शापित सौभाग्य

#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#नाट्यलेखन
#शापितसौभाग्य

लेखक : अमुक तमुक

दिग्दर्शक : दिशादर्शक

नाटकातील पात्रे : निर्मला आपटे (नायिका), निरंजन राजवाडे (नायक), निर्मलाची आई मालती
बाबा _ सतीश, निर्मलाची बहीण स्मिता
निरंजनची आई सुमन, बाबा शरद
शेजारच्या मावशी सरला

अंक पहिला

स्थळ : शेजारच्या सरला मावशीचे चाळीतील घर. तिथे हळदीकुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. निर्मला आणि तिची आई अगदी पुढाकार घेऊन सगळी कामं करत आहेत.

सरला(प्रेमाने) : अगं निर्मला सुमनताई आताच आल्या आहेत. त्यांना हळदीकुंकू दे बघू.

मुळातच देखणी असलेली निर्मला साधीच अबोली रंगाची साडी नेसली आहे. लांबसडक केसांची सैलसर वेणी आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे. सुमनताई तिच्याकडे कौतुकाने बघत असतात. निर्मला आत जाते.

सुमन (कौतुकाने): सरला ही कोण गं नाजूक चाफेकळी.

सरला : अहो ही आमच्या शेजारीच राहते निर्मला. मी फक्त तुम्हाला एकदा मदत काय केली, सुमनताई तुम्ही एवढ्या श्रीमंत असून माझ्या घरी कोणत्याही कार्यक्रमाला चाळीत येता.

सुमन : ह्या निर्मलाच्या लग्नाचे काय बघत आहेत का. मला माझ्या निरंजन साठी अगदी अशीच मुलगी हवी आहे.

सरला : ताई पण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पण मुलीवर लाखमोलाचे संस्कार आहेत.

सुमन : तू हिच्या घरच्यांना आमचा निरोप दे.उद्या संध्याकाळी पाच वाजता आम्ही मुलगी बघायला येतोय.

(रंगमंचावर हलकासा काळोख होऊन मालतीच्या बैठ्या घराचे दृश्य दिसत आहे. लगबगीने सरला येते.)

सरला (उत्साहाने) : अगं मालती आहेस कुठे. आधी देवापुढे साखर ठेव.

मालती (हातातील कपड्याची केलेली घडी टेबलवर ठेवत): सरला असं कोड्यात बोलू नकोस. नीट काय ते सांग बरं.

सरला : अगं काल त्या सुमन ताईंनी आपल्या निर्मलाला पाहिलं आणि त्यांना ती त्यांच्या मुलासाठी पसंत आहे. उद्या ते निर्मलाला बघायला येणार आहेत.

मालती : अगं त्या कुठे आपण कुठे. उगाच इतक्या श्रीमंतघरची स्वप्नं आपण बघायला नको.

सरला(धपकन खुर्चीवर बसत): अगं वेडी आहेस का! आपली निर्मला दहा लाखात एक आहे. तू आता ते हो म्हणत असतील तर नाही म्हणू नकोस.

मालती (आनंद आणि आश्चर्यचकित होऊन): ह्यांच्या कानावर घालते सगळं. एक तर आमची काय परिस्थिती आहे ते त्यांना स्पष्ट सांगायला हवी. उद्या त्यांनी काही अवाजवी मागणी करायला नको.

इतक्यात सतीशराव घरी येतात आणि सरला जायला निघते.

सतीश (एका कोपऱ्यात चप्पल काढत) : निमू बेटा पाणी आण जरा.

निर्मला (पाण्याचा ग्लास बाबांना देत) : बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं पाऊस नसला तरी ह्या रणरणत्या उन्हासाठी छत्री घेऊन जात जा. किती घामाघुम झालात. आधी हा गुळाचा खडा तोंडात टाका आणि मग पाणी प्या.

सतीश (मंद स्मित करत): अगं तुझ्या हातचे माठातील अमृततुल्य पाणी प्यायलावर सगळा थकवा क्षणार्धात दूर होतो बघ.

निर्मला : तुमचं आपलं काहीतरीच.

मालती (आतून चहाचा कप आणते): निर्मला तू पण जरा इथेच थांब. अहो ऐकलं का! मघाशी सरला येऊन सांगत होती की ते उद्योगपती निरंजन राजवाडे आहेत ना त्यांच्या मातोश्रीना आपली निर्मला खूप आवडली आहे. ते सर्व उद्या हिला आपल्या घरी बघायला येणार आहेत.

सतीश (आश्चर्याने खुर्चीवरून उठत) : अगं काय म्हणतेस. अगं आपला महिनाभराचा खर्च म्हणजे त्यांचा दिवसभराचा खर्च. आपण कुठे त्यांना पुरे पडणार. समज ते उद्या आले तर मी त्यांना सर्व स्पष्ट सांगेन. माणसाने आपल्या पायरीने राहावं हेच खरं.

मालती : मला अस वाटतंय की हा काहीतरी ईश्वरी संकेत असावा. तुम्हाला माहित आहे ना हीच्या पत्रिकेत सुद्धा राजवैभवात, सुखात राहील असंच लिहिलं आहे. तेव्हा आपण दोघांनीही हसण्यावारी नेलं. मी आताच स्मिताला फोन करून उद्या सकाळी लवकर यायला सांगते.

सतीश (सुस्कारा सोडत) : ते बघायला येतात म्हणजे नक्कीच ते होकार देतील. बघूया सार्व देवावर सोडू आपण. चला आता जेवायला घ्या.

(रंगमंचावर थोडा वेळ काळोख होतो. देखावा बदलला आहे. लाईट सुरू होतात. आपट्यांची पुढची बैठकीची खोली त्यातल्या त्यात टापटीप ठेवली आहे. एक पलंग सुंदर विणकाम केलेली चादर त्यावर. दोन खुर्च्या, एक छोटे टेबल. बाजूला लाकडी कपाट. पडद्यावर घागर डोईवर घेतलेल्या तरुणीचे चित्र भरतकाम केलं आहे. इतक्यात घरासमोर प्रथमच आलिशान मर्सिडीज उभी राहते.)

मालती आणि सतीश (लगबगीने बाहेर येत) : या या. आज तुमच्यासारख्या थोर लोकांचे पाय आमच्या घराला लागले.

निरंजन (नम्रपणे): काका मी तुमच्याच शाळेत घडलो. तुमच्याच संस्कारांनी मी ही उंची गाठू शकलो.

मालती (सरबताचे ग्लास देत) : सरबत घ्या. उन्हातून आला आहात. सगळे जण सरबत घेतात.

स्मिता(हळूच बाहेर डोकावत निर्मलाची मस्करी करत) : निमु मुलगा चकणा आणि टकलू आहे म्हणूनच तुला मागणी घातली.

निर्मला खट्टू होते. इतक्यात बाबा बाहेरून हाक मारून सांगतात निर्मला पोहे आणि चहा आण.

निर्मला वाटच बघत असते. निर्मला बाहेर पोहे घेऊन येते. देखण्या निरंजनला पाहून भरवून जाते. ती आत येते.

निर्मला (ताईला लटके रागावत): काय हे ताई चेष्टा करणे. इतक्या देखण्या मुलाला चक्क चकणा आणि टकलू बोललीस.

स्मिता (हसत): अगं तुझी गंमत केली.

शरद : हे बघ निरंजन तुझा होकार असेल तर आताच सांग उगाच निरोपवर निरोप पाठवण्यात वेळ नको जायला.

निरंजन : आई बाबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही.

हे शब्द ऐकताच निर्मला स्मिताला मिठी मारते.

सतीश : राजवाडे साहेब मी सर्वप्रथम सांगतो तुमची आमची बरोबरी होऊ शकत नाही.

सुमन (सतीशला मध्येच थांबवत) : छे छे! तुम्ही हा विचारच मनात आणू नका. आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या. दोन्हीकडील सर्व खर्च आम्हीच करणार. तुमच्याकडील मानपान, निर्मलाचे दागिने अगदी सर्व. तुम्ही काळजी करू नका. अजिबात टेन्शन घेऊ नका.

मालती : तरीसुद्धा रीतीप्रमाणे तुमचं मानपान आम्हाला जमेल तसं आम्ही करू. तुम्ही ते गोड मानून घ्या.

सुमन : तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा. आम्ही नाही म्हणणार नाही. मी लवकरच गुरुजींना साखरपुड्याचा मुहूर्त काढायला सांगते आणि तुम्हाला कळवते. आम्ही येतो आता.

मालती (सर्वजण गेल्यावर आनंदाने) : स्मिता देवापुढे साखर ठेव. मी ही गोड बातमी लगेच सरलाला.सांगून येते. तिच्यामुळेच हा योग आला.

(नाटकाचा पहिला अंक संपतो. पडदा पडतो)

_______

अंक दुसरा

स्थळ : आपट्यांची पुढची खोली. मालती कपाट उघडून काहीतरी शोधत आहे. इतक्यात सरला निरोप घेऊन येते.

सरला (उत्साहाने): अगं मालती, निर्मला आहे ना घरात.

मालती : आहे ना ती कुठे जाणार! तिला खरं तर पदवीधर झाल्यावर लग्न होईपर्यंत तरी नोकरी करायची होती. पण आमचे हे म्हणाले मी आता लवकरच निवृत्त होणार. त्याआधी तिचं लग्न करूया. बरं तू आता सकाळीच कशी आलीस?

सरला : सुमन ताईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की निरंजनला निर्मलाशी काल काही बोलता आलं नाही. म्हणून आज त्याने तिला गावाबाहेरच्या टेकडीवर संध्याकाळी पाच वाजता बोलावले आहे. म्हणजे दोघांना एकमेकांशी नीट बोलता येईल.

मालती (ह्याला आता हिच्याशी काय बोलायचं असेल हा विचार करत) : दोघी मागल्या दारी गप्पा मारत बसल्या आहेत. मी सांगते तीला. ती जाईल पाच वाजता.

सरला गेल्यावर मालती दोघींना बोलावते.

स्मिता (घाईत) : आई चल मी निघते आता. हे कंपनीत गेले असतील. जयला कॉलेजला जायचं असेल.

मालती : अगं तो लहान का आहे आता! आज संध्याकाळी निर्मलाला निरंजनने टेकडीवर भेटायला बोलावलं आहे.

स्मिता (मजेत निर्मलाला डोळा मारत): मज्जा आहे बुवा एका माणसाची. लगेचच भेटायला बोलावलं आहे. ए तू ती अंजिरी रंगाची लाल काठवाली साडी नेसून जा हा. ती तुला खूप शोभून दिसते.

निर्मला (लटक्या रागाने) : ताई तू पण ना.

स्मिता (घाईत) : चला निघते. अकराची एस टी मिळेल मला.

मालती (घाईघाईने): कालच्या कार्यक्रमासाठी शंकरपाळे केले होते. थोडे जयला घेऊन जा.

रंगमंचावर अंधुक प्रकाश आहे. निर्मला ओसरीवर उभी आहे. तिच्यावर निळा प्रकाशझोत टाकला आहे. निर्मलाचे स्वगत प्रेक्षकांसाठी.

निर्मला (स्वगत) : निरंजन किती देखणे आणि रूबाबदार व्यक्ती. इतके श्रीमंत तरीही किती नम्रपणा. त्यांनी आज मला का बोलावलं असेल. असं काय बोलायचं असेल त्यांना आपल्याशी. आताशी ह्या घड्याळात साडेबाराच वाजले आहेत. आज हे घड्याळ पण दुष्टपणाने हळू हळू चालतंय का! निरंजन आपल्यासारखे बोलके असतील की मितभाषी असतील. त्यांनीही बोलके असावं नाहीतर आपल्या बडबडीला कंटाळतील. मी तर अंगणातील झाडांशी, पक्ष्यांशी पण संवाद साधत असते. ज्याला ते आपला वेडेपणा तर समजणार नाहीत ना! टेकडीवर चढताना ते हळूच आपला हात हातात घेतील का. सरला मावशींच्या टीव्ही वर हिंदी सिनेमात पाहतो तसे. पहिल्याच भेटीत हात कसा धरतील. स्वप्नरंजनात रंगलेल्या निर्मलाच्या कानावर बाबांची हाक ऐकू येते.

बाबा (बाहेर येत): आता आणलेले मोगऱ्याचे गजरे ओल्या कपड्यात ठेवलेस ना नाहीतर सुकून जातील.

निर्मला : हो बाबा आता ठेवते.

घड्याळात चार वाजताच निर्मला छान तयार होते. कपाटाच्या आरशात स्वतःच्या छबीकडे पाहत ती गर्रकन गिरकी घेते. मालती ते बघते.

मालती (निर्मलासमोर हाताची बोटं मोडत):
किती गोड दिसतेस निमू . कोणाचीही दृष्ट नको लागायला. जा आता निघ लवकर. साडेचार होऊन गेले.

रंगमंचावर हलकासा अंधार होऊन टेकडीचे दृश्य दिसते. मनाच्या धुंदीत लहरत निर्मला टेकडीपशी येते. निरंजन तिची वाट पाहत असतो.

निर्मला (खजिल होऊन): तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली नाही ना!

निरंजन : पाचच मिनिटं झाली. आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो.

निर्मला: निसर्ग तुम्हाला आवडतो ना मग टेकडीवरून तुम्हाला छान सौंदर्य पाहायला मिळेल.

दोघे एका खडकावर थोडे अंतर ठेवून बसतात. निर्मलाला वाटतं निरंजन ने आता तरी तिचा हात हातात घ्यावा.

निरंजन (थेट मुद्द्यावर येत): निर्मला मला लग्नाआधी तुला एक सत्य सांगायचं आहे. ते ऐकून तू तुझा निर्णय घे.

निर्मला (भयभीत होऊन): सत्य? कसलं सत्य!

निरंजन : हे बघ मी गोल गोल फिरवून सांगणार नाही. कॉलेजमध्ये असतांना माझं एक मुलीवर प्रेम होतं. म्हणजे आजही आहे. कॉलेज संपल्यावर आम्ही आपापल्या घरी सांगून लग्न करणार होतो. इतक्यात एका अपघातात मला तिला कायमचे गमवावे लागले.

निर्मला (सखेद): हे खूप दुःखद झालं. मला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय. पण आता ती मुलगी तुमच्या आयुष्यात नाही ना. मी लग्नानंतर तिची जागा घेऊ शकले नाही तरी तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही.

निरंजन : मला खरं तर लग्नच करायचं नव्हतं पण आईने बाबा आजारी असताना माझ्याकडून वाचन घेतलं आणि मला शब्दांत अडकवले. हे मी तुला ह्यासाठी सांगितलं की तू मला नकार दे म्हणजे एक दोन वर्ष तरी आई लग्नाबद्दल काही बोलणार नाही.

निर्मला : तुमच्यात नकार देण्यासारखं काहीच कारण नाही.

निरंजन : काहीही सांगून तू नकार दे. कारण माझं तुझ्याशी लग्न झालं तरी मी चारचौघात सर्वांसमोर तुला पत्नीचा दर्जा देऊ शकेन पण एकांतात आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल. मला माहित आहे हा तुझ्यावर अन्यायच होईल. दोन दिवसात तुझा नकार कळव अन्यथा मला आईला पुढची तयारी करायला सांगावं लागेल. माझं बोलून झालं आहे. तुला काही बोलायचं आहे का?

निर्मला (स्वतःच्याच विचारात) : नाही

निरंजन (रुक्षपणे): निघूया आपण.

निर्मलाच्या मनात येत होतं येताना आपण किती स्वप्न रंगवली आणि जाताना आपल्या आनंदावर विरजण पडलं. दोघे विरुद्ध दिशेने जाताना दिग्दर्शक दाखवतो.

दुसरा अंक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून संपतो. पडदा पडतो.

_____

अंक तिसरा

स्थळ : निर्मला घरी निघाली आहे. रस्त्याचं दृश्य रंगमंचावर दिसत आहे. अधून मधून झाडं आहेत. चालताना निर्मलाचं स्वगत

निर्मला (स्वगत) : हे स्थळ चालून आलं आणि आपल्या सर्वांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता. आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली अथवा इतर काहीही असलं तरी ह्या चालून आलेल्या स्थळाला नकार देऊन कसं चालेल. निरंजन खूप प्रामाणिक आहे. त्यांच्या जागी इतर कोणी असता तर आपल्याला अंधारात ठेवलं असतं. आईबाबा आपली लेक श्रीमंत सासरी जाणार म्हणून खुश आहेत. त्यात ह्या लग्नाचा बाबांवर काहीही बोजा पडणार नाही. कमीत कमी निवृत्ती नंतर मिळणारे पैसे त्यांच्या गाठीशी राहतील. आपल्याला होकार द्यायलाच हवा. मनसोक्त रडून घे निर्मला. घरी गेल्यावर खुशीचा मुखवटा तुला पांघरावा लागेल. एक मात्र नक्की मी माझ्या शांत, संयमी स्वभावामुळे सगळ्यांची मने जिंकून घेईन. एक ना एक दिवस निरंजन माझ्या स्वभावाचा विचार करून माझा स्वीकार नक्कीच करतील.

इतक्यात घर जवळ आल्यावर आनंदी बुरखा पांघरून निर्मला घरात प्रवेश करताना बाहेरूनच लाडात ओरडते.

निर्मला : आssई मी आले.

मालती (आनंदाने): किती खुश दिसते आहेस निमू. कसे आहेत ग जावईबापू बोलायला. अहो ऐकलं का निमू आली एकदम खुशीत.

तिघेही खूप बोलतात. निर्मलाला कळतंय की आपल्याला अभिनय जमतोय.

एका सुमूहर्तावर निर्मला निरंजन शुभविवाह पार पडतो.

रंगमंचावर थोडासा काळोख होतो आणि दृश्य दिसतं ते राजवाडेंच्या आलिशान बंगल्याचे. सुमन सोफ्यावर बसली आहे आणि निर्मला उभी आहे.

सुमन (प्रेमाने): अगं निर्मला बैस ना. किती वेळ उभी राहशील. आता हे तुझेच घर आहे. अशी परक्यासारखी उभी राहू नकोस. तू निरंजन गेल्यावर खाली यायचंस. इथे तुला कोणी धारेवर धरणार नाही. इतक्यात निरंजन भरभर पायऱ्या उतरून खाली येतो. तो आईच्या पाया पडून निघायला बघतो.

सुमन (जरबेने): निरंजन कुठे निघाला आहेस.

निरंजन : आई ऑफिसला जातो. लग्नामुळे खूप सुट्टी झाली. कामं पेंडिंग आहेत.

सुमन (हुकमी आवाजात) : तू कुठेही जायचं नाहीस. बाबा आणि मॅनेजर सगळं बघून घेतील. मला माहित होतं तू स्वतःहून काही करणार नाहीस. मी तुमच्या दोघांची काश्मिरची पॅकेज टूर बुक केली आहे.

निरंजन : अगं आई आम्ही नंतर जाऊ ना. मी खरंच सांगतो आता शक्य नाही.

सुमन : अरे ह्या मुलीच्या हौसे मौजेचा तरी विचार कर. निर्मला तू कुठे कुठे बाहेर फिरली आहेस.

निर्मला (अडखळत): मी तर फक्त एकदा मावशी कडे मुंबईला गेले आहे. बाकी गावाच्या बाहेर कधीच गेले नाही. काश्मीरचे सौंदर्य फक्त हिंदी सिनेमात पाहिलं आहे.

सुमन : येडाबाई मग नवऱ्याजवळ हट्ट करायचा असतो. चल जा लगेच बॅग भर. आणि साड्या इथेच नेसायच्या. बाहेर फिरायला जाताना आपण परवा घेतलेले पंजाबी ड्रेस आणि जीन्स घालायची.

निर्मला : मी असले कपडे कधीच घातले नाहीत. मला शोभतील का?

सुमन (कौतुकाने): तुझ्यामुळे कोणत्याही कपड्यांची शोभा नक्कीच वाढत असणार.

अशा तऱ्हेने सुमन ताईंच्या मायेच्या पदराखाली निर्मलाचे आयुष्य इतरांसाठी सरळ रेषेत चाललं होतं.

आता लग्नाला एक वर्ष होऊन गेलं आहे. रंगमंचावर हलकासा काळोख होऊन निरंजनची सुंदर सुबक खोली दिसते आहे.

निरंजन (अपराधीपणाने स्वगत): ही निर्मला काय विलक्षण मुलगी आहे. तिच्या आपल्याकडून कसल्याच अपेक्षा नाहीत. एखादी तपश्चर्या करावी तशी आपला संसार करते आहे. हिच्या जागी दुसरी कोणी असती तर आदळ आपट, तोंडाने सतत बडबड, आपल्याबद्दल कायम तिरस्कार दाखवला असता. आपलं प्रेम आपल्याला मिळालं नाही ह्यात हिचा काय दोष! आपण हिच्याशी नीट वागायला पाहिजे. थोड्याच दिवसात ती आई बाबांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आज हिच्याशी बोलले पाहिजे. इतक्यात निर्मला वर त्यांच्या खोलीत येते.

निर्मला (काळजीने) : आज तुम्ही हे गरम पाणी प्या. खोकला झाला आहे. दिवसभर दगदग असते तुमची.

निरंजन : निर्मला तुला एक विचारायचं आहे. तुला हे असं अग्निदिव्य करत जागण्याचा काहीच त्रास होत नाही का!

निर्मला : खरं तर मला हे अग्निदिव्य वाटतच नाही. तुम्ही आणि आई बाबा किती चांगले आहात. माझ्यापेक्षा कितीतरी जणींना खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यापेक्षा मी खूप सुखी आहे आणि मला खात्री आहे हेही दिवस जातील. माझं प्रेम तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल.

निरंजन (आश्चर्याने): मी तुझ्याशी तुटक वागून पण तू माझ्यावर प्रेम करतेस. कोणत्या मुशीतून देवाने तुला घडवले आहे कोण जाणे. बरं निर्मला हा बेड खूप मोठा आहे. अजून किती दिवस खाली झोपणार. तू वरती झोपू शकतेस.

निर्मला (दृढ निश्चयाने) : जोपर्यंत तुम्ही मला खऱ्या अर्थाने आपली म्हणत नाहीत तोपर्यंत मी खालीच झोपणार.

अशा तऱ्हेने दिवसागणिक निरंजनचे मन निर्मलाकडे झेप घेत होतं. त्याला तिच्या दृढनिश्चयाचे कौतुक वाटत होतं. एक दिवस तो ऑफिसमधून लवकर घरी आला. निर्मला खाली बसून फरशी पुसत होती.

निरंजन (आश्चर्याने) : निर्मला घरात दोन मावशी कामाला असताना तू का फरशी पुसते.

निर्मला : एक मावशी आजारी आहेत आणि एक मावशी घरी अडचण आहे म्हणून घरी लवकर गेल्या. मला असल्या कामांची सवय आहे.

निरंजनला तिच्या स्वभावाचा अजून एक कंगोरा दिसला.

निरंजन : संध्याकाळी तयार हो. आपल्याला बाहेर जायचं आहे.

संध्याकाळी दोघे बाहेर पडतात.

निर्मला : आपण कुठे जातोय.

निरंजन : जिथे जायला तुला खूप आवडतं. आज मला कबुलीजबाब द्यायचा आहे.

दोघे टेकडीवर येतात.

निरंजन (प्रेमाने निर्मलाचा हात हातात घेतो) : निर्मला तू तुझ्या वागणुकीने माझ्यासारख्या माणसाच्या मनात प्रेम निर्माण केलं. इथेच मी तुझ्या मनावर आघात केला होता. मी आजपासून तुझा खऱ्या अर्थाने पत्नी म्हणून स्वीकार करतो. तू मला या पुढेही अशीच साथ देशील ना.

निर्मला : आज माझं स्वप्न साकार झालं. माझ्या शापित सौभाग्याला उ:शाप मिळाला.

निरंजन ने निर्मलाला जवळ घेऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेतलं. शेवट गोड झाला.

तिसरा अंक संपतो.

सर्व कलाकार रंगमंचावर येऊन एका रांगेत उभे राहून थोडेसे झुकून प्रेक्षकांना अभिवादन करतात.
प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात.

पडदा खाली येतो.

समाप्त

©️®️सीमा गंगाधरे

49 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!