#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन. (०१/१२/२०२५)
#दोर_संवादाचे_कापले
#स्वप्नीलकळ्या🥀
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
विषय:—- न बोलता येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं .
# दोर _संवादाचे_ कापले
अलका लग्न होऊन सासरी एकत्र कुटूंबात आली. सासू -सासरे, दिर- जाऊ खूप खेळीमेळीचे वातावरण!
जाऊ समवयस्क असल्याने दोघींचे लगेच बहिणीसारखे नाते जुळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघीही माहेरी एकुलत्या एक असल्याने बहिणीची उणीव होतीच. लग्नानंतर एकमेकींच्या प्रेमाने भरून काढली.
घरातील कामाची ही वाटणी कधीच केली नव्हती.उलट जे समोर दिसेल ते काम आनंदाने एकमेकींचा सल्ला घेत आनंदात व उत्साहात पार पाडीत .सासू- सासरे,नातेवाईक व शेजारीपाजारी सगळ्यांना जोडगोळीचे खूप कौतुक व घरात दृष्ट लागण्यासारखे सौख्य!
घरात कामाचा हिशोब तसाच पैशाचाही हिशोब कधीच नव्हता. मनातील गुपितही आडपडदा न ठेवता एकमेकींशी शेअर केली जात .
सासू- सासरे जीवंत होते तोपर्यंत सगळ काही उत्तम चालू होतं.
पण कोणाचं चांगलं आयुष्य चालू असलं की ते सगळ्यांना आवडतंच असं नाही ना! काही वाईट हितचिंतक टपून बसलेले असतातच इतरांच्या वाईटावर! अशा संधीची वाट पाहणारी एक शेजारीण होतीच.एकदा कलीने घरात प्रवेश केला की क्षणात होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. तिने लावालावी करायला सुरुवात केली . सततच एखाद्या गोष्टीचा वारंवार उच्चार व्हायला लागला की नकळत हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागतात तसेच परिणाम ह्या दोघींवर व्हायला लागले.गैरसमजाची ठिणगी पडलीआणि तिने कधी पेट घेतला ते कळले सुद्धा नाही. घरातील आनंदी वातावरण बिघडून गेले. एकमेकीतील संवादाचे दोर कापले गेले व अबोल्याचा पूल वापरला जावू लागला.
भावांभावांमध्ये मात्र पूर्वी इतकेच प्रेम व विश्वास होता.त्यांनी समजावून सांगण्याचे केलेले प्रयत्न अपुरे पडले. पण कधीनाकधी त्या दोघींचे डोळे उघडतील व स्वतःच्या वागणूकीचा पश्चात्ताप होईल अशी त्यांना खात्री होती.
आणि….
त्याच दरम्यान कोरोनाचा काळ आला.असंख्य घरात पटापट मृत्यूची चाहूल लागत होती, सतत मानेवर भितीची टांगती तलवार होती.
.जावेला सर्दी-खोकला,ताप आला. सगळी कोरोनाची लक्षण दिसायला लागली . लेबाॅरेटरीत ब्लड टेस्ट करायला दिले गेले. इकडे अलकाला न बोलता येणाऱ्या शब्दांचे खूप ओझं वाटू लागले व एका क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटला.अनेक वर्षांच्या कडू -गोड आठवणी,शेअर केलेल्या सुखदुःखाच्या गुजगोष्टी डोळ्यासमोर तरळू लागल्या व दुसऱ्या क्षणीअलकाकडून संवादाचा तुटलेला दोर एकदम सांधण्याचा प्रयत्न केला गेला. तिने जावेच्या जवळ जाताच दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या, मळभ दूर झाले होते. दोघीही एकमेकींची मनापासून क्षमा मागू लागल्या.. दोघींची गळाभेट बघून फोटोतील सासूसासऱ्यांनाही गहिवरून आले असेल.
न बोलता येणाऱ्या शब्दांचे ओझे अश्रूंनीच हलकं केलं होतं!
(३१०शब्द)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

सुंदर सत्यकथा वाटली
193betlogin, I’ve used it a couple of times. Standard stuff, nothing ground breaking but reliable enough. Give it a try here: 193betlogin.