संवाद शब्द न् नाती .. गीता

inbound2998697057613266935.jpg

माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२४/१०/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

जोडी अपुली..प्रसन्न.
तत्वं अंगी बाणवलेली
आणि नातं लोणच्यासारखं मुरलेलं.
शब्दांचे अर्थ का बरं बदलतील.. पुस्तकांतले आणि रोजच्या संवादातलेही ..!!
——————————————

शेजारी आजी वय ७० आजोबांचं ७७.
भाड्याचं घर.पहिला मजला.
एकच खोली जराशी अंधारीच.
लेकी आपल्याआपल्या घरी सुखी.पहाटे उठतात.
जोडीनं चालायला जातात.येताना मंडईतून भाजी दूध घेणार.

नितनेम..काकू पारोसा कचरा काढणार.घराचा एक न् एक कोपरा प्रसन्न.नंतर स्नान.बाथरूम घासूनच बाहेर तेही प्रसन्न.
छोटीशी रांगोळी,उंबराही हसणार प्रसन्नतेनं.

चहा नाश्त्याची तयारी चालू.काका पालेभाजी निवडणार.भाज्या आवरून देणार-फ्रिजसाठी.

नंतर स्नानाला काका.नामस्मरण करताकरता बाहेर.
प्रसन्न वदनाने काकू हातात सोवळं घेऊन त्यांच्यासमोरच धरणार.

एकदा मला जाणवलं..
पितांबरही प्रसन्न हसत असतं एकसारख्या निऱ्यांमधून!

चोखंदळ काकूंच्या उदबत्तीचा मनाला प्रसन्न करणारा दरवळ. खड्या स्वरात गायत्री न् इतर मंत्रपठण.
रोज एक अध्याय गीतेचा वाचणार.. समजून उमजून.
त्याही मन लावून ऐकणार.
घंटीचा मंजुळ आवाज वातावरणाला प्रसन्न करणारा. ठरलेल्या वेळी ऐकू येणारच. घड्याळाच्या काट्यावर चालावं तसं.

आवाज ऐकला की खाली माझ्या डोळ्यापुढे येतं निऱ्या घालून काकूंनी काकांपुढं धरलेलं धोतर.

प्रसन्न सहजीवन..चहा नाश्ता एकत्रच.
वर्तमानपत्राची घडीही लाजेल.
कोरं करकरीत वाटावं;असं लोणच्यासारखे मुरलेले प्रसन्न सदाबहार तरीही नवेपण राखणारे साहचर्य.

का नाही देव प्रसन्न राहणार ६३च्या आकड्यावर ??
पुस्तकांतल्या आदर्श तत्वांशी निष्ठा ,दोघांची यथार्थ लवचिकता .. आणि म्हणूनच वेष्टनातली जीर्ण गीता
शब्दांचे अर्थ न बदलणारी आणि तसंच साहचर्याचं नातंही सप्तपदीतली वचनं पाळणारं.. वर्षानुवर्षे.

…भले रांगोळीतले रंग संगत बदलत राहतात..!!
भले त्यातल्या नक्षीही रूप नित पालटत राहतात..!!
कधी मनातल्या..कधी पुस्तकातल्या.

©®सीए संगीता मेहता पुणे .

error: Content is protected !!