#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२०/१०/२५)
#ऋणकाढूनसणनको
#नसताबडेजाव
आज अंजलीला आईच्या बोलण्यातली सत्यता पटत होती. लग्नाच्या वेळी आईने सांगितले होते की पोरी आहे त्यात आनंदाने संसार कर, ऋण काढून सण कधीच साजरा करू नकोस.
शेखर आणि अंजलीचं नवीनच लग्न झालं होतं. त्याला बडेजाव दाखवायची हौस होती. लग्न झाल्यावर लगेच त्याने टू बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. अंजली त्याला म्हणाली,
“मोठ्या फ्लॅटची लगेच काही गरज नव्हती.”
“अगं मला कंपनी भाडं देते तू काळजी करू नकोस.”
प्रत्येक वेळी कंपनी देते असे सांगून तो मोठ्या सणांना कंपनीकडून कर्ज घेऊन वेगवेगळ्या वस्तू विकत घेत होता. अंजलीने त्याबद्दल टोकल्यावर तो सांगायचा की हे सर्व बिनव्याजी आणि हप्ते पण खूपच कमी आहेत. ह्यामुळे शेखरला दिवसेंदिवस कमी पगार मिळत होता. तो अंजलीला देत असलेल्या पैशांमध्ये महिन्याचा खर्च जेमतेम भागत होता. त्यातच शेखर खूप आजारी पडला त्याला इस्पितळात भरती करावं लागलं. अंजलीला सुचेना काय करावं. ती सरळ कंपनीत शेखरच्या मॅनेजरना जाऊन भेटली आणि त्यांच्याकडे शेखर घेतो तशा बिनव्याजी कर्जाची विनंती केली. ते तिला म्हणाले,
“अहो कंपनी असं बिनव्याजी कर्ज कोणालाही देत नाही. अशाने कंपनीचे दिवाळे निघेल. आम्ही सर्वांनी वेळोवेळी शेखरला समजावलं असं वारंवार कर्ज घेऊ नकोस. जेव्हा खरी गरज असेल तेव्हा काय करशील. ह्या कर्जांच्या हप्त्यांमुळे त्याची “टेक होम सॅलरी” नगण्य झाली आहे.”
अंजलीच्या लक्षात आता सारा प्रकार आला होता. प्रत्येक मोठ्या सणाला तो महागाची वस्तू कर्ज काढूनच घरात आणायचा. तिच्या मनात आलं आता खरी गरज आहे तर तिलाच कोणापुढे तरी हात पसरावे लागणार. वडीलधाऱ्या माणसांचे अनुभवाचे बोल ऐकले नाहीत तर असं काहीतरी घडतं. संसाराचा गाडा सुरळीत रेटण्यासाठी शेवटी स्त्रीलाच कंबर कसावी लागते.
©️©️सीमा गंगाधरे
शब्दसंख्या २३६

Good story