विकेंड टास्क, कथा लेखन. शीर्षक :- ” सूर्योदय”

ब्लॉग/कथालेखन टास्क (८/१२/२५)

* खालील वाक्याला धरून कथालेखन.
” जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.

कथेचे शीर्षक :- “सूर्योदय”

पहाटेचा गजर होताच सरस्वती उठली.” कराग्रे वसती लक्ष्मी……‌” हा श्लोक म्हणून, मोकळ्या केसांचा अंबाडा बांधून आपला मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला.

तासाभराने पोळी, भाजी आणि कोशिंबीर करून डबे भरले. एक डबा नवऱ्याच्या हातात, दुसरा मुलाच्या हातात दिला. ,” अथर्व, तुझी आवडीची भाजी दिली आहे. डबा संपवून यायचं हं!”. त्या क्षणी अथर्व तिला दूर लोटत म्हणाला,” दूर हो ग! किती घामेजलेली आहेस, तुझ्या अंगाला मसाल्यांचे वास येतात. त्या टीव्ही मधल्या बायका बघा कशा टापटीप राहतात, छान हेअर स्टाईल करतात, नटून थटून घरात वावरत असतात. तुझा अवतार पहा जरा आरशात!”. असे म्हणून बापलेक दारातून बाहेर पडले. त्यांना बाय करून लपवलेल्या जखमांना, डोळ्यातील अश्रूंना तिने वाट करून दिली.

शाळेत मराठीच्या तासाला बाई पुस्तकातील एक वाक्य समजावत म्हणाल्या,” टीव्ही मधल्या बायका नटून थटून वावरतात कारण दिग्दर्शक त्यांना तसे करायला सांगतो. त्याचा त्यांना मोबदलाही मिळतो. पण तो त्यांचा फक्त अभिनय असतो. प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच असते”. म्हणून आपण म्हणतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फस्त.

संध्याकाळी अथर्व घरी आला, तापाने फणफणलेला. दप्तर फेकून दिवाणावर आडवा पडला. सरस्वतीने काळजीने त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. क्रोसिनची अर्धी गोळी सुद्धा दिली. त्याचे दुखणारे हात- पाय चेपून दिले. बळजबरीने थोडीशी भाताची पेज ही पाजली. रात्रभर काळजीने त्याच्या उशाशी बसली.

पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने अथर्वला जाग आली. मराठीच्या बाईंची वाक्य त्याच्या मनात घोळू लागली. स्वतःच्या बोलण्याची त्याला लाज वाटली. आई आपल्या कुटुंबासाठी किती खपते. त्यामुळे तिला स्वतःकडे पाहायला, आवरायला वेळच मिळत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही.

तेवढ्यात सरस्वतीलाही जाग आली. तिने कपाळाला हात लावून पाहिला. ताप आता उतरला होता. तिला हायसं वाटलं.

अथर्वने आईला घट्ट मिठी मारली म्हणाला,” सॉरी आई! टीव्हीतल्या आई पाहून मी भारावून गेलो. टीव्हीचे आभासी जग ओळखता आले नाही पण मला आता जाणवले,” दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं”. या उक्तिचा अर्थही कळाला.

तू जगातील बेस्ट आई आहेस!.
तोपर्यंत हळूहळू सूर्य वर आला होता आणि त्याच्या सोनेरी किरणांनी घर उजळून निघालं.

शब्द संख्या :- २९४.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

.

8 Comments

  1. Just tried hm888 and gotta say, the signup was smooth. They’ve got a good range of stuff to bet on. Deposits were quick too. Give it a whirl if you’re after some quick action. hm888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!