रमाणे,
ह्रितिक रोशन च्या अग्निपथ मधील “अभी, मुझमे न कही”
दिल से मधील “तू ही तू सतरंगी रे”
’संघर्ष’ चित्रपटामधील ”पहली पहली बार बालिये” आणि ”अब मुझे रात दिन तुम्हारा ही खयाल है
’रेफ्युजी’ मधील “ऐसा लगता है जो ना हुआ”
’फना’ मधील “मेरे हाथ मै तेरा हाथ है”
’कभी खुशी कभी गम” मधील”सुरज हुवा मध्यम”
’दिल चाहता है मधील’ “तनहाई तनहाई”
’धडकन’ मधील” दिल ने ये कहा है तुमसे”
तसेच, संदेसे आते है, ’कभी अलविदा ना कहना’ चे टायटल सॉंग, ’लेजेन्ड ऑफ भगतसिंग’ मधले “रंग बसंती”, ’बॉर्डर’ मधले ”संदेसे आते है”, ही त्याने गायलेली काही सुप्रसिद्ध गाणी.
सोनू निगम याने ६०००च्या वर ३२ भाषेत गाणी गायली आहेत त्यात अनेक हिंदी, मराठी, कन्नड यांसारख्या भाषांतील गाण्यांचा समावेश आहे.
रोमँटिक, शास्त्रीय, भक्ती, गझल, कव्वाली, रॉक आणि पॉप अशा विविध गाण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.
मराठी मधील नवरा माझा नवसाचा (२००४)मधील ”
“हिरवा निसर्ग हा भवतीने. जीवन सफर करा मस्ती ने.. ” तसेच “टिक टीक वाजते डोक्यात” हे ’दुनियादारी’ मधील गाणंही बऱ्याच वाचकांनी ऐकले असेल.
त्याचे गाणं ऐकायला सुमधुर वाटते, गाण्याचे सादरीकरण भावपूर्ण असते. गाणी गाण्याबरोबर च तो उत्तम सूत्रसंचालनही करतो, विनोदी स्वभाव, निर्भिडपणे व्यक्त होणे, वेगवेगळ्या कलाकारांची मिमिक्री लीलया सादर करतो. त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्व त्याची विशेषतः आहे.
एकदा तर त्याने कमालच केली. एका वृद्ध गरीब माणसाचा वेष घेऊन त्याने काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला पेटी घेऊन गाणी गायली. बरेच जण त्याचे गाणे ऐकायला जमा झाले होते. वेषांतर एवढे बेमालूम होते की कोणी ओळखलेच नाही. त्यावेळी एका युवकाने त्याला काही खाऊन घ्या म्हणून दिलेले १२ रुपये त्याने फ्रेम करून ठेवलेत. अशा त्याच्या काही गोष्टी त्याला इतरांपासून वेगळे करतात.
त्याला वाचनाची आवड आहे आणि पुस्तकांनी मला एक व्यक्ती म्हणुन विकसित केले असे तो म्हणतो.
एक बाल कलाकार ते उत्तम गायक असा एक यशस्वी प्रवास त्याने केला आहे. यासाठी त्याला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर आणि लता मंगेशकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्याला पुरस्कृत केले गेलंय.
या वर्षी त्याचे परम सुंदरी मधील ‘परदेसिया’ गीत भेटीला आलंय.
एकीकडे गाणी गात असताना तो २००७ नंतर सा रे ग म पा लिटिल चॅम्प या शो मध्ये परीक्षक म्हणून टीव्ही वर परत आला. त्यानंतर अशा बऱ्याच म्युझिक शो, आणि रियालिटी शो मधे तो जज म्हणून आला तर काहींचे सूत्र संचालन केले. २००४ मधे “लव्ह इन नेपाल” मधे त्याने कलाकार म्हणून काम ही केलं आहे.
यापुढेही संगीत कार्यक्रम, गाण्यांचे अल्बम आणि अशाच विविध कार्यक्रमाद्वारे पुढची अनेक वर्ष तो आपल्या समोर असेल.
सोनू निगम, असाच सदाबहार रहा!!

त्यानेच गायलेले ’कल हो ना हो’ या सिनेमा मधील गाण्याच्या या ओळी कधी निराशेचा क्षण आल्यास उत्साहाने पुढे जायला प्रवृत करतात.
हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो”
या गाण्यातील ओळीत सांगितल्या प्रमाणे प्रत्येक क्षण आपले आयुष्य बदलत आहे, कधी सावली तर कधी ऊन, म्हणजेच कधी सुख तर कधी दुःख. त्यामुळे प्रत्येक क्षण इथे पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करा. जो आजचा क्षण आहे, तो उद्या नसेल.”

ब्लॉग लेखन
©️®️ रश्मी बर्वे–पतंगे
१४डिसेंबर२५

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!