दोन जिवंत डोळे फक्त डोळे दिसायचे, त्यातून पाणी वहायचं…ते जिवंत डोळे फक्त मंदार लाच का दिसत होते?.. काय होतं त्या डोळ्यांमागच रहस्य?…. काय सांगायचं होतं त्या डोळ्यांना?
#माझ्यातली मी
बघू नकोस मला…
भय कथा
“नको,नको बघूस मला,कोण तू? का मला बघते? ती बघते मला , जा इथून जाs”, असं जोरात ओरडत मंदार जागा झाला. त्याला दरदरून घाम फुटला होता, घसा कोरडा पडला होता. टेबल वरच्या बॉटलच झाकण उघडून तो गटागटा पाणी पिऊन तोंड पुसत मोबाईल वर वेळ बघत होता.
रात्रीचे ३ वाजले होते, बाहेर जोरात पाऊस सुरू होता. त्याने बाजूला झोपलेल्या गजुला उठवले आणि पडलेलं स्वप्न सांगू लागला.
“झोपू दे रे ,काय नवीन आहे का हे! हॉस्टेल मध्ये तुझ्यासोबत राहायला आल्यापासून रोज हेच ऐकतोय, पकलो यार झोपू दे, मी सकाळी ऐकतो हा, झोप”, असं म्हणून गजू झोपी गेला. मंदार चा डोळा मात्र लागत नव्हता.
हे काही पहिल्यांदा घडलं नव्हतं. हे सगळं सुरू झालं त्या रात्रीपासून. ती रात्र, मंदार कधीही विसरू शकत नव्हता. कारण, त्याच रात्री सुरू झाला होता हा खेळ डोळ्यांचा. मंदार आता इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षाला होता.
ही गोष्ट घडली तेव्हा तो लहान होता.
उन्हाळ्याचे दिवस होते ,मंदार आजोळी गेला होता. त्याचं आजोळ कोकणामधे एका छोट्या गावात होतं. नारळाची बाग, फेसाळणारा समुद्र, फणसाचे गरे, या सर्वांसोबत आकर्षणाचा विषय होता आजीचा वाडा.
काय सुंदर चिरेबंदी वाडा होता तो! मंदार साधारण ६वीत असेल तेव्हा. त्याच्यासोबत त्याची लहान बहीण आणि आई असायची आजोळी सोबत.
वाड्यात सतत आजारी असलेले त्याचे आजोबा, आजी आणि त्यांच्यासोबत ग्यानबा नावाचा गडी आणि त्याची बायको सकू होती. सुट्ट्या लागल्या की, सर्वांना वाड्याचे वेध लागायचे.
मंदारची आजी साधीसुधी पण शिस्तप्रिय बाई. घरात संस्कार, वळणाची रेलचेल. चांगल्या सवयी आयूष्य घडवतात आणि वाईट सवयी आयूष्य उद्ध्वस्त करतात असं ती सारखी आजोबांना बघत म्हणायची. आजोबा जास्त बोलायचे नाही पण भिंतीकडे बघून काहीतरी पुटपुटत राहायचे. आजोबांना नेमकं काय झालं होतं हे कोणालाच कळत नव्हतं, पण ते अंथरुणाला खिळून असायचे. आजी सोबत सखूबाई पण होत्या. त्या स्वभावाने फार मायाळू पण तेवढ्याच ठीसक्या होत्या. ग्यानबा दिवसभर वाड्यात काही ना काही काम करत राहायचे.
मनसोक्त खेळून झालं की आजीच्या हातचे मासे आणि सोलकढी पिऊन सर्व जण दुपारी मस्त वामकुक्षी घ्यायचे.
रात्री सर्व जण बाहेर झोपायचा आग्रह धरायचे पण आजी बाहेर झोपू द्यायची नाही. म्हणायची कोकणात रात्री माडाच्या झाडाखाली झोपू नये. आकाशात पसरलेल्या चांदण्याच्या मंडपात सर्वांना फार झोपू वाटायचं पण आजी नाही म्हणायची. मग एका रात्री मंदार ने हट्टच धरला की, त्याला बाहेर झोपायचे आहे. आजी नको म्हणत होती त्याला समजावत होती पण याने काही ऐकलं नाही. शेवटी नाईलाजाने आजीने त्याच्यासोबत ग्यानबाला झोपायला सांगितलं आणि ही दोघं बाज टाकून झोपले होते. अर्ध्या रात्री अचानक मंदार च्या गालावर कसले तरी थेंब पडले आणि त्याला जाग आली. त्याने डोळे चोळत बघितलं तर आकाशाकडे बघून त्याचे डोळेच विस्फारले. तो घाबरून थरथर कापू लागला, त्याचे हात पाय थंड पडले, बोबडी वळली, त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. इतकं भयानक दृश्य त्याने कधीच पाहिलं नव्हतं. आकाशात त्याला जिवंत दोन डोळे दिसत होते आणि त्या डोळ्यांमधून पाणी वाहत होतं. मंदार खूप घाबरला कसतरी त्याने शेजारी झोपलेल्या ग्यानबा ला उठवण्याचा प्रयत्न केला तर, ते डोळे त्याच्या जवळ येऊ लागले असं त्याला जाणवायला लागलं. त्याने जोरजोरात ग्यानबा ला हलवायला सुरुवात केली आणि जसा तो उठला तसे ते डोळे अदृश्य झाले.
मंदार ला फार ताप भरला होता. आजीने घरगुती उपचार केले पण त्याला काही आराम पडला नव्हता.
“म्हणान सांगत व्हतय बाहेर झोपू देऊ नको म्हणान ,पण नाय ,कोण ऐकतलं माझो ,झाला ना आता मनासारखा, आता कसा करायचा?”, असं म्हणून आजी चिडचिड करत होती.
“ काय रं ग्यानबा, तुझा खय लक्ष व्हता? झोपला व्हतास म्हयशी विकान, लेकराक काय दिसला कोणाक ठाव ! किती घाबरल्यान ता?”,आजी ग्यानबा ला रागवत होती.
“आये ,मी थयच व्हताव गे, माका काह्यो दिसलं नाय, ह्याकाच कसं काय दिसल्यान काय कळला नाय गो”, ग्यानबा डोकं खाजवत म्हणाला.
त्या नंतर हळूहळू मंदार बरा झाला खरा पण, मंदार ला स्वप्नात ते डोळे सारखेच दिसू लागले. मंदार च्या आईने अनेक जणांना दाखवलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो कितीवेळा दचकून,कधी ओरडून,घाबरून, किंचाळून उठला होता झोपेतून. ते डोळे फक्त त्यालाच दिसायचे इतर कोणालाही त्या डोळ्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं अगदी आजीला सुद्धा.
दिवस पुढे जात गेले तसा मंदार मोठा होत गेला. पण हे स्वप्न मात्र तसच होतं. पुढे शिक्षणासाठी त्याने घर सोडलं आणि हॉस्टेल मध्ये राहात होता. तिथे त्याचा रूम मेट गजू होता. मंदार ला पडणाऱ्या स्वप्नांना तो परिचित होता.
इकडे आजी पण खूप थकली होती. आजोबांची काळजी घ्यायची. आजोबा अंथरुणाला खिळून होते, तरी त्यांचा जीव कश्यात तरी अडकला होता.
बरीच वर्ष झाली होती कोकणात जाऊन. तो प्रसंग घडल्यापासून आजीने येऊच दिलं नव्हतं. आता मात्र मंदार ची उत्सुकता ताणल्या गेली होती. त्याला या प्रकरणाचा छडा लावायचा होता. “हे डोळे फक्त मला दिसतात म्हणजेच यांचा संबंध वाड्याशी आणि माझ्याशी आहे. मला जर यातून मोकळं व्हायचं असेल तर, मला आजोळी जावच लागेल”,असं म्हणून त्याने आजीला फोन केला आणि सांगितलं की, त्याला आजीची खूप आठवण येतेय आणि तो कोकणात यायला निघाला आहे. आजीला वाटलं आता बरीच वर्ष झाली मंदार मोठा झाला आता काही त्रास होणार नाही, म्हणून तिनेही होकार दिला. पण हा तिचा गैरसमज होता. मंदार समोर काय येणार होतं याची कल्पना त्यालाही नव्हती आणि अश्यात त्याने पाऊल टाकलं वाड्यात. कोकणात पाऊस सुरु होता. सगळीकडे मातीची दरवळ पसरली होती. पावसात निसर्गाने नटलेले कोकण अधिक चं सुंदर दिसत होते.
“आजी मी आलो बघ”, मंदार ने आजीला आवाज देताच अचानक जोरजोरात वारा वाहू लागला,जणू काही कोणाला त्याच्या येण्याची चाहूल लागली होती. गेट जवळ जोराचा वारा वाहत होता, पण वाड्यात मात्र अतिशय शांतता होती. मंदार ला हे बघून फार आश्चर्य वाटलं पण तो काही बोलला नाही. त्याच्या मनातलं चुकून जरी आजीला कळलं असतं तर आजीने त्याला तिथे एक क्षणही थांबू दिलं नसतं हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने गजुला सुद्धा बजावलं होतं.
वाड्याचे खोड अगदी जसेच्या तसे होते. पानं मात्र पिकली होती. आजी, ग्यानबा, सकू सगळी जणं काळ्याची पांढरी झाली होती.
“ काय ग्यानबा सगळा चूना डोक्यातच सांडला वाटतं तुझ्या?”, अस मंदार ने म्हणताच सर्व जण हसले. आजीने नातवाच्या तोंडावरून हात फिरवत विचारलं, “कसा असस? माझी आठवण ईली नाही तुका, एवढ्या वर्षांन ईलास?”. “तूच येऊ देत नव्हती आणि त्यामुळे आईला पण नाही येता आलं तुझ्याकडे, उलटं मीच नाराज आहे तुझ्यावर”, असं मंदार ने म्हणताच आजीच्या डोळ्यात पाणी आलं. पदराने डोळे पुसत आजीने लेकराला जवळ घेतलं आणि मायेने म्हणाली, “नाराज खय व्हता ,तुका ह्यो त्रास व्हायचा म्हणान तुका येओ द्यायचे नाय मी, पण माका तुझी लाई आठवण यायचो”.
“ ए आजी रडू नको, मी आलोय ना आता, भरपूर दिवस राहणार बघ तुझ्यासोबत, चल मग मला खूप भूक लागलीय पटकन काहीतरी तुझ्या हातच खाऊ घाल बरं आणि हो हा गजू आहे माझा मित्र आम्ही हॉस्टेल ला सोबत असतो. मी येणारच होतो तर त्यालाही म्हटलं चल, चालेल ना?”, मंदार ने विचारलं.
“चालणार खय नाही! ये रं लेकरा”,असं म्हणून आजी खायला आणायला गेली.
मंदार आणि गजू त्यांच्या खोलीत गेले.
“आयला मंदार मस्त आहे रे वाडा तुझा! पुढे मागे रिसॉर्ट म्हणून विचार कर. मस्त डेस्टिनेशन आहे यार”, गजू उत्साहात म्हणाला.
“मग वाडा कोणाचा आहे! मंदार द ग्रेट चा,” असं म्हणून मंदार बेडवर आडवा पडताच त्याला सीलिंग वर तेच डोळे पुन्हा दिसले. तो जोरात ओरडतच बाजूला झाला, “गजू! ते बघ ते डोळे”,
“अरे कुठे?”,
“ते बघना सीलिंग वर”,
“सकाळी सकाळी घेतली का रे ?आधी झोपेत बडबडायचा, आता जागेपणी सुरू केलं तू? कुठे आहे? काहीच नाही तिकडे. चल फ्रेश हो पटकन खाऊन घेऊ काहीतरी”, असं म्हणत गजू ने मंदार ला बाथरूम मध्ये पाठवलं.
“अरे ऐक तरी गजू ,हे तेच डोळे आहेत बघ”,
“गप रे ,काही डोळे बिळे नाहीत चल”, असं म्हणून गजू मंदारला खाली घेऊन गेला. मंदारला कळून चुकलं होतं या डोळ्यांच काहीतरी गूढ आहे. “हे स्वप्न नव्हतं मला खरंच ते डोळे दिसले. पण आता बोलू कोणाशी? विचारू कोणाला? सुरुवात कुठून करू?”, या विचारात असतानाच दाराची कडी वाजली.
“म्हातारे असस काय जिती?”, एक भारदस्त आवाज ऐकू आला.
“ इलेय, असय जीती, खय जातंय तुका घेतल्याशिवाय ”, हसत आजी म्हणाली.
“ गे बाय मांझे! ह्यो मंदू असे काय?”, मंदार ला रोखून बघत म्हैसा अक्का छत्री दारात ठेवत म्हणाली.
“ व्हय तर, बरा तुका वळखु आल्यान!”, आजी म्हणाली.
“ ह्येका इसरून कसा चालान! ह्योच तर असे या वाड्याचो मालक”, असं म्हैसा अक्का ने म्हणताच वाड्याची दारे खिडक्या जोरजोरात वाजायला लागली. अचानक हे सगळं घडलेलं बघून सगळेच जण घाबरले.
तेवढ्यात अचानक कधी नव्हे तो आजोबा थरथरत्या आवाजात बोलू लागले, “ जा हाईसून जा म्हणतेय ना”. आजोबा एक शब्दही बोललेले मंदार ने कधी ऐकले नव्हते आणि अचानक ते एवढं कसं बोलून निघाले? मंदारला आश्चर्य वाटलं.
“काय व्हता हा?”, घाबरून म्हैसा अकाने विचारलं.
“ता तर माका पण नाय कळल्यान, पण जा काही व्हता ता भयानक व्हता”, असं आजी आजोबांकडे कटाक्ष टाकून म्हणाली.
दुपारी जेवण झाल्यावर गजू आणि मंदार वामकुक्षी घ्यायला दिवाण खाण्यात आडवे झाले, बोलता बोलता मंदार चा डोळा लागला होता, तर हळूच त्याच्या कानात काही ओळी ऐकू आल्या,
चार पायांच्या भिंतीखाली
भूतकाळाचा मोठ्ठा डोह,
शिरता त्यात खोल खोल
पापाचे निखारे पसरले थोर.
वाड्याच्या दुष्ट जाळ्यामध्ये
अडकला
निष्पाप जीव ,
चूक नसतानाही तिची
केली नाही कोणी कीव.
कपटाचा साज चढवूनी
केले साजरे घाताचे सोहळे,
मुक्तीस आसुसलेले निष्पाप
निरागस दोन डोळे.
हे ऐकताच मंदार दचकून जागा झाला.
“गजू ऐक, झोपतो काय उठ, आपल्याला कामाला लागायचे आहे”,
“काय माणूस आहे रे तिथे हॉस्टेल मध्ये रात्री झोपू द्यायचा नाही इथे दिवसा पण झोपू देत नाहीस, काय झालं?.
मंदार ने त्या ओळी गजू ला सांगितल्या.
“आर यू सिरीयस! भुताचा सिनेमा बघतोय का मी?”, गजूने त्याची टर उडवली.
“मस्करी करू नकोस! चल पटकन ,मला वाटतं त्या डोळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, म्हणून हे सगळं घडतंय”,
“अरे हो, पण कुठे जायचंय?”,
“कुठे? अरे त्या ओळींमध्ये म्हटलं न चार पायांच्या भिंतीखाली”,
“हो पण कुठले चार पाय ?कुठली भिंत? कुठे शोधायची?”,
“ तेच तर शोधून काढायचय”, असं दोघं बोलत असताना आजोबा खाकरले. मंदार ने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, पण मग ते भिंतीकडे बघून काहीतरी बडबडू लागले, “माका मुक्ती व्हया, दे, जा, कधी भला नाही व्हायचो तुझा, तुका पूर्ण मरण देऊक व्हया व्हता, चुकलाच माझा”.
“आजोबा काय बोलताय मला सांगा, तुम्हाला डोळ्याबद्दल काही माहित आहे का? प्लीज सांगा ,बोला माझ्याशी”,
मंदार ने डोळ्याचं नावं घेताच आजोबा थर थर कापायला लागले, हात पाय जोरजोरात हलवू लागले आणि नंतर आपोआप शांत झाले.
“मंदार, तुला नं खात्रीने सांगतो हे तुझे आजोबाच झोल आहेत”, गजू ने असं म्हणतात मंदार चिडला,
“सांभाळून बोल गजू , आजोबा आहेत ते माझे”.
“ सॉरी, पण नक्कीच यांना काहीतरी माहित आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतंय. अरे ते बोलूच शकत नाही ना, मग आता कसे बोलले रे?”, गजू जीव तोडून सांगत होता.
“हो यार मलाही तोच प्रश्न पडलाय”.
“जाऊदे चल इथून”, असं म्हणून दोघेही वाड्याच्या दाराजवळ गेले.
“काय असेल त्या ओळींचा अर्थ?”,
“काही कळत नाहीये. सुरुवात करायला ओळी तर मिळाल्या, पण त्याचा अर्थ कसा शोधायचा?”,
“ओळ परत सांग बरं”,
“चार पायांच्या भिंतीखाली
भूतकाळाचा मोठ्ठा डोह”,
“एक मिनिट, आपण एक एक ओळ बघत जाऊ, चार पायांच्या भिंतीखाली
चार पाय कशा कशाला असतात ?”,
“ पलंगाला नाहीतर बाजेला”,
“करेक्ट, आता तुझ्या वाड्यात जेवढे बेड आहेत, ते बेड आपण शोधून काढू, तिथेच काहीतरी सापडेल”,गजू म्हणाला.
“जिनियस आहेस रे चल पटकन , तू वर शोध मी खाली शोधतो”, मंदार ने असं म्हणताच गजू घाबरतच म्हणाला,
“ए बाबा, एकतर हा जुना हौंटेड वाडा आहे आणि मी एकटा फिरू? नको रे, जिथे जाऊ सोबत जाऊ”.
“चल फट्टू, वरून सुरुवात करू”,असं म्हणत वाड्यात जेवढे बेड होते त्याच्या खाली वर सगळीकडे त्यांनी शोध घेतला पण हाती काहीच सापडले नाही.
“काय रे !थकलो बा ,कुठेच काहीच क्लू नाही रे सर्व पलंग पालथे घातले. पण काही नाही मिळालं”,
“एक मिनिट, आपण एक पलंग नाही बघितला”, मंदार उत्साहात म्हणाला.
“ कोणता?”,
“आजोबांचा”,
“काय ?”,
“हो ,चल आता तोच राहिलाय , कदाचित तिथे काही सापडेल”,
“ हम, चल आता एवढे तंगडे तोडले तर शेवटचा पलंग बघू ”, असं म्हणून दोघेही आजोबांच्या पलंगाजवळ गेले. आजोबा झोपले होते, त्यांनी हळूच जमिनीला खाली टक टक करून पाहिलं, भिंतीलाही केलं, पण काहीच हालचाल झाली नाही. मग मंदार ने पलंगाच्या खाली मधोमध टक टक करताच आजोबांचा पलंग भूकंप आल्यासारखा हलू लागला. त्यात कमी होतं का, की आजोबा जोरजोरात ओरडायला लागले, “जा दूर हो, कष्याक इलास्, कैदाशे पुरलं ना तुका थैसर, मग ए, कश्याक दिसतंय? माका मुक्ती दे, जाss”.
या दोघांची ते बघून बोबडीच वळली होती.
“ हे काय होतं रे? तूझे आजोबा चक्क उठून बसले होते. बापरे! चल ते डोळे वगैरे जाऊदे आपण परत जाऊ नाहीतर आपले डोळे बंद होतील कायमचे”,असं म्हणत दोघेही बाहेर आले.
“काही क्षणासाठी मी पण घाबरलो, पण आजोबा म्हणाले पुरलं, ते काय होतं?”,
“आज राहूचदे, आपण उद्या बघू”,असं म्हणून दोघेही अंगणात आले.
तिथे ग्यानबा काहीतरी काम करत होता. त्याला मंदार ने विचारलं,
“ग्यानबा, तू किती वर्षांपासून आहेस रे इथे कामाला?”,
“माका काय मोजता येतंय का? तुमच्या जनमाच्या आधीपासून असय मी”,
“मला सांग वाड्यात कुठे तळघर वगैरे आहे का रे?”,
“तळघर! न्हाय, आन तुका कश्याक व्हयो?”,
“तसं नाही रे, कधी ऐकलं असशील, बघितलं असशील आठव ना जरा”,
“तळघर तर तसा नाह्यो पण हा, एक भुयार असय, पण ते मालकास ठाऊक असय, एकदा सांगितल्यान ता आठवतय माका”,
“काय सांगितलं होत?”, कुतूहलाने गजू ने विचारलं.
त्याच्या कडे कटाक्ष टाकून ग्यानबा डोकं खाजवून सांगत होता, “नीट आठवत न्हाय माका ,पण एक भुयार वाड्यात असे आन त्याचो दरवाजो मालकाच्या हातून च उघडत असय, असं एकदा मालकानं सांगितलं व्हता. पण त्येका बरीच वर्ष झाल्यानं. तेव्हा मालक ठण ठणीत व्हते. पण हा ते दार फक्त वाड्याच्या मालकाच्या हातानं उघडान असा माका त्यांनी सांगितल्याचा आठवतंय. मग बायजा गेल्यानंतर काय झाला माहित न्हाय, पण त्यांची तब्येत बिघडूक लागल्यान आन त्यानंतर ता दार उघडल्याचो माका काय आठवत नाय”,
“बायजा! बायजा कोण?”,
“बायजा, ता”, तो काहीतरी सांगणार तेवढ्यात आजीने त्याला आवाज दिला.
“काय रे, खय गेलतास मरुक? तुका हाक मारलेल्यान ऐकू आला नाय काय? कानात बोयो कोंबल्यान ?”.
“तसा नाही गे तां”,
“ता काय? नारळ काढून आण सखूक चटणी करायची हा”,
“ बरंय ,आणतय”,
“शिट यार, तो काहीतरी सांगत होता”, गजू म्हणाला.
“हो नं! पण ही बायजा कोण? आजीच्या किंवा आईच्या तोंडून तर कधी हे नाव ऐकलं नाही,
हे बायजा नावाचं गूढ लवकर शोधलं पाहिजे यामध्येच काहीतरी सापडेल आपल्याला. एवढं तर नक्की की, तिच्या जाण्यानंतर आजोबा आजारी पडले म्हणजे आजीला बायजा माहित असेल. चल आजीलाच विचारू”,
असं म्हणून दोघेही आत गेले.
आजी देवघरात बसली होती. तिथे जाऊन दोघे तिच्याजवळ बसले .
“काय झाला? काय व्हयो?”,आजीने वाती वळत विचारलं.
“आजी मला सांग तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली ग?”,
“माका काय मोजता येतं व्हय. झाल्या असान ५५ वर्ष ,का रे ?”,
“काही नाही ग, असच आणि आजोबा किती वर्ष चांगले होते लग्नानंतर ?”,
“तुझ्या आऊस चा जन्म झाला अन् ती २ वर्षाची होईपर्यंत चांगले व्हते, पण तुका कश्याक व्हयो चौकशी?”,
“काही नाही ग असच. बरं आजी मला सांग, बायजा कोण होती ग?”.
तिचं नाव ऐकताच आजीने चमकून मंदार कडे बघितलं .हळू हळू तिचा चेहरा लाल भडक झाला, रागा रागाने आजीने वाती वळायला सुरुवात केली. तिचा असला अवतार पाहून मंदार आणि गजू फार घाबरले. आजी जोरजोरात बोलत होती,“नाव नका घेऊ त्या अवदसेच, माझ्या आयुष्याची माती केल्यानं, कोणी माती खाल्ल्यानं? कोणी सांगितल्यान तुका तिचो नाव? तो इषय बंद झाल्यानंतर खैसुंन आलो तिचो नाव?”,
“आजी आजी शांत हो ,कोणी नाही सांगितलं आजी चिडू नको”,मंदार शांत करत होता.
पण आजीचा राग शांत होईना. आजोबांकडे बघून ती बोलू लागली, “या माणसान घरादाराच वाटोळं केल्यानं म्हणान आज ह्यो बघुक मिळतंलय”,
हे ऐकून आजोबा लट लट हलायला लागले तरी आजी शांत होईना.
परत मंदार ने तो विषय काढला नाही. एक दिवस दुपारी पावसात मंदारला ग्यानबा एकटा दिसला. गजू ने आणि मंदार ने त्याला घेरलं आणि त्याला बायजा बद्दल थेट विचारलं .
“लेकरांनो पाया पडतय तुमच्या पण माका तिच्याबद्दल विचारानं नको, बघितल्यान ना आजी कशी चिडली व्हता ता”,
“जे माहित असेल तेवढं सांग”, मंदार ने त्याला त्याच्या पडणाऱ्या स्वप्नाबद्दल सांगितलं असता ग्यानबा ला धक्काच बसला.
“काय? बायजाचो आन डोल्याचो कायो संबंध?”,
“तेच तर शोधून काढायचं आहे .मला वाटतं तिच्यासोबत काहीतरी घडलं होतं जे कोणाला माहीत नाही आणि ते तीला सांगायचंय म्हणून ती मला दिसत असेल. आपण नाही शोधलं तर हे असच चालू राहील”, असं मंदार ने म्हटल्यावर ग्यानबा सांगायला लागला,
“बायजा, या गावातलाच पोर, अल्लड,निष्पाप, हसत खेळत बागडणारी, सगळ्या गावाक ता मदत करायचा. कोणाचा काही अडला नडला का बायजा हजर, कोणत्या पण कामाक बायजा च लागायची समद्याक असा हा बायजा. अनाथ व्हता पोर. एकदा मालकाची नजर तिच्यावर पडल्यानं, मालक म्हणजे रंगेल माणूस. पैश्याचो माज व्हता, त्यांका वाटायचा पैष्यान सारच ईकत घेऊ शकत्यान. मालकान खूप प्रयत्न केल्यान बायजाक मिळवण्याचो. पण बायजा, मालकान भिक घालायचो नाय.
पर त्यो दिस उजाडलाच जो तीका या वाड्यात घेऊन इला.
तुझ्या आजीक दिवस गेल्यानं व्हता, अडला व्हता ता. कोणीतरी सुचवल्यान बायजाक बोलवा तिच्या हाताला गुण असय म्हणान तीका वाड्यात बोलावल्यान. तिच्या हातून तुझ्या आउस् चा जन्म झालो म्हणान खुश होऊन मालकीण ने तीका ठीऊन घेतल्यान. बायजा वाड्यात फुलपाखरागत बागडू लागला. पण मालकाच्या मनात काहीतरी येगळाच व्हता ,ते तीका एकट्यात गाठायचो प्रयत्न करायचो. मालकीणला त्यांचा हा खोड माहित व्हता म्हणान त्या बायजाक मालकाच्या दूर ठीवत, पण मालक पण पेटलो व्हतो, माघार घेऊक तयार न्हवतो. बिचारी निरागस बायजा एक दिस मालकिनीक मालकासोबत दिसल्यान, दोघात लई वाद झालो, त्याच दिशी बायजा गायब झाल्यानं, कोणाक कधीच दिसला नाय, पण ता गेल्यानंतर मालक मात्र आजारी पडल्यान”.
मंदार ला त्याचं उत्तर सापडलं होतं. तो तडक आजोबांजवळ गेला आणि फक्त त्यांना रोखून बघू लागला. तसे आजोबा काहीतरी हातवारे करू लागले.
“सांगा ऐकायला च उभा आहे मी. काय केलं बायजासोबत? बोला”, असं मंदार ने म्हणताच आजोबांनी भिंतीमधल्या कपाटाकडे बोट दाखवलं. मंदार ने कपाट उघडताच त्याला एक पेटी दिसली, त्यात एक मोठी जूनेखानी चाबी होती आणि एक कागद होता त्यावर काही लिहिलं होतं. मंदार त्याच्या लक्षाच्या जवळ होता.
मंदार ने तडक ग्यानबा ला घेऊन भर पावसात भुयार गाठलं. भूयाराच्या बाहेर जाळी आणि वटवाघूळ होती. पावसामुळे भिंतीला शेवाळ आलं होतं. गजू ने हातात मशाल आणली होती. तिथे त्यांना एक दरवाजा दिसला. त्याला कुठेही कुलूप नव्हतं. आता प्रश्न होता चाबी लावायची कुठे? तेवढ्यात मंदार ला तो कागद आठवला. त्यात लिहिलं होतं. हे भुयार त्यांच्या पूर्वजांनी बांधलं होतं. हे दार फक्त जो या वाड्याचा वारस असेल त्याच्याच हातून उघडेल असं लिहिलं होतं. आता मंदार ला कळून चुकलं ते डोळे त्यालाच का दिसायचे. त्यात पुढे काही ओळी लिहिल्या होत्या.
दारावर स्वस्तिक पवित्र
त्यावर ठेवा हात
उत्तरेस तीन बोटं
दक्षिणेस तळहात
पूर्वेस करंगळी नेता
पश्चिमेस अंगठा जाई.
त्याने तसाच हात त्या दारावरच्या स्वस्तिक वर टेकवला आणि जोरात आवाज झाला .सगळे मागे झाले. अचानक एक भलं मोठं कुलूप आतून बाहेरच्या दिशेस आलं आणि मंदार ने त्याच्या जवळची चाबी त्यात घातली आणि कड कड आवाज करत तो भला मोठा दरवाजा उघडला.
आत खूप अंधार होता, थोडं पुढे गेले तर तिथलं दृश्य बघून तिघेही भान हरपले. तिथे पैसे दागदागिन्यांची खाणच होती.
“मंदार मला चिमटा काढ रे, एवढं सोनं मी कधीच पाहिलं नाही”,असं म्हणून गजू एका मोठ्या पेटीला धडकला आणि पडला. त्याच्या धक्क्याने ती पेटी उघडली आणि त्यात जे होतं ते बघून तर तिघांना दरदरून घाम फुटला. त्यांच्या तोंडून आवाजच निघेना. त्यात एका बाईचा सांगाडा होता पण डोळे मात्र जिवंत होते, बघत होते.
त्या डोळ्यांमधून पाणी वाहत होतं आणि ते पाणी पेटीच्या बाहेर जमिनीवर येऊ लागलं. पाणी पेटीबाहेर येताच जमिनीवर काहीतरी उमटायला लागलं.
‘मी निष्पाप व्हते, मालकान माझो घात केल्यान, माका इथे आणून जबरदस्ती केल्यान आन या पेटीत जिवंत बंद केल्यान. माझो जीव तडफडलो पण कोणाक काहयो कळला नाय, पेटीच्या फटीतून बंद दरवाज्याकडे डोळ्यांनी बघत अश्रू काढीत माझो जीव गेल्यान, आज माका मुक्ती मिळतली, मालकीणीक सांगा मी निष्पाप व्हते,मी कायो केलं नव्हतं”, असं म्हणत ते डोळे कायमचे बंद झाले. मंदार ने हात जोडून आजोबांच्या वतीने माफी मागितली. त्याने ते प्रेत बाहेर आणताच आजोबांचा जीव गेला. मंदार ने ते दार कायमचे बंद केले आणि चाबी बावीत फेकून दिली. आजीला हे सगळं ऐकून फार वाईट वाटलं. दोघांचेही विधी आटोपून मंदार आणि गजू परत जायला निघाले. जाताना वाड्याला आणि आजीला डोळे भरून बघत मंदार निघाला. परत त्याला ते डोळे कधीच दिसले नाही.
ऍड. रश्मी द. कोळगे
फ्लॅट नं.सी – १, १ ला मजला, रचना अपार्टमेंट, तांबरी, धाराशिव.- ४१३५०१
9422029196
