जीवन आनंद

#माझ्यातली/ला_ मी
#वीकेंड _टास्क
#विषय _जीवन-आनंद.
1 नोव्हेंबर 2025
विजय रघुनाथ भदाणे

जगण्याचा उत्सव एक जीवनानंद !

जगणे हा एक उत्सव असतो व उत्सव बरोबर आनंदी आनंद हे समीकरण दृढ आहे.म्हणुन जीवन जगताना त्याचा सर्वतोपरी आनंद घ्यावा वा लुटावा तसेच तो दुसऱ्याला देण्यासाठी त्यास आपल्या आनंदात सामील करून घ्यावे.त्याने जगणे अधिक सुंदर होते.हा हृदयातील जीवनानंद उधळत जगणे म्हणजे खरे जगणे असते .तत्पुर्वी जीवनातील आनंद आपण स्वतः शोधायचा असतो.त्यासाठी दृष्टी व्यापक हवी व हृदयात रसिक वृत्ती मात्र हवी.अगदी लहानसहान,किरकोळ बाबीतही आनंद शोधायचा असतो.आनंद हा अनुभवता आला पाहिजे.कारण सुख व दुःख या संवेदना आहेत तसा आनंद ही अनुभूती आहे.ती मात्र जाणीवपूर्वक घ्यायची असते.
आनंदाचे अस्तित्व आपल्या अंतर्यामी असते.समाधानी वृत्ती म्हणजे आनंदाची खुण आहे.आहे त्यात समाधान मानणे नसले तर खंत न करणे किंवा असले तर असु द्या नसले तर नसु द्या ही समंजस समाधानी प्रवृत्ती म्हणजे आनंद.तो अंतर्यामी,ह्रदयी वास करत असल्याने तुज आहे तुजपाशी ! या विधानानुसार त्याला शोधण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नसते.सौंदर्य हे अवलोकन करण्याच्या दृष्टीत असते तसच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो.आनंदात राहण्याची सवय जडली की जीवनाच्या वाटेवर अगदी साध्यासुध्या गोष्टीतुन आनंदाच्या बागा फुलत असतात त्यात स्वच्छंदे विहरत आनंदी वृत्तीने आनंद टिपायचा,वेचायचा असतो.
शब्द,स्पर्श, रस,रूप,गंध या अभिव्यक्तीतुन,नाना कलागुणांच्या अनुभूतीतून मनुष्यमात्राला निकोप आनंद प्राप्ती होत असते.” रसे- रूपे च गंधे च शब्दे स्पर्षे च योगिनी !” रस,रूप,गंध,शब्द,स्पर्श या सकल कला गुणांचे,भावनांचे वरदानच मनुष्याला विधात्याकडुन वा निर्मिकाकडुन लाभल्याने तो साहित्य,संगीत,नृत्य,नाट्य,आदी कला
प्रकारांचा आस्वाद घेऊ शकतो व त्यातुनच खरा जीवनानांद उपभोगु शकतो.कोणत्याही कलेत सौंदर्य हे दडलेले असते. सौंदर्य म्हणजे नाजुकता,नजाकतता, कोमलता,लयबद्धता तसेच नवनिर्मितीतुनही कला साकारते.कलेच्या अभिरुचितुन,रसास्वादाने,दर्शनाने मनाच्या चित्तवृत्ती उल्हासित,प्रसन्न होतात म्हणजेच आनंदप्राप्ती होते.शास्त्र हे कोणत्याही विषयाचे बौद्धिक ज्ञान तर कला ही आनंदमय भावना जोपासते. कलेतुन आत्मानंद लाभतो.शब्द म्हणजे भावना,स्वर सुरांचा अनोखा असा त्रिवेणी संगम!शब्दब्रम्हांतुन भावविश्व साकारते.स्वर सूर विलासातुन श्रुती तृप्त होतात.तर भोजनातील षडरस रसनेला रुची आणत ती पाककला अंतर्यामी तृप्त करते.अशारितीने कोणत्याही कला या उच्च अभिरुचीने आस्वादकला ब्रम्हानंद प्राप्त करून देत त्याच्या जीवनाची बैठक बदलून टाकतात.म्हणुन कलारंग व जीवन आनंद यांचे अतुट असे नाते आहे.
निसर्गातील फेरबदल अनुभवणे, निसर्ग सहवासाचा आनंद लुटणे ही देखील आत्यंतिक जीवनानंद देणारी जागा आहे. निसर्ग व माणूस या दोहोंचा एकमेकांशी अगदी लहानपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत काहीनाकाही संबंध येत असतो.अगदी घरातील अंगणात, गच्चीवर बसुन दिसणारे आकाश,ढग,ग्रह,तारे,चंद्र,सुर्य,बाहेरील झाडे,लता, वेली, आकाशात विहरणारे पक्षी मनाला उभारी देतात.मानवी मनाला सृष्टीविषयी गुढाकर्षण असते.पाउस, नद्या,समुद्र,डोंगर,पर्वत,जंगल,वने उपवने,राने वृक्षराजी,ग्रह तारे, सृष्टीच्या या रूपाची मनुष्याला ओढ असते.सहा ऋतूंचे सहा सोहळे मनुष्याच्या चित्तवृत्ती फुलवतात,प्रसन्न करतात.पावसाळ्यातील हिरवाईचा सृजनोत्सव,हिवाळ्यातील आल्हादकता,उन्हाळ्यातील वसंतोत्सव त्यास भरभरून आनंद देत असतात.धावपळ,धकाधकीच्या व त्याच त्या जीवनाचा कंटाळा,मानसिक ताण,थकवा आला की तो निसर्गरम्य ठिकाणी जाउन त्याच्या सानिध्यात राहतो. निसर्गाचे नयनरम्य चित्र बघुन हरकुन जातो,मन उल्हासित करत मानसिक ताणतणाव थकवा कमी करून येतो.या निसर्गाचे अपत्य,मूलाधार जे झाड यावर तर मनुष्याचे विलक्षण प्रेम असते.अंगणात झाडे लावुन किंवा जागेअभावी कुंड्यात रोप,वेली, फुलझाडी फुलवून सृजनाचा अनुभव घेतो.त्यापासून मिळणारे नेत्र सुख,रस रंग,रूप,सुगंध,छाया हे त्याच्या जीवनावर प्रभाव टाकतात.झाडापेरात व मनुष्यात अनोखे नाते निर्माण होते.अबोल झाडांची हिरवी बोली त्याच्याशी गुजगोष्टी करते.जीवनानंद देणारा निसर्ग मानवाचा बहिश्चर प्राणच आहे!!

विजय रघुनाथ भदाणे
686,रविवार पेठ .
नाशिक.1
9552213340.

error: Content is protected !!