#माझ्यातली मी (२०/१०/२५)
लघुकथा.
खाली दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा.

वाक्य:- ” दुरीतांचे तीमिर जावो. ”

कथेचं शीर्षक :- ” प्रकाश”.

‌‌. ऑफिस मधून घरी परतताना ज्योती रोज एका वृद्धाश्रमा जवळून जायची. एके दिवशी ज्योती आश्रमाच्या दारात थांबली. आत्तापर्यंत कधी आश्रमात जाण्याचा योग आला नव्हता. आज मात्र तिने आत जायचा निश्चयच केला!.

आत मध्ये गेल्यावर तिला काही आजी -आजोबा दिसले. काही बाकावर बसून गप्पा मारीत होते, काही जण खिडकीतून बाहेर पाहत होते, एकमेकांकडे पाहून मंद स्मित करीत होते. तिने त्यांच्याशी बोलता -बोलता काही विनोदी घटना सांगितल्या . प्रेमाने बनविलेला फराळही त्यांना दिला. वातावरण एकदम हलके आणि प्रसन्न झाले.

त्याच क्षणी एका आजीबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले. ज्योतीला पाहून त्यांना त्यांच्या मुलीची आठवण आली. ती परदेशात गेली तिकडेच. साधा फोनही नाही. त्यांना खूपच एकटं वाटत होतं. त्या ज्योतीशी भरभरून बोलल्या. जणू आभाळातील काळे ढग बसून गेले. ज्योतीला जाणवलं आपण येथे येऊन गप्पा मारल्या, बोललो हाच खरा “दीप ” आहे.

त्यानंतर ज्योती दर रविवारी आपल्या कुटुंबासोबत आश्रमात जाऊ लागली. आजी-आजोबांच्यासाठी छोटे-मोठे कार्यक्रम जसे की ,गाण्याचा, कीर्तनाचा, भजनाचा तर कधी त्या सर्वांना एखादं नाटक दाखवायला घेऊन जाई. ज्योतीलाही आपल्या आई-बाबांना भेटल्याचा फील येऊ लागला.

अनेक आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य तिच्या आयुष्याचा जणू उत्सवच बनले. लक्ष्मीपूजन आश्रमातच केले. आजी आजोबांना शाली आणि दिवाळी अंक भेट दिले. तिच्या दोन्ही मुलांनी शोभेचे फटाके उडवले. सर्वांनी एकत्र फराळ केला.

तेवढ्यात आश्रमाचे अधिकारी आले ते म्हणाले,” ज्योती तू खरंच वृद्धांच्या मनात सकारात्मकतेची ज्योत पेटवली, तुझं नाव सार्थ ठरवलं!”
ज्योतीने त्यांना वाकून नमस्कार केला ,म्हणाली,” दुरितांचे तिमिर जावो…..!”

त्या दिव्यांनी केवळ आश्रमच उजळला नाही तर तिच्या आतलाही अंधार नाहीसा झाला. सण खरा तेव्हाच साजरा होतो, जेव्हा आपण कोणाच्या तरी जीवनात प्रकाश पेटवतो.

शब्द संख्या :- २४१.
सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®

error: Content is protected !!