# माझ्यातली मी
#लघुकथालेखन
@ everyone
🌹शीर्षक – खरे सौदंर्य 🌹
आज ‘युवा विचार मंच’च्या ऑडिशनसाठी कॉलेजमध्ये लगबग होती. रूपा आणि तिच्या मैत्रिणी पार्लरमधून आल्या होत्या, तर दीपा एका कोपऱ्यात पुस्तक वाचत होती. लोखंडे सर बाह्य सौंदर्याला प्राधान्य देतात म्हणून ती निराश होती. “माझं साधं रूप त्यांच्या निकषात बसणार नाही,” असा तिचा विचार.
पण नियतीने ट्विस्ट आणला. लोखंडे सरांच्या जागी स्मिता मॅडम ऑडिशनसाठी आल्या आणि त्यांनी सर्वांना भाग घेणे अनिवार्य केले. नाइलाजाने दीपा मंचावर आली.
तिने ‘शिक्षणाचे खरे मोल’ या विषयावर बोलायला सुरुवात केली. तिच्या आवाजातील साधेपणा थेट हृदयाला भिडणारा होता. तिच्या विचारांतील तळमळ पाहून सभागृह स्तब्ध झाले. स्मिता मॅडमनी दीपाची निवड केली. रूपाला मात्र हे पाहवत नव्हते.
रूपा: “मॅडम, दीपा दिसायला… जरा साधी आहे. एवढ्या मोठ्या मंचावर…”
स्मिता मॅडम: “रूपा, आकर्षक चेहरा तात्पुरता असतो, पण विचारांची धार चिरकाळ टिकते. दीपाचे विचार मंचाला खरे सौंदर्य देतील.”
दीपाच्या सादरीकरणामुळे कॉलेजने राज्यस्तरीय स्पर्धेत मोठे यश मिळवले. बक्षीस वितरण सोहळ्याला लोखंडे सर आले. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप आणि आश्चर्य होते. त्यांनी कबूल केले, “मी माझ्या फक्त बाह्य सौंदर्याला महत्त्व देण्याच्या चुकीमुळे कितीतरी गुणी विद्यार्थ्यांना डावललं असेल. पण आज माझ्या डोळ्यांवरील पडदा दूर झाला. मी फक्त आजपर्यंत बाह्य सौंदर्याला महत्त्व दिले, पण आज सिद्ध झाले की, चेहऱ्याचं तेज क्षणिक असतं, पण विचारांचं सौंदर्य चिरकाळ टिकतं!”
दीपाने नम्रपणे सरांना वंदन केले. त्या क्षणी, महाविद्यालयाने केवळ बक्षीस जिंकले नव्हते, तर सौंदर्य आणि विचारांची खरी व्याख्या आत्मसात केली होती.
शब्द संख्या 210 ~अलका शिंदे

