#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#नाट्यलेखन
नाटकाचे शीर्षक :- ” रॅगिंगच्या पलीकडे”
” नीला क्रिएशन” सादर करीत आहे सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणारे सौ स्मिता बोंद्रे लिखित अनिल बोंद्रे दिग्दर्शित तीन अंकी नाटक……
स्थळ :- शारदा विद्यालय.
पात्र परिचय: –
अनिकेत :- शाळेत आलेला नवीन विद्यार्थी.
विक्रम :- दहावीतील दबंग आणि रॅगिंग करणारा.
समीर आणि रोहन :- विक्रम चे साथीदार.
अदिती मॅडम :- संवेदनशील शिक्षिका.
कौस्तुभ सर :- न्यायप्रिय आणि क्रीडाशिक्षक.
डॉक्टर नेहा देशमुख :- मानसोपचार तज्ञ शाळेतील कौन्सिलर.
(तिसरी घंटा वाजते त्यानंतर पडदा हळूहळू वर जातो)
अंक पहिला:-
(स्टेजवर शाळेची भव्य इमारत आणि क्रीडांगण दिसते आहे. सकाळची कोळी उन्हे, क्रीडांगणावर पसरलेली. निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म मुलांच्या अंगावर दिसत आहे. विद्यार्थी मैदानावर फुटबॉल खेळत आहे आणि विद्यार्थिनी बॅडमिंटन खेळात रमलेल्या. थंडीचे दिवस असल्यामुळे शिक्षकही ज्यांना तास नाही ते उन्हामध्ये उभे आहेत)
अतिशय प्रसन्न, उत्साही वातावरण शाळेमध्ये दिसते आहे. अनिकेत चा पहिलाच दिवस आहे. अतिशय नवाजलेल्या शाळेत ऍडमिशन मिळाल्यामुळे तो आनंदात आहे. शिवाय त्याच्या बाबांनी नवे दप्तर, नवा युनिफॉर्म, नवे बूट कालच आणून दिले. नव्या नवलाईने, आनंदाने त्यांने शाळेत प्रवेश केला होता. काहीशी उत्सुकता तर काहीसे दडपण मनावर होतेच.
वर्गात अदिती मॅडम येतात (पांढरी शुभ्र साडी, डोळ्यावर चष्मा, हातात पुस्तक आणि रजिस्टर)
अदिती मॅडम :- ” आज एक नवीन ऍडमिशन झाली आहे. तुम्हाला नवा मित्र मिळाला आहे .त्याचं नाव आहे…. अनिकेत!
त्याचे स्वागत करूया”
सर्व वर्गातील मुलांनी टाळ्या वाजवून त्याचे उत्साहाने स्वागत केले. अनिकेत थोडासा लाजतोय आणि हसून स्वागत स्वीकारतो.
खेळाच्या तासाला क्रीडांगणात कौस्तुभ सर शिट्टी वाजवतात. अनिकेत रांगेमध्ये जाऊन उभा राहतो तेवढ्यात तिथे विक्रमचा ग्रुप येतो.
विक्रम अनिकेत कडे पाहून कुच्छीतपणे हसतो म्हणतो,” नवीन पिल्लू!”
अनिकेतला जबरदस्तीने कोंबडा बनवायला लावतात, जमिनीवर गुडघे टेकून तसंच उभा राहा म्हणतात,
दुसऱ्या दिवशीही तीच पद्धत,
विक्रमच्या गटाच्या सर्व मुलांचे शूज अनिकेत कडून पॉलिश करून घेतले. शिवाय वर्गातील एका मुलीला कॉल करून अश्लील वाक्ये बोलायला भाग पाडले. अनिकेत या सर्व प्रकाराने अतिशय घाबरला, त्याचे हातपाय लटपटू लागले, मी….मी… हे करू शकत नाही…. प्लीज ,थांबवा हे सगळं!
तेवढ्यात अदिती मॅडम तिथे येतात. त्या विक्रमच्या टोळीला पूर्णपणे ओळखून आहेत. त्या अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्याला स्टाफ रूम कडे घेऊन जातात. अनिकेत सुटकेचा निश्वास टाकतो, पण….
अंक दुसरा:-
(संध्याकाळची शाळा सुटण्याची वेळ, रिकामा कॉरिडोर. अनिकेत रिकामी पाण्याची बाटली भरून परत येत असतो इतक्यात विक्रमचा गट त्याला अडवतो…)
विक्रम :-” अरे, येड्या! ऐक…. नियम क्रमांक एक…
वरच्या वर्गाची आज्ञा ऐकायची.”
समीर :-” चल, आमच्यासमोर लावणी नृत्य सादर कर…”
रोहन :- “कॅन्टीन मध्ये सर्वांसमोर लिपस्टिक लावायची आणि मी मुलगी आहे असं म्हणत फिरायचं!”
अनिकेत प्रचंड घाबरतो, भीतीने थरथर कापतो…मी…मी… मला हे नाही करायचं!…. कृपया..”
(विक्रम त्याची बॅग जोरात हिसकावतो, अनिकेत चा खांदा दुखवतो. त्याची वह्या, पुस्तके खाली पडतात आणि डब्यातलं अन्न ही सांडते)
विक्रम :-” नाटक नको करूस? कर लवकर…. नाहीतर उद्या यापेक्षा भयानक शिक्षा करीन”
(अनिकेतला रडू आले तो कसाबसा त्यांच्या तावडीतून सटकतो थेट घरीच!)
(घरात आईने रेडीओवर छान गाणी लावलेली असतात. देवासमोर दिवा आणि उदबत्ती लावून अनिकेतला शुभंकरोती म्हणायला बोलावते. उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळलेला. एक वेगळीच प्रसन्नता. अनिकेत मात्र घाबरलेला पण शांत बसून राहिलेला ,शून्यात नजर. गणवेश बदलायचं ही भान राहत नाही. आईला मात्र जाणवतं काहीतरी वेगळं घडलं आहे.
सकाळी- सकाळी)
आई :- ” अनिकेत….एक अनिकेत,ऊठ बरं! शाळेत नाही का जायचं?
अनिकेत :- नको नको, आज मला बरं वाटत नाही.
आई :- अनिकेत! शाळा बुडवून चालणार नाही तुला जायलाच हवं.
( जबरदस्तीने ,आईच्या आग्रहास्तव तो नाईलाजाने शाळेत जातो)
(वर्गातील दृश्य- फळ्यावर छान सुविचार लिहिलेला. मुलांची हजेरी आणि गैरहजेरी एकूण पटसंख्या फळ्यावर लिहिलेली. वर्गात शिक्षक येईपर्यंतचा मुलांचा नेहमीचाच गोंधळ. अगदी मागच्या बाकावर अनिकेत घाबरून अस्वस्थ अवस्थेत चिंताग्रस्त चेहऱ्याने बसलेला. अदिती मॅडम वर्गात येतात.)
विद्यार्थी :- ” एक साथ नमस्ते!”
आदिती मॅडम :- बसा! बसा! त्यांचे लक्ष अनिकेत कडे जात अनिकेत मधला बदल जाणवला. धड पुस्तकही त्याला उघडता येईना हात भीतीने थरथरत होते त्या म्हणाल्या,” अनिकेत…. लक्ष कुठे आहे तुझं?.”
अनिकेत :- ( त्याला भावनांना आवर घालता न आल्याने तो ढसाढसा रडू लागतो)
” मॅडम! विक्रमच्या टोळीने मला खूपच त्रास दिला आणि तो सर्व काही घडलेलं सांगतो.
( अदिती मॅडम तात्काळ नेहा मॅडमला बोलावतात आणि मानसोपचार कक्षात अनिकेतची समुपदेशनाची विविध सत्र घेतली जातात)
डॉक्टर नेहा :- ” रॅगिंग म्हणजे केवळ चेष्टा नाही. मुलांच्या मेंदूवर,” फाईट- और- फ्लाईट” प्रतिक्रिया सक्रिय होते. भीती, लाज आणि आत्मविश्वास कमी होतो…. हे सगळं नैसर्गिक आहे. तू यात स्वतःला दोषी मानू नकोस”
(अनिकेत थोडा शांत होतो )
अदिती मॅडम :- ” उद्या ही समस्या आपण मुळापासून सोडवूया”
स्टेज वरचा प्रकाश मंद होत जातो आणि हळूहळू पडदा खाली पडतो.
अंक तिसरा :-
( शाळेचे सभागृह, सभागृह विद्यार्थ्यांनी भरलेलं. सभेचा विषय आहे रॅगिंग च्या संदर्भात. व्यासपीठावर कौस्तुभ सर आणि आदिती मॅडम बसलेल्या. डॉक्टर नेहा मॅडम येतात त्यांचा सत्कार मुलांच्या हातून केला जातो आणि त्या मुलांशी बोलायला उभ्या राहतात.)
डॉक्टर नेहा :- ” रॅगिंग ही मस्ती नाही. ती मानसिक अत्याचाराची सुरुवात असते. काही मुलांमध्ये यामुळे इनजायटी, डिप्रेशन, सेल्फ डाऊट निर्माण होतो. आज आपण हे थांबवण्यासाठी एकत्र जमलो आहोत. विशेषतः विक्रम व त्याच्या ग्रुपला हे समजलेच पाहिजे. आपण काय करतो ? आणि त्याचा परिणाम काय होईल? याचाही विचार सर्वांनी जरूर करावा.
संपूर्ण सभागृहात शांतता….
( अदिती मॅडम अनिकेतला बोलण्यासाठी पुढे यायला सांगतात. तो अत्यंत घाबरत, घाबरत उभा राहतो. आदिती मॅडमचा आश्वासक हात खांद्यावर ठेवल्यामुळे त्याला धीर येतो)
अनिकेत:- ” माझ्यासोबत जे झालं…. त्यांनी मला खूप भीती वाटली, मला शाळेत यायची इच्छाच नसायची. शाळा खूप वाईट आहे असंच वाटू लागलं. माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना माझी खूप काळजी वाटू लागली.
मी खूप वाईट मुलगा आहे असं मला सतत वाटू लागलं.
घरादारावरच एक ताण आला……..
(मुलं, एकटक अनिकेत कडे पाहू लागली त्याच क्षणी विक्रम व त्याचा गट उभा राहिला)
विक्रम :- ” सॉरी!…. आम्हाला मजा वाटली हे सर्व करताना. या सर्व गोष्टींचा आम्ही कधी विचारच केला नाही. आम्हालाच आता अपराधी असल्याचे जाणीव झाली आहे. आमच्या कृतीने कोणाला इतका त्रास होईल याची अजिबातच कल्पना नव्हती.”
कौस्तुभ सर:- अत्यंत कठोर आवाजात,” ही चूक नाही- हा गुन्हा आहे. पण आज अनिकेत च्या समंजसपणामुळे धैर्यामुळे तुम्हाला सुधारण्याची संधी देत आहोत. नाहीतर…. जेल आहेत!”
डॉक्टर नेहा :- (मुलांना एक छोटी गोष्ट सांगतात….)
” प्रत्येक मन म्हणजे काचेचे भांड, अत्यंत नाजूक. एकदा का त्याला तडा गेला की ते जुळूत नाही, आणि ते जुळले तरी तो तडा कायमच राहतो. शरीरा इतकच मनही महत्त्वाचं आहे.
पुढे सांगतात….” मुलांनो! आणखीन एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा…
” जी गोष्ट मी बदलू शकतो,
ती बदलण्याची ताकद दे!
जी गोष्ट मी बदलू शकत नाही,
ती सोसण्याचे मला बळ दे!
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट!
विक्रम पुढे येतो आणि अनिकेतच्या कडे पाहून हात पुढे करतो,” मित्र?”
अनिकेत :- हात पुढे करून संमती देतो आणि मनमोकळ हसतो.
संपूर्ण सभागृहात आशेचा प्रकाश उजळून निघतो.
मैत्री, सहकार्य आणि आदर हीच खरी संस्कृती नाही का? तुम्हाला काय वाटतं?
हळूहळू स्टेजवर प्रकाश मंद होत जातो त्याच वेळेला पडदाही खाली पडतो.
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात नाटक समाप्त
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Hey all, just hopped on okkbetlogin, and the login process was hassle-free. Got into the action quickly. I recommend giving it a try if you’re looking for a smooth experience. Check it out okkbetlogin