शीर्षक: खरे सौंदर्य
संदेशला त्याच्या चेहऱ्यावरील छोट्या व्रणामुळे दोनदा नकार मिळाला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता. यावेळी नकार मिळाला तर लग्नाचा विचार सोडायचा, असा त्याचा निर्णय होता. श्रद्धाच्या घरी त्याचे कुटुंब पोहोचले. श्रद्धाच्या घरच्यांना संदेशच्या गालावरील व्रण दिसला आणि त्यांना तो नापसंत होता. पण जेव्हा श्रद्धा आणि संदेश एकांतात बोलले, तेव्हा श्रद्धाने व्रणाबद्दल विचारले. संदेश म्हणाला, “मला व्यसन नाही. हा डाग सियाचीन बॉर्डरवर बॉम्ब हल्ल्यात खडकांच्या टुकड्यांमुळे झाला. चार शस्त्रक्रियांनंतरही हा कायम राहिला. याच कारणामुळे दोन मुलींच्या घरच्यांनी नकार दिला; त्यांना वाटले मला गुटख्याचे व्यसन आहे.”
संदेशने विचारले, “तूही नकार देणार?” पण श्रद्धाने त्याच्या देशप्रेमाला आणि प्रामाणिकपणाला पाहिले. घरी परतल्यावर तिने ठामपणे सांगितले, “मला संदेश पसंत आहे. त्यांच्याशीच लग्न करीन, नाहीतर नाही!” तिच्या आई-वडिलांनी विरोध केला, पण श्रद्धा म्हणाली, “सौंदर्य चेहऱ्यात नाही, त्यांच्या विचारांत आणि देशप्रेमात आहे.” तिच्या ठामपणाने सर्वजण राजी झाले आणि साखरपुडा झाला.
नंतर श्रद्धाने सर्व सांगितले तेव्हा तिचे कुटुंब म्हणाले, “आम्ही चेहऱ्याचे सौंदर्य पाहिले, पण तू त्याच्या विचारांचे सौंदर्य पाहिले. हेच खरे सौंदर्य आहे.” खरे सौंदर्य बाह्य रूपात नसून मनाच्या आणि विचारांच्या शुद्धतेत असते, हे श्रद्धाने दाखवून दिले.
शब्दसंख्या: २२५
#सोमवार_२७_१०_२०२५
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

