अनमोल साठा
अविनाश ला वाचनाची खूप आवड.. घरातील वातावरणच वाचन संस्कृतीचं.. कथा, कादंबऱ्या शिवाय पोथी, पुराणकथा, दासबोध, श्रीमद्भगवत गीता.. अशा अनेक धार्मिक, वेगवेगळ्या धर्म पंथांच्या पुस्तकांनी त्याचं घर समृद्ध होतं. त्याचे आजोबा नेहमी म्हणायचे, “वाचाल तर वाचाल.. पुस्तक जीवनाचा आरसा असतो, सगळी नाती दूर केली तरी पुस्तक आपल्या सोबत असतं.. ते कायम आपला सोबती, सखा,मित्र..” हेच अविनाशच्या मनावर बिंबविल्या गेलं.
अभ्यासाच्या, वाचनाच्या आणि हुशारीच्या जोरावर त्याला .. वाचन संस्कृतीची आवड तरुणाईत निर्माण करण्यासाठी परदेशातील संस्थेत नौकरी मिळाली. अशातच एका अपघातात घरातील सगळे जखमी झाल्याचा त्याला फोन आलेला.. त्यातच आजोबा गेले. गावी आला.
सारे स्थिरसावर झाल्यावर त्याने आजोबांची पुस्तकांची पेटी उघडली. त्यातील पुस्तकांचा खजिना बघून तो अवाक झाला. यापूर्वी कधीही न वाचलेली पुस्तकेही होती.. पानं जीर्ण झालेली.. पानांच्या कडा फाटत आलेल्या.. लीळाचरित्र, साती ग्रंथ, महादंबेचे ढवळे, रुक्मिणी स्वयंवर..सारे महानुभावीय साहित्य.. एका पुस्तकात त्याला चिट्ठी दिसली.. आजोबांनी त्याच्यासाठी लिहिलेली..
“अवि, तुझी आजी महानुभाव पंथाची होती.. लवकरच गेली ती.. ही सारी तिची पुण्याई.. तिची धन संपदा.. मी नेहमी महानुभाव पंथाला नावं ठेवत आलो.. त्यामुळे ही पुस्तके कधी वाचली नाही.. कुणाला दाखवली नाही.. पण जेव्हा सगळे बाहेर कामासाठी गेले की वेळ जाण्यासाठी ही पुस्तके वाचू लागलो.. अनमोल साठा आहे हा.. हे वाचताना तुझ्या आजीचा चेहरा सतत डोळ्यासमोर यायचा. जेवढं आमचं नातं घट्ट आणि पवित्र त्याहूनही या पुस्तकातील मार्गदर्शन आणि ज्ञान अचंबित करणारं आहे. महानुभाव साहित्य हे मराठीतील अनमोल साहित्य आहे. ते जप.. त्याचा अभ्यास कर.. तुला कधीही एकटेपणा जाणवणार नाही असे हे साहित्य जुन्या पुस्तकांप्रमाणे नातंही घट्ट करतं .. जगण्याची दिशा देतं..तुला खूप खूप आशीर्वाद..
… आजोबा ”
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (२५/१०/२५)

