बदल गया दूल्हा

inbound8017189319516737282.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२७/१०/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

बदल गया दूल्हा

प्रत्येकाला आपलं लेकरू त्याचं हसणं त्याचं बोलणं
हे सुंदर सुरेखच वाटत असतं.पण ही कळी म्हणजे खरंच सुकोमल होती..दिसायला.अनेक भुंगे पिंगा घालत होते..पण ज्यांची त्याची सौंदर्याची परिभाषा आपापल्या घडलेल्या कोषाप्रमाणे असते. तिला गुंजारव भावला तो एका दिसायला सामान्य खाकी वर्दीतल्या खाकी कातडीचा सावळ्याचा .. खाकी डोक्याचा..

जातिभेद पाळू नये म्हणतात पण आत्या भोचक आणि वचकीच.
अरे याला तर जातही नाही .. हा भटक्या जमातीतला.
झालं.. ठिणगी पडली..आत्याला म्हणे नारळ दिला..कायमचा हातात.

एकीकडे दुसरा भुंगा मात्र स्मशान वैराग्य आल्यासारखा हिमालयाच्या कुशीत जाऊन बसला होता..देवाजवळ धरणं धरून बसला होता..करीन लग्न तर हिच्याशीच..अतूट प्रेम होतं ते.. लाल गाडीचा रूबाब नव्हता.. परफ्यूम अवाच्या सवा शाॅपिंगचा छंद नव्हता..महागड्या भेटवस्तू द्यायची नाटकं नव्हती..फोनवर तासनतास अनुनय करायची सवय नव्हती..होता सुंदर ..पण तरीही निगर्वी.

पण घरी उघड केलं..लग्न ठरलं..बाप मिरवत होता..लाल गाडीतला जावई..सतत नव्या मागण्यांनी आईवडील हैराण..प्रेमविवाह असा ??
ऐनवेळी कळलं..नोकरीवरनं सस्पेंड..तारपीटसिंग..सर्व व्यसनं असलेला..
दुर्गावतार धारण केला ..मायलेकींनी.. लग्न सोडूनच आल्या..परत आमच्या वाटेला जायचं नाही..पण घरी आल्यावर दडपण होतंच.

आता तिला शांत डोक्यानं विचार करावा वाटला..आणि त्याचा गुंजारव तिच्या कानात तिच्या मनात पोचला.
सुरेल वाटला..त्याचं निसर्गदत्त सौंदर्य आठवलं..मोहक हसणं आठवलं..त्याचं मोजून मापून बोलणं वागणं आठवलं..त्याचं डोळ्यात साठवणं आठवलं..आणि ती गोठून गेली.. स्वतःच्याच बेफिकीरपणा आठवत.

अर्थातच विरघळली.. आईवडीलांशी लाडात आल्यावर नेहमीच्या तोडक्या मोडक्या हिंदीत बोलायची..तशी आजही बोलली पण निर्धाराने.. बदल दो दूल्हा..
लग्न होणारच..त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच मुहूर्तावर.

आईवडील बघत राहिले.. सुंदर लेकीच्या सुंदर डोळ्यांत..
आज दिसण्यातल्या खऱ्या सौंदर्याचा नात्यातल्या अकृत्रिम गोडव्याचा साक्षात्कार झाला होता ना..
खरंच आज लेकीचे डोळे अजूनच सुंदर दिसत होते.

आत्याचं मन खरंच सुंदर होतं.. अपमान विसरून
बोलली..पोरगी वाचली.देवाला काळजी असते म्हणायचं.

पण,अजूनही पुरती ओळख पटली नव्हती खऱ्या सुंदर नात्यांची.माफी मागितलीच नाही.
मनं अजून सुंदर होणार होती.हळूहळू अनुभव येत गेल्यावरती,जाणीव झाल्यानंतर..!!

नाती असो वा व्यक्ती.. डोळे आणि अंतर्चक्षु खऱ्या अर्थाने उघडे असावेत.. झापडं लावलेले नसावेत..तरच होते पारख खऱ्या सौंदर्याची.. म्हणूनच म्हणतात .. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असावं लागतं.. होय ना??

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

error: Content is protected !!